जतीन देसाई,लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते आहेत.

बांगलादेशमध्ये शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान होत आहेत. विरोधी पक्षांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातल्यामुळे आता तिथे संसदेत विरोधकच नसतील..

Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
maharashtra vidhan sabha election 2024 devyani farande vs vasant gite nashik central assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीय, धार्मिक मुद्दे निर्णायक
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
Natikuddin Khatib, Balapur, Nitin Deshmukh,
‘बाळापूर’ दोन्ही शिवसेनेसह वंचितसाठी आव्हानात्मक, लढतीला धार्मिक रंग; मतविभाजन निर्णायक
Solapur, Uddhav Thackeray group leader, benami assets,
सोलापूर : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडे ११.१२ कोटींची बेनामी मालमत्ता, बार्शीत गुन्हा दाखल

अपेक्षेप्रमाणे बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगचा सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय झाला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए इस्लामी या दोन्ही मोठय़ा पक्षांनी आणि काही लहान पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. अशा परिस्थितीत अवामी लीगचा प्रचंड विजय अपेक्षितच होता. अवामी लीगनंतर सर्वात मोठय़ा संख्येने अपक्ष निवडून आले आहेत. अवामी लीगबरोबर युती असलेल्या जातीय पार्टीचा ११ मतदारसंघांत विजय झाला आहे. बांगलादेशची वाटचाल एकपक्षीय राजवटीच्या दिशेने होत आहे की काय अशी भीती काहीजण व्यक्त करत आहेत. पंतप्रधान शेख हसीना वाजेद आणि अवामी लीगचा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय झाला आहे. गोपालगंज ३ येथून प्रचंड मताने निवडून आलेल्या शेख हसीना आता पाचव्यांदा पंतप्रधान होतील. सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पंतप्रधान होणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. 

बांगलादेशात एकूण ३०० मतदारसंघ आहेत. त्यापैकी २९९ मतदारसंघांत ७ जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्यापैकी जवळपास २२३ मतदारसंघांत अवामी लीगचा विजय झाला आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जवळपास ८० टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत अंदाजे ३९ टक्के मतदान झाले होतं. बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए- इस्लामीने १९९६ मध्ये हंगामी आणि तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेतली. त्यात अवामी लीगचा विजय झाला. एकूण मतदानातही वाढ झाली. तेव्हा जवळपास ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या वेळेस चितागोंग येथे अधिक मतदान झाले, तर बीएनपीचा प्रभाव असलेल्या राजधानी ढाका, मैमनसिंग येथे कमी मतदान झाले. शेख हसीना यांना २,४९,९६५ मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या मोहम्मद अलीपूर रेहमान यांना  ६,९९४ मते मिळाली.

विरोधी पक्षांशिवायची ही निवडणूक ‘शांततापूर्ण, मुक्त आणि न्याय्य’ वातावरणात झाली असल्याचं मत निवडणुकीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या पथकाने व्यक्त केलं आहे. सरकारने अनेक देशातील निरीक्षकांना निवडणूक पाहण्यासाठी बोलावलं होतं. त्यात अमेरिका, कॅनडा, रशिया, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स (ओआयसी) इत्यादींचा समावेश होता. बांगलादेशातील काही लोकांचे म्हणणे आहे की  ४० टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला  त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण बहुतेक मतदान केंद्रांवर फारसे मतदार दिसत नव्हते. दुपारी ३ वाजेपर्यंत मात्र २७ टक्के मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त फोटोग्राफर आणि मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्ते शाहिदऊल इस्लाम म्हणतात, ‘आता डमी निवडणुकीतील डमी उमेदवार डमी संसद चालवणार.’ बीएनपी यांनी निवडणुका हंगामी, तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात अशी मागणी केली होती आणि त्यासाठी २८ ऑक्टोबरपासून जमात-ए-इस्लामीबरोबर आंदोलन सुरू केले. १९९६ मध्ये शेख हसीना आणि अवामी लीगच्या मागणीमुळे घटनेत दुरुस्ती करून सार्वत्रिक निवडणुका ‘हंगामी सरकार’च्या नेतृत्वाखाली घेण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत १९९६ मध्ये अवामी लीगचा विजय झाला आणि शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर २००१ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांचा पराभव झाला आणि बीएनपीच्या खालेदा झिया पंतप्रधान झाल्या. नंतर २००९ पासून शेख हसीना सलग विजयी होत आहेत. हंगामी तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घेणारी १३ वी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये घटनाविरोधी ठरवली होती. त्याच वर्षी शेख हसीना यांनी १५ वी घटना दुरुस्ती करून हंगामी आणि तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्याची तरतूद रद्द केली.

खालेदा झिया सध्या नजरकैदेत आहेत. त्यांचा मुलगा आणि पक्षाचा हंगामी प्रमुख तारिक रेहमान २००८ पासून लंडनला आहे. २००४ मध्ये शेख हसीना यांच्या सभेवर झालेल्या बॉम्बहल्ल्याच्या खटल्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या एका खटल्यात तारिक रेहमान याला नऊ वर्षांची शिक्षा झाली आहे. पक्षाचे महामंत्री फकरुल आलमगीर व इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येत पकडण्यात आले आहेत. बीएनपी आणि जमात इस्लामचा राजकारणासाठी उपयोग करतात. बांगलादेशात जमात-ए-इस्लामीचा फारसा प्रभाव नसला तरी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. बीएनपीचा बऱ्यापैकी जनाधार आहे.

अवामी लीग आणि भारताचे अतिशय जवळचे संबंध आहेत आणि त्याला इतिहास कारणीभूत आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्य युद्धात भारताने सर्व प्रकारची मदत केली होती. भारताच्या मदतीमुळे बांगलादेश अस्तित्वात आल्याची जाणीव असल्याने बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान पाकिस्तानने तुरुंगातून सुटका केल्यानंतर लंडनमार्गे ढाक्याला जाण्यापूर्वी काही तास दिल्लीत थांबले होते. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. विमानातून उतरताना ‘जय बांगला’ची घोषणा मुजीबुर रेहमान यांनी दिली होती. १९७५ च्या १४-१५ ऑगस्टच्या रात्री लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी घरात घुसून मुजीबुर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांची हत्या केली. शेख हसीना तेव्हा बांगलादेशात नसल्यामुळे वाचल्या होत्या. त्यापूर्वी भारताने तुमच्यावर हल्ला होऊ शकतो असे मुजीबुर रेहमान यांना कळवले होते. पण, आपल्यावर कोणी बंगाली हल्ला करणार नाही असा त्यांना विश्वास होता. शेख हसीना नंतर काही काळ भारतात राहिल्या. शेख हसीना आणि अवामी लीगचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. काही वेळा त्या कट्टर धर्माध संघटनांशी तडजोड करताना दिसत असल्या तरी धर्मनिरपेक्षता त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्यात चांगली मैत्री आहे. दोन्ही देशांतले नेते एकमेकांच्या संपर्कात असतात. भारताने आमंत्रित केल्यामुळे गेल्या वर्षी जी-२० च्या बैठकीसाठी शेख हसीना भारतात आल्या होत्या. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा गेल्या वर्षी बांगलादेशात गेले होते. नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ५० व्या वर्षी, बांगलादेशचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात अनेक करार करण्यात आले होते. ईशान्य भारत आणि बांगलादेश यांना जोडण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. भारताने बांगलादेशात मोठी गुंतवणूक केली आहे. तयार कपडय़ां (गारमेंट) च्या क्षेत्रांत शेख हसीनाच्या काळात बांगलादेशने खूप प्रगती केली आहे. जगभर बांगलादेशचे कपडे मिळतात. अमेरिका, इंग्लंड इत्यादी राष्ट्रे तर बांगलादेशची मोठी बाजारपेठ आहे. बांगलादेशने या काळात वेगवेगळय़ा क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या दृष्टीने बांगलादेशचे भूराजकीय महत्त्वदेखील आहे. ईशान्य भारतातील काही फुटीरतावादी गट अजूनही बांगलादेशातून काम करतात. त्या बांगलादेशातून त्यांची प्रवृत्ती चालवतात.

दक्षिण आशियातील जवळपास सर्व देशांशी मैत्री वाढवण्याच्या चीनचा प्रयत्न आहे. चीनने बांगलादेशात पद्मा नदीवर ६.१५ किलोमीटर लांब पूल बांधला आहे. बांगलादेशातून चीनला निर्यात होणाऱ्या बहुसंख्य वस्तूंवरचा कर चीनने जवळपास शून्य केला आहे. ही चीनची पद्धत आहे. अशा प्रकारे लहान-मोठय़ा देशांना जवळ करण्याचा चीनचा प्रयत्न असतो. शेख हसीना यांच्या विजयामुळे भारत आणि बांगलादेशचे संबंध येणाऱ्या वर्षांत अधिक मजबूत होतील.