दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील दावा मागे घेतला याचा अर्थ शिंदे गटाने लढतीपूर्वीच मैदान सोडले असा काढण्याची काहीही गरज नाही. किमान सणासुदीच्या काळात तरी राजकारण नको हाच उदात्त हेतू यामागे आहे. त्यामुळे ही उपरती कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकताच नाही. ठाकरे गटाने या मैदानासाठी जूनमध्येच अर्ज करून ठेवला, सत्तेच्या कैफात धुंद असलेल्या शिंदे गटाला आधी अर्ज करण्याचे सुचले नाही असा तर्कसुद्धा नको. वाद न्यायालयात गेला तर पुन्हा तोंडावर आपटावे लागेल या भीतीने माघार घेतली यातही तथ्य नाही. गेल्या वर्षी हा वाद वाढत गेला, त्यामुळे राज्यातील जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचली व लोक दोन्हीकडच्या गर्दीची तुलना करू लागले. त्यात ठाकरेंनी बाजी मारल्याचे चित्र निर्माण झाले. यंदा हे टाळावे म्हणून माघार घेतली हा युक्तिवादसुद्धा बिनबुडाचा ठरेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ : निवृत्तिवेतन योजनेचा मध्यममार्ग?

गेल्या वर्षी ठाकरेंच्या तुलनेत शिंदेंचे भाषण खूप रटाळ झाले, त्यांना प्रतिटोमणेसुद्धा बरोबर मारता आले नाहीत. राज्यभर बसेस पाठवून गर्दी गोळा करावी लागली, तीही कमीच भरली, त्यामुळे यंदा वाद उभा राहण्याआधीच अंग काढून घेतले हा दावासुद्धा चुकीच्या गृहीतकावर आधारलेला. आता एक पाऊल मागे घेतले, उद्या दोन पावले पुन्हा मागे येतील व दोन्ही गटात मनोमीलनाचा मार्ग लवकरच मोकळा होईल असा भाबडा आशावाद व्यक्त करण्याची तर गरजच नाही. गेल्यावर्षी हा वाद वाढवत नेला पण सहानुभूती ठाकरे गटाला मिळाली म्हणून यावेळी काढता पाय घेतला हे विधानसुद्धा तद्दन खोटे! या माघारीमुळे मातोश्रीला सळो की पळो करून सोडायचे या दिल्लीश्वरांनी दिलेल्या एककलमी कार्यक्रमात खंड पडला असा निष्कर्ष कुणी काढूच नये. लढाईत एक पाऊल मागे घेतले म्हणजे पराभवाची चाहूल लागली, असे तर्कटही मांडूच नये. शिवाजी पार्क व ठाकरेंचा दसरा मेळावा हे समीकरण पुढेही कायम राहील असे भाकीत वर्तवण्याची सुद्धा घाई नको.

हेही वाचा >>> आधुनिकता आली, समानता नाही!

गेल्या वर्षी न्यायालयीन लढाईत बराच वेळ गेला त्यामुळे बीकेसीवर पूर्ण क्षमतेने तयारी करता आली नाही, यंदा ही कसर भरून काढण्यासाठी तोंडी लागणे टाळले हा युक्तिवादही चुकीचा. सत्तेच्या बळावर कुणालाही नमवता येते, विरोधकांना जेरीस आणता येते असे सार्वत्रिक वातावरण असताना अचानक नांगी टाकण्याचे कारण काय हा प्रश्नही पूर्णपणे गैरलागू. या माघारीचे खरे कारण शिंदेंच्या उदार अंत:करणात दडले असून त्याची वाच्यता ते क्रॉस मैदानावरील मेळाव्यात करतीलच. महाराष्ट्राच्या मंगलभूमीत सहिष्णुता वाढीला लागावी, शिंदे हेच सहिष्णू राजकारणाचे जनक अशी त्यांची प्रतिमा निर्माण व्हावी व त्याचा फायदा त्यांना भावी काळात व्हावा हाच हेतू या माघारीमागे आहे. कायम तलवार उपसून युद्धाच्या आवेशात वावरणाऱ्या ठाकरे गटाला हा अर्थ कळत नसेल, जिंकल्याचा जल्लोष ते आतापासून करत असतील तर राहू द्या त्यांना त्या  खुमखुमीत. घोडा मैदान शिंदे गटच मारेल हे मात्र लक्षात ठेवा!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde led shiv sena withdraws claim over shivaji park to hold dussehra rally zws
Show comments