सह्याद्रीच्या कडेकपारीत बालपण गेले… साताऱ्यातील पुसेगाव येथे लहानाची मोठी झाल्यामुळे डोंगरदऱ्यांत फिरणे लहानपणापासूनच त्यांच्या अंगवळणी पडले होते. त्यामुळे गिर्यारोहणाची आवड होतीच. शिवाय अॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवायची होती. पण कारकीर्दीला एका क्षणी असे वळण लागले की त्यांची पावले कबड्डीच्या मैदानाकडे वळली, ती कायमचीच आणि उदयाला आली अवघ्या कबड्डी विश्वाला भुरळ घालणारी शकूताई म्हणजेच शकुंतला खटावकर.
पुसेगावच्या सेवागिरी शाळेतून शकुंतला पुण्यात शिक्षणासाठी आल्या, तशी त्यांच्या अॅथलेटिक्सच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. प्रशिक्षक दामले सरांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवात झाली. गरवारे नायलॉन कंपनीच्या अॅथलेटिक्स क्लबकडून तेव्हा त्या १०० मीटर, २०० मीटर, रिले शर्यत तसेच थ्रो प्रकाराचा सराव करायच्या. पुढे दामले सरांचे निधन झाले आणि शकुंतला अॅथलेटिक्सपासून दूर झाल्या. तेव्हा, पुण्यात राणा प्रताप संघाचा दबदबा होता. याच संघाचे चंद्रकांत केळकर यांनी शकुंतला यांना कबड्डीच्या मैदानाची ओळख करून दिली. जवाहिऱ्याने एखाद्या हिऱ्याला पैलू पाडावेत, तसे केळकर सरांनी शकुंतला यांच्यातील कबड्डीपटूला पैलू पाडले. जे सांगितले जाईल ते लगेच आत्मसात करण्याची वृत्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच शकुंतला यांनी कबड्डीत आपला दरारा निर्माण केला. मध्यरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतानाच खोलवर चढायांनीदेखील त्यांनी अनेक मैदाने गाजवली.
कबड्डीला सुरुवात केल्यावर १९७१-७२ मध्ये त्यांना स्पर्धेसाठी पुण्याबाहेर म्हणजे मुंबईला यावे लागले. अखिल भारतीय मुंबई महापौर स्पर्धा होती. राणा प्रताप संघाची गाठ विश्वशांती संघाशी होती. छाया बांदोडकर, शैला रायकर अशा नामवंत खेळाडू विश्वशांती संघात होत्या. तेव्हा शकुंतलांच्या पहिल्याच चढाईत शैला फिरल्या…बघता क्षणी शैला मध्यपार्टीवर आणि शकुंतला वर होत्या. उठताना शैला रायकरांनी शकूताईंची पाठ थोपटली आणि सामना संपल्यावर त्या केळकर सरांना म्हणाल्या, ‘सर महाराष्ट्राला एक चांगला अष्टपैलू खेळाडू तुम्ही देत आहात.’
या पावतीने शकूताईंना वेगळेच स्फुरण चढले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. राज्य अजिंक्यपद आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा असा त्यांचा प्रवास वेगात सुरू झाला. शकूताईंच्या खेळाने कबड्डीची मैदाने दणाणून जात होती. कबड्डीच्या मैदानात त्यांना जणू प्रतिस्पर्धीच नव्हता इतका दरारा त्यांनी निर्माण केला होता. त्यामुळे शकूताई ज्या संघातून खेळायच्या तो संघ सामना एकतर्फी जिंकायचा. प्रतिस्पर्धी संघाला संधीच मिळायची नाही. त्यांच्या खेळाचा झपाटा इतका होता की तेव्हा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी पश्चिम बंगालच्या मोनिका नाथ यांचे वादळ लीलया रोखले होते.
मैदानावर शकुंतला यांचा वावर एखाद्या तुफानासारखा होता. हे तुफान मैदानावर कुणीच रोखू शकले नाही. शकूताई मैदानात उतरणार म्हटले की प्रतिस्पर्धी संघाचे निम्मे अवसान गळालेले असायचे. पदलालित्य, चपळाई, जोश, भेदक नजर, कणखर पंजा ही त्यांची मुख्य अस्त्रे होती. त्यांच्या खेळाची दखल प्रथम महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवले आणि नंतर केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. कबड्डी कारकीर्द सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शकूताईंनी १९८२ मध्ये अलेप्पी येथील राष्ट्रीय स्पर्धेनंतर निवृत्ती घेतली. पण त्यानंतरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. प्रशिक्षक, संघटक अशा विविध पातळ्यांवर त्या कबड्डीशी जोडलेल्या राहिल्या. आज वयाच्या ७४व्या वर्षीही त्या तेवढ्याच जोशात कार्यरत आहेत. महाराष्ट्राची पीछेहाट पाहून त्यांचे मन दुखावते. महाराष्ट्राला कबड्डीत पूर्वीसारखेच सक्षम करण्याचा त्यांचा ध्यास आहे आणि त्यासाठी वयाच्या शंभर वर्षांपर्यंत कार्यरत राहण्याची त्यांची इच्छा आहे.