नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरू असताना अधिष्ठात्यांना जबरदस्तीने शौचालय साफ करण्यास लावण्याची शिवसेनेचे शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची कृती नुसती निंदनीय नाही तर लोकप्रतिनिधी किती असंवेदनशील असू शकतात याचे ते एक बोलके उदाहरण ठरते. रुग्णालयात बालकांसह अन्य रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या अधिष्ठात्यांना जबरदस्तीने शौचालय साफ करण्यास लावून खासदार पाटील यांनी लोकप्रतिनिधित्वाचा आब राखण्यास आपण किती नालायक आहोत हे दाखवून दिले. नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंस जबाबदार कोण वा त्याची कारणे काय याच्या खोलात जाण्याची ही वेळ नाही. कारण दोन दिवसांमध्ये ५०च्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाल्यावर दाखल असलेल्या सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळतील आणि त्यांचे प्राण वाचतील याला प्राधान्य देणे गरजेचे. ‘खासदार-आमदार म्हणजे आपल्याला सारे काही माफ’ अशी डोक्यात हवा गेलेल्या लोकप्रतिनिधींना आवरणार कोण? भले अधिष्ठाता चुकले असतील वा त्यांचे कामात लक्ष नसेल, पण एकीकडे मृत्यूचे थैमान सुरू असताना सत्ताधारी पक्षाचा खासदार असा आचरटपणा करतो आणि त्यावर सरकारमधील उच्चपदस्थ दोन दिवस उलटले तरी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत हे तर आणखी गंभीर. विरोधकांकडून जरा काही खुट्टं झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून आशीष शेलार ते भाजपची गल्लीतील नेतेमंडळी टीकाटिप्पणी, राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सज्जच असतात. पण महायुतीतील एक खासदार आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने शौचालय साफ करण्यास लावतो तेव्हा भाजपची पत्रकबाज नेतेमंडळी गप्प का? खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील. आपल्या पक्षाच्या खासदाराने लाजिरवाणे कृत्य केल्यावर मुख्यमंत्र्यांकडून निषेधाचा साधा सूर उमटेल अशी अपेक्षा होती, पण तीही फोल ठरली. आता बरीच ओरड झाल्यावर खासदारांवर गुन्हा दाखल झाला. पण त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले किंवा ‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेला आंदोलनाचा इशारा द्यावा लागला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा