महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांबरोबरच १५ राज्यांमधील ४८ विधानसभा, तर दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचे काही निकाल धक्कादायक लागले आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवल्याने, प्रियंका गांधी या गांधी घराण्यातून संसदेत प्रवेश करणाऱ्या सहाव्या सदस्या ठरल्या. नांदेड मतदारसंघात विजयासाठी काँग्रेसला कडवी लढत द्यावी लागली. काँग्रेसने लोकसभेतील दोन्ही जागा राखल्या, ही पक्षासाठी समाधानाची बाब. विधानसभेच्या पोटनिवडणुकांपैकी उत्तर प्रदेशमधील लढती अधिक उत्कंठापूर्ण ठरल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपची चांगलीच पीछेहाट झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजदपचे संख्याबळ २९ने घटून भाजपला फक्त ३३ खासदारांवरच समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या नऊ मतदारसंघांतील पोटनिवडणूक ही योगींनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या नऊपैकी भाजप आणि मित्रपक्षाला सात, तर समाजवादी पार्टीला दोन जागा मिळाल्या. २०२२च्या तुलनेत भाजपला दोन अधिक जागा मिळाल्या आहेत. यापैकी एक अल्पसंख्याक- बहुल मतदारसंघ होता. तिथे भाजपला कधीच यश मिळाले नव्हते. पण मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा झाला. योगींची ‘बटेंगे तो कटेेंगे’ ही घोषणा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला फायदेशीर ठरली. याउलट ‘पिछडा, दलित, अल्पसंख्याक’ (पीडीए) हे समाजवादी पार्टीचे लोकसभेत यशस्वी ठरलेले सूत्र पोटनिवडणुकांमध्ये कामी आले नाही. लोकसभेपाठोपाठ पोटनिवडणुकांतही पराभव झाला असता तर योगी आदित्यनाथ यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असता, पण वातावरण बदलण्यात योगी यशस्वी ठरले.

हेही वाचा >>> ‘लाडकी बहीण’ला प्रत्युत्तर देण्यात अडथळा कोणाचा?

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसुरूमधील जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून अडचणीत आले आहेत. लोकायुक्त, ईडी या यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे आहे. सिद्धरामय्या यांना बदलण्याची मागणी काँग्रेसमधून केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघांमधील पोटनिवडणुका जिंकून सिद्धरामय्या यांनी पक्षांतर्गत विरोधकांची तोंडे सध्या तरी बंद केली आहेत. विशेष म्हणजे बसवराज बोम्मई आणि कुमारस्वामी या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघांत उभय माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा काँग्रेसने पराभव केला. काँग्रेसने एक जागा कायम राखली, तर दोन अधिक जागा पक्षाच्या पदरात पडल्या आहेत. सिद्धरामय्या यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरतो. पश्चिम बंगालमध्ये ‘आर. जी. कार रुग्णालया’तील एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी राग आजही धुमसतो आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदुखी ठरले होते. पण राज्यात पोटनिवडणुका झालेल्या सहाही मतदारसंघांत ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. सहापैकी पाच मतदारसंघांत तृणमूलचे आमदार होते. त्यांची लोकसभेवर निवड झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. यापैकी एक जागा २०२१ मध्ये भाजपने जिंकली होती, पण त्या मतदारसंघातही तृणमूलच्या ‘दोन फुले’ या निवडणूक चिन्हातील गवतफुले फुलली आहेत.

महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या हे प्रकरण गंभीर असले तरी भाजपने ज्या पद्धतीने तापविले होते त्यावरून ममता बॅनर्जींना पोटनिवडणुकीत फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण लोकसभेपाठोपाठ आता पोटनिवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची ताकद वाढली आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच राजस्थानातही लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्याने नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, पण सातपैकी पाच मतदारसंघांतील भाजप व शर्मा यांना दिलासा मिळाला आहे. बिहारमधील चारही जागा सत्ताधारी रालोआने जिंकल्यामुळे, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपला ताकद मिळाली आहे. राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक रिंगणात उतरलेले ‘निवडणूक रणनीतीकार’ प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या उमेदवारांना आपली अनामतही वाचवता आलेली नाही. पंजाबमध्ये काँग्रेसकडून खेचलेल्या तीन मतदारसंघांतील विजय ‘आप’ आणि मुख्यमंत्री भगवान मान यांना दिलासाजनकच आहे. पोटनिवडणुकांमध्ये साधारणपणे नेहमीच सत्ताधारी पक्षाची सरशी होते ही परंपरा यंदाही कायम राहिली. फक्त योगी, सिद्धरामय्या, ममता बॅनर्जी वा राजस्थानचे भजनलाल शर्मा या सर्वांचे आसन अधिक भक्कम झाले हाच या निकालांचा अर्थ काढता येईल.

Story img Loader