महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांबरोबरच १५ राज्यांमधील ४८ विधानसभा, तर दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचे काही निकाल धक्कादायक लागले आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवल्याने, प्रियंका गांधी या गांधी घराण्यातून संसदेत प्रवेश करणाऱ्या सहाव्या सदस्या ठरल्या. नांदेड मतदारसंघात विजयासाठी काँग्रेसला कडवी लढत द्यावी लागली. काँग्रेसने लोकसभेतील दोन्ही जागा राखल्या, ही पक्षासाठी समाधानाची बाब. विधानसभेच्या पोटनिवडणुकांपैकी उत्तर प्रदेशमधील लढती अधिक उत्कंठापूर्ण ठरल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपची चांगलीच पीछेहाट झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजदपचे संख्याबळ २९ने घटून भाजपला फक्त ३३ खासदारांवरच समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या नऊ मतदारसंघांतील पोटनिवडणूक ही योगींनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या नऊपैकी भाजप आणि मित्रपक्षाला सात, तर समाजवादी पार्टीला दोन जागा मिळाल्या. २०२२च्या तुलनेत भाजपला दोन अधिक जागा मिळाल्या आहेत. यापैकी एक अल्पसंख्याक- बहुल मतदारसंघ होता. तिथे भाजपला कधीच यश मिळाले नव्हते. पण मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा झाला. योगींची ‘बटेंगे तो कटेेंगे’ ही घोषणा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला फायदेशीर ठरली. याउलट ‘पिछडा, दलित, अल्पसंख्याक’ (पीडीए) हे समाजवादी पार्टीचे लोकसभेत यशस्वी ठरलेले सूत्र पोटनिवडणुकांमध्ये कामी आले नाही. लोकसभेपाठोपाठ पोटनिवडणुकांतही पराभव झाला असता तर योगी आदित्यनाथ यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असता, पण वातावरण बदलण्यात योगी यशस्वी ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा