डॉ. उज्ज्वला दळवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औषधांच्या ‘साइड इफेक्ट्स’विषयी वाचून घाबरून जाण्याची गरज नाही. शिवाय, हेच आड-परिणाम अन्य आजारांत उपकारक ठरू शकतात..

‘‘अगंबाई! क्रोसिनमुळे लिव्हरला गंभीर अपाय होतो! नकोच ते! त्यापेक्षा मी वेदना सहन करीन. पण आत्तापर्यंत मी इतक्या वेळा क्रोसीन घेतलं. म्हणजे बऱ्यापैकी इजा आधीच झाली असणार!’’ व्हॉट्सअ‍ॅपमास्तरांची सुलिखितं वाचून कृती घाबरली होती.

पण रजत तर औषधासोबत आलेलं माहितीपत्रक वाचूनच सर्द झाला होता. साधं अँटिबायोटिक घेतलं की जळजळ, जुलाब, चक्कर, धडधड वगैरे बरंच काही होऊ शकेल असं त्या माहितीपत्रकातच म्हटलं होतं!

प्रत्येक औषध बाजारात येण्यापूर्वी त्याची सत्त्वपरीक्षा घेतली जाते. हजारो माणसांवर प्रयोग होतात. त्या चाचण्यांत औषधाच्या सुरक्षिततेवर भर दिला जातो. त्याचे दुष्परिणाम गंभीर असले तर ते सुरुवातीच्या अग्निपरीक्षेतून पार होऊन बाजारात येतच नाहीत.

औषध बाजारात आल्यावर लाखो लोक ते घेतात. तेव्हा त्याचे अनेक नवे परिणाम समजतात. काही परिणाम हटकून दहापैकी एखाद्-दुसऱ्याला तरी होतातच. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे शंभरात एखाद्याला बारीकसारीक कुरबुरी होतात. काही परिणाम हजारात एखाद्याला भोवतात आणि काही अगदी क्वचित, लाखात एखाद्यालाच मोठा त्रास देतात.  सांगितलेल्या प्रमाणाबाहेर औषध घेतलं तर मोठा दुष्परिणाम  होऊ शकतो. माहितीपत्रकात बहुतेकदा तशी वर्गवारी दिलेली असते. 

सतत चालू असलेल्या संशोधनामुळे कालपर्यंत पूर्णपणे निरुपद्रवी वाटणाऱ्या औषधाचे घातक दुर्गुण आज ध्यानात येतात. ते सगळे परिणाम औषधासोबतच्या माहितीपत्रकावर नोंदवणं ही औषधकंपन्यांची कायदेशीर जबाबदारी असते. त्यामुळे त्या आड-परिणामांची (साइड इफेक्ट्स) यादी लांबलचक होते. जागरूक रुग्ण ती वाचून धास्तावतो.

पारंपरिक औषधांवर तसे निर्बंध नाहीत. त्यामुळे त्यांना आड-परिणामच नाहीत असा गैरसमज होतो. पण तीही औषधं वैद्यांच्या सल्ल्याशिवाय किंवा हौशी वैदूंकडून घेतली तर त्यांचेही दुष्परिणाम होऊ शकतात. जड धातूंची विषबाधा होऊन किडनी, नसा वगैरेंना मोठी इजा होते. कित्येकदा स्वत:च घेतलेली पौष्टिक पेयं, आजीबाईच्या बटव्यातली औषधं, काढे यांचेही गंभीर परिणाम होऊ शकतात. तशा औषधांचेही वाईट आड-परिणाम किंवा गंभीर दुष्परिणाम लक्षात आले तर ते आवर्जून नोंदवले जायला हवेत.

‘‘कसली मेली जालीम औषधं दिली मला! माझं रक्तच आटवलं त्यांनी! पार वाट लावली माझी,’’ ललीताई औषधांच्या नावाने खडे फोडत होत्या. त्यांना काही वर्षांपूर्वी गंभीर मलेरिया होऊन गेला होता. मलेरियामुळे रक्तपेशी फुटतात, अ‍ॅनिमिया होतो, फार थकवा येतो. मलेरियावरची औषधं ताईंना देणं गरजेचंच होतं. ताईंनी त्यांची माहितीपत्रकं वाचली. त्यांच्यातल्या दुष्परिणामांच्या मारुतीच्या शेपटात त्यांना अ‍ॅनिमिया सापडला. त्यांनी सगळं खापर औषधांवर फोडलं.

अलीकडे ललीताईंना पुन्हा ताप, थकवा सुरू झाला. पुन्हा औषधं घ्यावी लागतील म्हणून त्यांनी कित्येक दिवस तो आजार दडवला. त्यांच्या तापासाठी मुलीने बळजबरीने क्रोसिन दिली. ती गिळल्यावर ताई भयाने गळाठून गेल्या. त्यांना मानसोपचाराची गरज लागली. त्यानंतरच ताई तपासणीला राजी झाल्या. कॅन्सरचं निदान व्हायला उगाच उशीर झाला.

गुणकारी औषधं बादच करून कसं चालेल? ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर,’ असं असूनही आपण तव्यावर भाकरी करतोच ना! दुभती गाय लाथ मारते, म्हणून तिचं दूध काढायचं कुणी बंद करत नाही. आणि औषधांच्या बाबतीत तर गायीची लाथ जिव्हारी बसणार नाही, याची खात्री केलेली असते.

शिवाय आड-परिणाम प्रत्येक गोष्टीला असतात. तिळाचे लाडू हादडले, अळूची पात्तळ भाजी भुरकली की पोट बिघडतं. कुरकुरीत, चटकमटक सामोशांनी जळजळ होते. तसेच प्रत्येक औषधालाही अपेक्षित आड-परिणाम असतात. 

‘‘आई, माझ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस लाल झाल्या आहेत! आणि लघवीतून रक्त जातंय. रडल्यावर अश्रूसुद्धा लाल येतात! टीबी सगळीकडे पसरलाय का?’’ मिलीताला फोनवर हुंदका आवरत नव्हता. तिच्यावर नुकतेच क्षयरोगाचे उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांच्यातल्या एका औषधाच्या अंशामुळे अश्रू-थुंकी-लघवी सगळं लाल होतं. ते रक्त नसतं. मिलीताने माहितीपत्रक न वाचल्यामुळे तिचं धाबं दणाणलं. आईच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला ते नीट समजावून सांगितलं.

फॅमिली डॉक्टर फापटपसाऱ्यात न शिरता गरजेच्या मोजक्या गोष्टी सांगतात. ‘सर्दीच्या औषधाने झोप येईल. गाडी चालवू नका’, ‘ब्लडप्रेशरच्या या गोळय़ा सुरू केल्यावर पटकन उठून उभं राहू नका. चक्कर येऊन पडायला होईल’, ‘ब्रुफेनची गोळी रिकाम्या पोटी घेऊ नका. जळजळ होईल’. त्यांनी एखादं औषध गुणकारी म्हटलं की ते पटतं. का होतात तसे आड-परिणाम?

औषधांचे मूलकण रक्तात शिरल्यावर आपले हात पसरून प्रवास करतात. मानवी शरीरातल्या पेशींचे हातसुद्धा पसरलेले असतात. औषधांच्या आणि पेशींच्या हातांची मापं जुळली की पकड घट्ट होते. औषध तिथे थांबून काम करतं. पण बऱ्याचशा औषधांना वेगवेगळय़ा मापांचे हात असतात. एका हाताने नाकाच्या पेशीशी शेकहँड केला तर दुसरा मेंदूतल्या केंद्राशी, तिसरा लाळेच्या ग्रंथींशी हस्तांदोलन करतो. सर्दी बरी होते पण झोपही येतेच, तोंडाला कोरड पडतेच. 

कधीकधी एका आजारासाठी वापरात असलेल्या औषधाचा आड-परिणाम दुसऱ्याच आजारासाठी उपाय म्हणून प्रभावी ठरतो. त्याच औषधाचा नवा अवतार बाजारात येतो.

अ‍ॅस्प्रो ऊर्फ अ‍ॅस्पिरिन हे डोकेदुखीवरचं जुनंपुराणं गुणकारी औषध. त्याच्या आड-परिणामाने रक्त पटकन गोठत नाही, रक्तस्राव वाढतो. तोच आड-परिणाम संशोधकांनी गुण म्हणून वापरला. हृदयविकारात  हृदयाच्या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळय़ा होतात. अ‍ॅस्पिरिनच्या आड-परिणामामुळे तशा गुठळय़ा होत नाहीत. अलीकडे डोकेदुखीपेक्षा हृदयविकारासाठीच अ‍ॅस्पिरिन अधिक वापरलं जातं.

थॅलिडोमाइड नावाचं औषध १९६०-६१मध्ये उलटय़ांवरचा उत्तम उपाय म्हणून बाजारात आलं. ४६ देशांतल्या लाखो गर्भवतींनी ते घेतलं. थॅलिडोमाइडने त्यांच्या गर्भामध्ये हातापायांच्या रक्तवाहिन्या अंकुरायलाच दिल्या नाहीत. हातपाय बनलेच नाहीत. हजारो मानवी दंडगोल जन्माला आले. जगात हाहाकार माजला. थॅलिडोमाइडवर बंदी आली. त्याचा तोच दुर्गुण कर्करोगाच्या उपचारांत वरदान ठरला. त्याच्यामुळे कर्करोगाच्या गाठींमधल्या रक्तवाहिन्यांची वाढ थांबली. कर्करोग आटोक्यात आला. गर्भघातक औषध कर्कमारक ठरलं.

व्हायाग्रा हे सर्वश्रुत औषध आधी रक्तदाबावरचा इलाज म्हणून अवतरलं. नंतर ते वैवाहिक सौख्याचा आधार बनलं आणि आता तेच औषध फुप्फुसांच्या रक्तवाहिन्यांच्या आजारावर उत्तम उपाय ठरलं आहे. प्रोस्टेटची वाढ कमी करणारं एक औषध मर्दानी टकलाला नव्या केशसंभाराने सजवतं. एकाच औषधाचा एक हात तारतो, दुसरा सौम्यपणे मारतोही. 

आता संशोधक एकेका औषधाच्या वेगवेगळय़ा हातांचा अभ्यास करून, त्या हातांचे आकार हवे तसे बदलायच्या प्रयत्नांत आहेत. प्रयोगशाळेत घासून पुसून एकच परिणामवाले हात असलेली औषधं बनतील. त्यांना आड-परिणाम नसतील. किंवा एका रोगाच्या उपचाराच्या वेगवेगळय़ा गरजांसाठी लागणाऱ्या सगळय़ा आकारांचे चपखल हात एकाच औषधाच्या मूलकणांत  बसवता येतील. एका आजाराला एकच औषध देऊन भागेल. 

औषधाचा कुठला परिणाम अधिक प्रभावी होईल ते ज्या त्या व्यक्तीच्या जनुकांवर अवलंबून असतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्यात प्रत्येक माणसाची जनुक-कुंडली मांडणं सोपं होईल. मग त्या कुंडलीशी औषधाची ‘हस्त’-कुंडली कशी जुळते ते बघता येईल. आड-परिणामांच्या, दुष्परिणामांच्या कटकटींनी संभवणाऱ्या त्रासाचे आडाखे आधीच बांधता येतील. ‘जे ज्या सोसे ते त्या द्यावे’ या तत्त्वानुसारच उपचार होतील.

पण तोपर्यंत कुठलंही नवं औषध घेण्यापूर्वी त्याचं माहितीपत्रक नीट वाचावं. वाटलं तर ‘या औषधाने गंभीर अपायाची शक्यता किती?’, ‘माझ्या इतर औषधांशी त्याची कशी मारामारी होऊ शकते?’ वगैरे अधिक माहिती फॅमिली डॉक्टरांकडून, विश्वासार्ह ठिकाणांहून गोळा करावी. मोठा त्रास नव्याने उद्भवला तर औषधाला दोष देण्यापूर्वी तो मूळ आजाराचाच भाग नाही ना याची शहानिशा करावी. क्वचित आढळणारे दुष्परिणाम आणि एरवीचे लहानसहान अटळ आड-परिणाम यांच्यातलं तारतम्य जाणावं.  तेवढय़ासाठी गुणकारी औषध बाद करू नये.  थोडं जमवून घेतलं तर प्रपंच सुखाचा होतो. त्यासाठी छत्तीस गुण जुळायची गरज नसते.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Side effects of drugs can be beneficial in other diseases beneficial side effects of drugs zws
Show comments