स्लोअर शहाणे वयाच्या विशीच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या इतर अनेक समवयस्कांप्रमाणेच त्याच्याही मनात करिअरबद्दल वेगवेगळे विचार येऊ लागले, तेव्हा विसावे शतक संपत आले होते. एरवी एकसंध, एकसाची असलेला मध्यमवर्ग जागतिकीकरणानंतर बहुविध, बहुपेडी होऊ लागला होता. साचलेपण वाहते झाले; पण प्रवाह सर्वांना बरोबर घेऊन वाहणारा राहिला नाही. छोटेमोठे ओहोळ आपापल्या वकुबांप्रमाणे स्वतंत्रपणे झरू लागले. मध्यमवर्ग या एकाच वर्गात अनेक उपवर्ग निर्माण होण्याची ती सुरुवात होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘एप्रिलमधल्या उन्हाने सावल्या करपू लागल्या, तेव्हा ग्लोबल वॉर्मिंग सुरू झाले. रोजचा दिवस उगविण्याऐवजी अंगावर आदळायला लागतो, तेव्हा आयुष्यातून प्रांजळ उन्हाचा ऋतू वजा होऊन उन्हाने अंगाची लाही होते आणि मनाला उकळी छळते.’ स्लोअर शहाणेच्या रोजदिनीतील ही नोंद तशी अलीकडची. पर्यावरणतज्ज्ञांना भेटल्याने, त्यांची भाषणे, परिसंवाद ऐकल्याने स्लोअरचा ‘ग्लोबल वॉर्मिंग’वर विश्वास बसायला लागला होता, असे तुम्हाला ही नोंद वाचून वाटेल कदाचित. पण, तसे अजिबात नाही. ‘उन जरा जास्त आहे, दर वर्षीच वाटतं’ या कवितेतील ओळ स्लोअरच्या नेणिवेत आधीच कधीपासून तरी असणार. कारण, ग्लोबल वॉर्मिंगच्या शास्त्रीय चिकित्सेत न जाता, हवेचा कानोसा घेऊनच तो थंडी, पाऊस, उन्हाची तीव्रता ठरवत असे, पर्यावरणीय व्याख्यांवर नाही. त्यामुळे, शरीराने जाणिवेच्या रूपाने दिलेल्या निरोपावर तो ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा निष्कर्ष काढेल, असे होणार नव्हते. म्हणजे, हे नक्की काही तरी मानसिक असणार!
या म्हणण्याला दुसरा आधार असा, की कमावते वगैरे झाल्यावर चारचौघांत त्या ‘कमावतेपणाचे आकलन’ पाजळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’वरची चर्चाही याच गांभीर्याने करायची असते, हे स्लोअरला आताशा कळू लागले होते. त्यामुळे, ‘ग्लोबल वॉर्मिंग’वरची नोंद हा या ‘गांभीर्या’चा दाखला असेल, असेही म्हणता येत नाही. वय वाढल्याच्या काही खुणा असतात, त्यातली एक खूण म्हणजे ही नोंद, एवढेच खरे तर त्या नोंदीबाबतचे कारण म्हणता येईल. म्हणूनच ती मानसिक! स्लोअर शहाणेच्या आयुष्यातील एप्रिल महिन्याला छोटासाच; पण इतिहास असल्याने दर एप्रिलमध्ये त्याच्या रोजदिनीतील नोंदींना या इतिहासाचे ऊन न सोसवून थिजलेल्या वर्तमानाच्या सावलीत जावेसे वाटते! त्यावर विचार करण्याची सुरुवात फेब्रुवारी अखेरीपासून होते, हे स्लोअरच्या आयुष्याचा हा लोलक खेचून मागे आणण्याचे औचित्य. म्हणजे, खूप पुढे जाताना मागेही जरा जास्त यावे लागते, तसे.
तर, फेब्रुवारीत विचार सुरू होणाऱ्या एप्रिलच्या या इतिहासाबद्दल. त्याचे झाले असे, की स्लोअर शहाणे वयाच्या विशीच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या इतर अनेक समवयस्कांप्रमाणेच त्याच्याही मनात करिअरबद्दल वेगवेगळे विचार येऊ लागले, तेव्हा विसावे शतक संपत आले होते. एरवी एकसंध, एकसाची असलेला भारतातला मध्यमवर्ग जागतिकीकरणानंतर बहुविध, बहुपेडी होऊ लागला होता. साचलेपण वाहते झाले; पण प्रवाह सर्वांना बरोबर घेऊन वाहणारा राहिला नाही. छोटे-मोठे ओहोळ आपापल्या वकुबांप्रमाणे स्वतंत्रपणे झरू लागले. मध्यमवर्ग या एकाच वर्गात अनेक उपवर्ग निर्माण होण्याची ती सुरुवात होती. याचे वैशिष्ट्य असे, की या सर्वांचा नजीकचा इतिहास सारखा असला, तरी वर्तमानाचे वसाहतीकरण होऊ लागल्याने भविष्याला स्वतंत्र बेटांच्या अस्तित्वाची चाहूल लागली होती. समृद्धीच्या पाऊलखुणा दाखविणाऱ्या वाटेवर ‘जगणे’ (बदलांचा फार काही विचार न करता, मिळेल ते पदरात घेत सरळसोट फक्त जात राहणे), ‘योग्य जगणे’ (बदलांचा विचार वगैरे करून आपल्याला हवे ते मिळविण्याच्या दिशेने जाणे) आणि ‘चांगले जगणे’ (बदलांना आपल्या कलेने आणखी थोडे बदलून, प्रसंगी चलाखीने मार्गक्रमण करत राहणे) अशा तिठ्यावर मध्यमवर्ग येऊन थांबल्याचा तो काळ होता.
स्लोअर शहाणे हा मुळातच ‘स्लोअर’ असल्याने त्याला या तीनपैकी एकाही वाटेच्या वाटेला जाण्याचा निर्णय बराच काळ घेता आला नाही आणि तो त्या तिठ्यावर घुटमळत बसला. तरीही या सगळ्या दरम्यान स्लोअर शहाणेच्या अत्यंत छोट्या जगात छोटीशीच का होईना; पण खळबळ माजून गेली, ती त्याने घेतलेल्या एका ‘निर्णया’नेच! ‘शोध स्वत:चा… समाजाचा’ या शिबिरातून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्याच्या जगण्यातली विसंगती स्लोअर शहाणेने स्वत: अनुभवली असली, तरी या शिबिरामुळे त्याच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडली होती; ती म्हणजे, वयाच्या अठराव्या वर्षी रुढार्थाने प्रौढ झाल्यानंतर आपला निर्णय आपल्याला घेता येण्याची मुभा असते, हे विशीच्या उंबरठ्यावर का होईना; पण त्याला उमजले होते. ‘निर्णय घेण्याची मुभा असते, तर ती मुभा वापरण्याचा निर्णय मी घेणार,’ असा निर्णय स्लोअर शहाणेने घेतला आणि त्याच्या आयुष्यात खळबळ माजली.
स्लोअर शहाणेच्या या निर्णयाचे त्याच्या आयुष्यातील महत्त्व समजून घ्यायचे, तर हे लक्षात घेतले पाहिजे, की त्याच्या आधीच्या आयुष्यात त्याला एकच निर्णय मर्यादित स्वरूपात घ्यायची मुभा होती. तो म्हणजे, कामानिमित्त आई-बाबा बाहेर गेलेले असताना, भूक लागली, तर कपाटात एका विवक्षित ठिकाणी ठेवलेले दोन रुपये घेऊन किराणा मालाच्या दुकानात जाऊन ग्लुकोज बिस्किटांचा पुडा आणणे. या पार्श्वभूमीवर स्लोअर शहाणेने कॉलेजच्या अंतिम परीक्षेत दोन पेपर चक्क न सोडविण्याचा घेतलेला निर्णय साहजिकच त्याच्या मर्यादित जगाच्या दृष्टीने क्रांतिकारी होता. (आता खरे तर यातही एक व्यवहारीपणा होता. पहिल्या वर्षाला सहापैकी दोन विषय नाही सुटले, तरी दुसऱ्या वर्षात जाता येण्याची अडचण नव्हती. त्यामुळे, वर्ष राहिल्याचा शिक्का न बसण्याची पुरेपूर काळजी ‘शहाण्या’ स्लोअरने घेतली होती.) हा निर्णय घ्यायला त्याला बळ मिळाले होते, ते एप्रिलमध्ये परीक्षा होण्यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतल्या सहभागामुळे…
पण, त्या आधी त्याही पूर्वीचे एक उपकथानक सांगायला हवे. त्याचे झाले असे होते, की स्लोअर ज्या विद्याशाखेत शिकत होता, ती काही त्याला आवडत नव्हती. व्यावहारिकदृष्ट्या पाहायचे, तर वर उल्लेख केलेल्या तिठ्यातल्या किमान ‘जगणे’ या वाटेला घेऊन जाईल, इतक्या क्षमतेची स्लोअरची शाखा होती; पण स्लोअर तिथे फक्त घुटमळत राहिल्याने त्याला त्याचे इतकेही आकलन झाले नाही. आणखी एक म्हणजे, या शाखेचा अभ्यास त्याला फारसा जमत नव्हता, हेही खरे तर शाखा न आवडण्याचे एक कारण होतेच; पण स्लोअर मध्यमवर्गीय असल्याने त्याने ‘अक्षमते’पेक्षा नावड या कारणावर अधिक भर दिला. याचमुळे त्याने चूक काय केली, तर हे तो आजूबाजूच्यांना सांगत सुटला. साहजिकच म्हणा ते! कारण, हे ‘कारण’ गेला बाजार त्याचा इगो तरी सुखावणारे होते. पण, या क्षणिक सुखापेक्षा यावरून आपल्या छोट्याशा विश्वात निर्माण होणारा ताण किती तरी पट मोठा असणार आहे, हे काही त्याने ताडले नव्हते. ‘अमुक विद्याशाखा नाही, म्हणजे करिअरची तमुक संधी नाही; ती गेली, म्हणजे स्वप्नभंग आणि स्वप्नभंग म्हणजे संपलेच सगळे.’ आजूबाजूच्या ‘शहाण्यां’च्या स्लोअरच्या विधानावरच्या या प्रतिक्रिया स्लोअरला सुन्न करून गेल्या. त्याचमुळे ‘तो’ निर्णय घेण्याआधी काही काळ, स्लोअर शहाणे निराशेच्या खोल गर्तेत गेला होता; अगदी तोपर्यंत, जोपर्यंत ती फेब्रुवारीतली स्पर्धा त्याच्या आयुष्यात आली नाही. स्पर्धेतही गप्प राहूनच त्याने त्याला दिलेले काम निमूटपणे केले. पण, इतके काम केले, की बक्षीस मिळाले!
बक्षीस मिळाल्यावर जे होते तेच झाले. स्लोअरला वाटू लागले, की हेच आपल्या क्षमतेचे फळ. फेब्रुवारीतच स्लोअर निराशेतून बाहेर आला आणि एप्रिलपर्यंत धीर गोळा करून त्या भरातच त्याने निर्णय घेण्याची मुभा घेण्याचा तो निर्णय घेतला… आणि?… आणि गरम चहाने जीभ भाजल्यावर जसे होते, तसे स्वत:चे हसे करून घेतले! कारण, त्याच्या निर्णयात ‘जगणे’, ‘योग्य जगणे’ किंवा ‘चांगले जगणे’ यापैकी कोणत्याच पर्यायाचे प्रतिबिंब नव्हते. किंबहुना, त्याने घेतलेला निर्णय, रुढार्थाने निर्णयच नव्हता. तीनपैकी एक पर्याय निवडण्याच्या बाजूने असलेल्या बहुसंख्यांच्या मते, हा निर्णय म्हणजे ‘खरा’ निर्णय टाळण्यासाठी घेतलेली निव्वळ एक मुभा होती. आपल्या ‘निर्णया’चे असे हसे झाल्याचे दु:ख होऊन स्लोअर शहाणे त्याच एप्रिलमधल्या एका सायंकाळी गवताची काडीही न उगवलेल्या फुटबॉल मैदानाच्या मागच्या टेकडीतून उगवणारे चांदणे पाहण्यासाठी गेला. त्याला वाटले हलके वाटेल. पण, ते एप्रिलमधले चांदणे त्याला उग्र वाटले. तडक घरी येऊन त्याने रोजदिनीत नोंद केली, ‘एप्रिलमध्ये रात्रीवरसुद्धा उन्हाच्या खुणा असतात. कधी वाटतं, या एप्रिलला ‘फूल’ बनवून कॅलेंडरमधून काढून टाकू या! पण, मग खूप साऱ्या उन्हाला दुसरा वाली कोण? छे! या ग्लोबलायझेशननं वॉर्मिंगही ग्लोबल केलं…’