स्लोअर शहाणे खऱ्या अर्थाने ‘स्लोअर शहाणे’ झाला, तो नव्वदच्या दशकाचा मध्य बराचसा गोंधळाचा होता. आपण कोणत्या तरी बाजूचे असलेच पाहिजे, अशी आत्तासारखी सक्ती अजून यायची होती. पण, म्हणूनच गोंधळ अधिक होता. कारण, ‘कोणत्या तरी बाजूचे असले पाहिजे’ची सक्ती नसल्याने अनेक माणसे आळशी होऊन काम करण्यापेक्षा विचार अधिक करायची! स्लोअर शहाणे तर आठवड्याचे ७० वगैरे तास विचार करत बसायचा. आणि, तरीही गोंधळातच असायचा. त्याचे नशीब इतके चांगले, की तो असे करून वेळ घालवतोय, असे म्हणणाऱ्यांची बहुसंख्या अजून व्हायची होती. त्यामुळे मग आपण कोणत्या बाजूचे, असे समजा विचार वगैरे करून ठरवायचे असेल, तर त्यावर चर्चा करणे अजून शक्य होते आणि आपली कोणतीच बाजू नसली, तरीही आपल्या असण्याला अर्थ असू शकतो, असे मानणारी आणि कोणतीच बाजू नसते, हे पटलेले नसूनही, बाजूहीन वाटण्याच्या शक्यतेची एक बाजू असू शकते, असे मानून किमान वादविवादाला मुभा देणारी माणसे शिल्लक होती. इतक्या सगळ्या बाजू म्हणजे गोंधळ अधिक. पण, म्हणूनच स्थिरतेच्या अस्थिरतेतून सुस्थिरतेकडे जाण्याची शक्यता दिसणाऱ्या वाटाही अधिक. काही वेळा नुसत्या स्थिरतेपेक्षा अस्थिरतेतून उगम पावणाऱ्या आणि सुस्थिरतेकडे जाण्याची शक्यता दाखविणाऱ्या वाटा अधिक शांतावणाऱ्या

असतात. गंमत अशी, की एफवाय बीएला नियमित इंग्रजी विषयाबरोबर ऑप्शनल इंग्लिश विषय घेतलेल्या स्लोअर शहाणेने याच सगळ्या गोंधळाच्या काळात, एका धड्याखालचे प्रश्न सोडविताना अडलेल्या ‘मेथड इन द मॅडनेस’ आणि ‘फाइंडिंग मीनिंग इन द केऑस’ या दोन वाक्प्रचारांचा अर्थ ग्रंथालयात जाऊन शोधायचा प्रयत्न केला होता…

स्लोअर शहाणेचे हे असे प्रयत्न त्याच्या विचार करत बसण्याच्या सवयीला छान चालना देत असत. गवताची काडीही न उगवलेल्या फुटबॉल मैदानावरून सूर्यास्त दिशेला उगवणारे चांदणे पाहताना त्याच्या मनात हे विचार उचंबळून येत आणि तो त्या चांदण्यावर मालकी दाखवायला मोकळा होत असे. ऐंशीच्या दशकात शाळा शिकल्याने मालक-नोकर ही समज त्याच्या उमजेत रुजली होती आणि भाड्याच्या घरात राहत असल्याने ‘मालक’ नसणे काय असते, हे त्याला चांगले ठाऊक होते. म्हणूनच स्वप्नांशी रुजुवात, हा स्लोअर शहाणेचा छंद होता. त्यातूनच त्याला चांदण्यासारख्या अप्राप्य गोष्टींची ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ मागण्याची कल्पना सुचली होती. वास्तवाची नेमकी जाणीव कल्पनेच्या भराऱ्यांना अतर्क्य असण्याची मुभा देते, ती अशी! मात्र, ‘कोणाच्याच बाजूने नाही, तरी आपण असू शकतो’च्या विचाराने स्लोअरला आता एक ‘मधला’ मार्ग दिसू लागला होता. त्याला लक्षात आले होते, की तो आणि त्याचे कुटुंब जसे कोणाच्या तरी मालकीच्या घरात भाड्याने राहते, तसे हे चांदणेही स्वप्नकाळापुरते भाडेतत्त्वावर घेता येऊ शकेल!

जागतिकीकरण जगण्याच्या प्रक्रिया किती सोप्या करतेय, असेच हा विचार मनात चमकल्यावर स्लोअर शहाणेला वाटून गेले होते. पण, हा आनंद काही काळच, म्हणजे अगदी आज मावळतीला जाऊन चांदणे उद्या पुन्हा उगवेपर्यंतच टिकू शकला. त्याबाबत स्लोअरने त्याच्या रोजदिनीत केलेली नोंद मोठी रोचक होती. त्याने लिहिले होते, ‘जागतिकीकरण आले, तरी त्याला विरोध करणारेही होते, हे आपल्या लगेच लक्षात आले नाही. कल्याणकारी राज्याने घेतलेले निर्णय अकल्याण करणारे कसे असतील, असे आपण मानून चाललो होतो. पण, जागतिकीकरण करू पाहत असलेले कल्याण मार्क्सचे तत्त्वज्ञानही सोपे वाटेल, अशा क्लिष्ट प्रक्रियांची गुंतागुंत आहे. मार्क्स म्हणतो, कुणी मालकच नको, जागतिकीकरण म्हणते, कुणा एकाची मालकी नको! नोकरीची मानसिकता असलेला मध्यमवर्ग कुणी मालकच नको म्हटल्यावर बावचळणार, पण ‘कुणा एकाची मालकी नको’मध्ये मालक भरपूर झाले, तर नोकरीच्याही शक्यता अधिक, यामुळे तो आनंदणार, हे जागतिकीकरणाला माहीत असावं बहुदा!’

रोजदिनीतल्या या नोंदीनंतर फाटक्या खिशांना मालकीचीच काय, गोष्टी भाड्याने घेण्याची स्वप्नंही जेमतेमच परवडतात, हे लक्षात येऊन स्लोअर शहाणे, ‘चांदण्या आता फक्त दुरून पाहायच्या,’ या निर्णयाप्रत आला. त्याच्यासाठी हा निर्णय सोपा मुळीच नव्हता. तो घेताना, त्याला इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यातील, ‘संदर्भासहित स्पष्टीकरण’ या पाच गुणांच्या प्रश्नाला येणारी ओळ राहून राहून आठवली, ‘कविता ही आकाशीची वीज आहे, तिला धरू पाहणारे ९९ टक्के होरपळतात.’ केशवसुतांच्या या ओळीला स्मरून त्याने त्याच्यासाठीही याच चालीवर एक ओळ जणू मर्यादारेषा असल्यासारखी खरडून काढली, ‘उगवत्या चांदण्यावर आकाशाचीच मालकी असते, त्याची ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ मागणारे ९९ टक्के कायम नोकरीच करतात.’ यापुढे मालकीची भाषा नाही, असे स्लोअरने स्वत:ला बजावले, त्यात अधिकारापेक्षा शरणशीलता अधिक असली, तरी.

दरम्यान, इकडे स्लोअर शहाणेच्या प्रत्यक्ष जगण्यात एक वेगळेच उपकथानक आकार घेत होते. रोजगारसंधींच्या लाटांमध्ये कल्याणकारी राज्यातली मध्यमवर्गीय प्रजा न्हाऊन निघत होती, तेव्हा मध्यमवर्गीय असलेला स्लोअर शहाणे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या सगळ्याला ‘खाउजा’ असे संक्षेपाने म्हणणाऱ्यांची भाषणे ऐकून संभ्रमात पडत होता. आधी आठवड्याचे ७० तास विचार करणारा स्लोअर शहाणे प्रति सप्ताह ९० तास विचार करू लागला, तो असा. नव्वदच्या दशकात जे काही होत होते, त्याला ‘खाउजा’ असे हिणवणाऱ्यांच्या गटातल्या लोकांचे म्हणणे त्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून पटत नव्हते, तरी आपल्या जगण्यावर ‘मालकी’ कुणाची, या प्रश्नापाशी आल्यावर स्लोअर शहाणेला ‘कोणाच्याच बाजूने नाही, तरी आपण असू शकतो’ या पर्यायाची तीव्र निकड जाणवू लागे. प्रश्नांचा हा गुंता नव्या सहस्राकात प्रवेश करेपर्यंत, म्हणजे २००० साल संपेपर्यंत अधिकाधिक तीव्र होत गेला… स्लोअर शहाणेही अखेर कॉलेज संपवून नोकरीलाच लागला.

स्लोअर शहाणेच्या या कथानकात आता एका पात्राचा प्रवेश होत असला, तरी ते पात्र स्लोअर शहाणेच्या आयुष्यात शाळेच्या दिवसांपासून होते. ते पात्र म्हणजे स्लोअरकडे येणारे मांजर. येणारे अशासाठी, की ते काही पाळले वगैरे नव्हते. एके दिवशी असेच कुठून तरी ते घरात आले आणि मग येत राहिले. स्लोअर आणि त्याच्या वडिलांना मांजरे आवडत, म्हणून त्याचे लाड होत राहिले आणि आईला मांजर नावडीचे असूनही तिलाही अखेर मांजरीचा लळा लागला. इतका, की त्या मांजरीचे बाळंतपणही स्लोअरच्या आईने हौसेने केले. मांजर पाळण्यातली त्या काळातली सुलभता अशी, की मांजर स्वत:च जिभेने चाटून आपले अंग स्वच्छ करत असल्याने अंघोळ वगैरे घालायची गरज नाही, बाकी अन्हिकेही ते बाहेरच उरकून यायचे, त्यामुळे त्याचाही ‘त्रास’ नाही. मांजरे किती स्वयंपूर्ण असतात, अशी स्लोअर आणि त्याच्या वडलांची चर्चाही होत असे. या मांजराचे नाव ठेवण्यात आले लहरिचू. नावाला तसा काहीच अर्थ नाही, नकोही होता. तसे काही जण म्हणाले, की हे मांजर लहरी आहे, म्हणून लहरिचू हे नाव वगैरे. पण, या लहरिचूच्या पिल्लाचे नाव डुड्डुलुलु ठेवल्यानंतर असे बोलणाऱ्यांनी तसे म्हणणे सोडून दिले. मांजरामुळे स्लोअर शहाणेच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. विचार मांजरासारखे पायात घुटमळू लागले, की ते पायात पाय घालून पाडायच्या आधी, मांजर कसे स्वयंपूर्ण असते, याची होत राहणारी आठवण, ही पहिली आणि मांजराच्याच काय, पण कुणाच्याच नावात ओळखीसह फार काही शोधण्यात अर्थ नसतो, याची जाणीव, ही दुसरी.

स्लोअर शहाणे कॉलेज संपवून नोकरीला लागल्यानंतर आणि त्यानंतर मध्ये त्याने अनेक नोकऱ्या बदलल्यानंतरही त्याच्या प्रत्येक भाड्याच्या घरी मांजरी न पाळता येत राहिल्या. आता फक्त त्याने मांजरांना नावे देणे बंद केले. ‘मेथड इन द मॅडनेस’ आणि ‘फाइंडिंग मीनिंग इन द केऑस’ या दोन वाक्प्रचारांचा अर्थ तो अजून शोधतो आहे, ते वेगळेच…

Story img Loader