नव्वदच्या दशकाचा मध्य आला, तेव्हा राजकीय अवकाशात धाडसानं केलेल्या आर्थिक सुधारणांच्या ढगांचे पांढरे पुंजके पसरू लागले होते, पेजरची ऐट आणि मोबाइल फोनची चाहूल लागली होती, ‘कयामत से कयामत तक’, ‘मैने प्यार किया’, ‘आशिकी’नंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट येऊन, त्यांतले नायक घरच्या परिस्थितीने पिचलेले नसूनही प्रेमात जिंकू लागले होते, सचिन तेंडुलकर वयाच्या पंचविशीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला होता, स्वप्नात फक्त अमेरिकाच पाहणाऱ्यांमध्ये दहावीनंतर विज्ञान शाखेची ओढ वाढली होती, महाविद्यालये-विद्यापीठांत मार्क्स शिकणाऱ्यांना कामगार-मालक यांच्या व्यतिरिक्तच्या वर्गाची, ज्याला मध्यमवर्ग म्हटलं गेलं होतं, त्याची केवळ ‘पुस्तकओळख’च नाही, तर खऱ्या अर्थानं ‘जीवनओळख’ होण्यास सुरुवात झाली होती आणि इकडे गवताची काडीही न उगवलेल्या कोरड्याठाक फुटबॉल मैदानापाठच्या टेकडीमागे पश्चिमेला उगवणाऱ्या चांदण्यावर वयाच्या विशीच्या उंबरठ्यावरचा ‘स्लोअर शहाणे’ मालकी सांगू लागला होता!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विषयप्रवेशासाठी प्रस्तावना लागते म्हणून वरचे उल्लेख. बाकी आपली गोष्ट आहे ती स्लोअर शहाणेचीच. ‘फास्टर फेणे’ वाचून पौगंडावस्थेत आणि तिथून नकळत तारुण्यात शिरलेल्या स्लोअर शहाणेला हे नाव पडलं, ते त्याच्या (अव)गुणवैशिष्ट्यांमुळे. नव्वदच्या दशकात वयानं मोठं होताना आसपासचं जग झपाट्यानं बदलत होतं, तरी हा आपला प्रत्येक बदलावर तासन् तास, दिवसचे दिवस विचार करत बसायचा. आपल्याला बदल समजायला हवा, जाणिवेत नीट रुजायला हवा आणि मग तो स्वीकारायला हवा, असं याचं तर्कट. बदलणाऱ्या जगानं त्याला एवढ्या वेळेची मुभाच दिली नाही आणि तो मागं पडला… खेळात, अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी देऊ शकणाऱ्या शिक्षणात, संगणक अध्ययनात, अगदी नवीन कपड्यांच्या खरेदीत आणि पटकन करिअर ठरवून, झटकन आवडत्या मुलीच्या प्रेमात पडण्यातही! म्हणून तो ‘स्लोअर’. आणि, ‘शहाणे’ अशासाठी, की नव्वदच्या दशकानं ज्या समृद्धीचं ‘वेड’ मध्यमवर्गाला लावलं, ते यानं लावूनच घेतलं नाही. तो मध्यमवर्गीय नव्हता असं नाही, तर त्याला मध्यमवर्गीय लक्षणं कळूनसुद्धा वळली नव्हती. टीवायबीएमध्ये संस्कृत विषयात गीतेचा दुसरा अध्याय शिकताना आकळून घ्यायची स्थितप्रज्ञांची लक्षणं इयत्ता सहावीत असतानाच तोंडपाठ केल्याचा हा परिणाम. स्लोअरचं शहाणपण पुस्तकी नव्हतं, व्यावहारिकही नव्हतं. खरं तर हे दोन्ही नसल्यानं तो स्वत:ला वेडाच समजत असे. पण, त्याच्या भोवतीच्या ‘इंटेलेक्चुअल’ आणि ‘सर्वसामान्य’ अशा दोन्ही वर्तुळांनी त्याच्या ‘प्रामाणिक वेडेपणा’चा उपहास करून त्याला ‘शहाणे’ केले होते…

तर, असा हा स्लोअर शहाणे २५-३० वर्षांपूर्वी फुटबॉल मैदानापाठच्या टेकडीमागे पश्चिमेला उगवणाऱ्या चांदण्यावर मालकी सांगायला लागल्यावर, ते पोएटिक, रोमँटिक, स्वप्निल वगैरे वाटणारच होतं. स्लोअरचा मात्र तसा काही इरादा नव्हता. ताऱ्यांचा हौशी अभ्यास करणाऱ्या मित्राकडून त्यानं सप्तर्षी, काही नक्षत्रं यांतल्या ताऱ्यांचं स्थान कुठं असतं, ते माहीत करून घेतलं होतं. त्या पुंजीवर एकेका ताऱ्याला एकेक काल्पनिक पात्र केलं आणि त्या पात्राचे स्वभाव त्याला जोडले, तर काय होईल, असा विचार करत स्लोअरनं नव्वदच्या दशकात भरपूर आकाश पाहून घेतलं. एकदा मात्र उलटंच घडलं. अजून चांदणं उगवलं नव्हतं म्हणून तो पळत टेकडीवर गेला आणि सूर्यास्त दिशेकडे तोंड करून एका दगडावर बसला. पळून लागलेला दम गेल्यानंतर शांतावलेल्या मनानं त्यानं सूर्याकडे पाहिलं आणि मग मान खाली वळवून तिथल्या धुळीत सूर्यास्ताचीच वेगवेगळी चित्रं काढली. स्लोअरला तेव्हाच आकळलं, की हीच आपल्या जाणिवांची धुळाक्षरं. नव्वदच्या दशकाच्या मध्यात सुरू झालेलं हे धुलांकन २०२० च्या करोनासाथीत सारखे हात धुवायला सुरुवात होईपर्यंत स्लोअरच्या हातांच्या रेषांवरही स्पष्ट दिसायचं. करोनासाथीत आणि नंतरही सारखे हात धुतल्यानं ते पुसलं गेलं. पण, तोपर्यंतच्या पाव शतकाच्या घडामोडी – घडणं आणि मोडणं, दोन्हींसकट – स्लोअरच्या रोजदिनीत त्याच्या पेनातल्या शाईनं अतिशय नेमस्तपणे नोंदविल्या. कोरल्याच म्हणा ना!

या नोंदींचा पसारा गुंतागुंतीचा, क्लिष्ट, तिरका आणि साधा, सोपा, सरळही आहे आणि या वाक्यासारखाच विरोधाभासांनी भरलेलाही आहे. त्यात संगतीचे निर्मळ धागेही आहेत आणि विसंगतींच्या भरपूर कृष्णछटाही आहेत. संस्कार, धर्म, आदर्श, तत्त्वं, नैतिकता यांचं वैयक्तिक आयुष्यात स्थान काय आणि कसं असतं, असाही प्रश्न आहे आणि प्रतिगामित्वाचा विरोध, प्रागतिकतेतील आगतिकता, नात्यांतल्या प्रतारणा आणि स्खलनाचे बिंदूही आहेत. गोष्टीवेल्हाळ स्लोअर शहाणेनं या नोंदी करताना त्या गोष्टींच्याच स्वरूपात केल्या आणि त्या लिहिताना स्वत:कडे लाकूडतोड्याच्या गोष्टीतल्या प्रामाणिक लाकूडतोड्याची भूमिका घेतली. नोंदींच्या प्रत्येक टप्प्यावर कोणती कुऱ्हाड निवडायची, हा प्रश्न सोडवणं अवघड नसेल, असं वाटल्यानं स्लोअरनं हे केलं असलं, तरी ते सोपं नाही, याची जाणीव त्याला पहिल्याच नोंदीवेळी झाली. या पहिल्या नोंदीची गोष्ट सांगण्याआधी त्यानं त्याच्या नोंदवहीला रोजनिशीऐवजी रोजदिनी का नाव दिलं, याविषयी. रोजनिशी सगळेच लिहितात आणि त्यात रोजचा जमा-खर्च मांडतात. त्यामुळे आपण काही तरी वेगळं केलं पाहिजे, असं स्लोअर शहाणेला वाटलं आणि त्यानं त्याच्या रोजच्या जगण्याचा हिशेब नोंदीच्या स्वरूपात लिहिण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो जागायचा रात्रीच, पण आपण काय लिहून गेलोय, हे दुसऱ्या दिवशी, दिवसाच कळायचं, म्हणून ही रोजदिनी.

तर स्लोअर शहाणेच्या रोजदिनीतली पहिली नोंद होती, एका नाटकाबद्दलची. नव्वदच्या दशकाच्या मध्यावर फुटबॉल मैदानापाठच्या टेकडीमागे पश्चिमेला उगवणाऱ्या चांदण्यावर मालकी सांगून झाल्यावर एका रात्री स्लोअर रात्रीच्या नाटकाच्या प्रयोगाला गेला. नाव होतं, ‘वेटिंग फॉर गोदो’. नव्वदच्या दशकात खरं तर इतकी वळवळून (खळखळून हे विशेषण साबणाच्या फेसाला वापरतात, असं स्लोअरला वाटायचं, म्हणून हे विशेषण) हसविणारी आणि मध्यमवर्गाबद्दल खूप खूप ‘बोलणारी’ मराठी नाटकं होत असताना, आपण या अशा इंग्रजी नावाच्या नाटकाला का आलो, असाच स्लोअरला पडलेला पहिला प्रश्न होता. नाटक सुरू व्हायच्या आधी एक कागद प्रेक्षकांना दिला गेला – ज्याची आधी स्लोअरला होडी करावीशी वाटली होती, पण प्रेक्षागृहातले दिवे चालू असल्यानं, त्याचं ‘संस्कारी’ मन तसं करताना शरमून गेलं, त्यामुळे त्यानं होडी न करता, तो कागद वाचला. नाटकाला रुढार्थानं काही कथानकच नसल्यानं त्याबाबत त्या कागदावर काहीच नव्हतं. पण, कथानक नसलेलं हे नाटक का पाहावं, हे दिग्दर्शकानं अगदी कळकळीनं लिहिलं होतं, इतपत जाणीव ते वाचताना स्लोअरला नक्की झाली. वयाच्या विशीतही न पोहोचलेल्या स्लोअरला यापेक्षा आणखी काही कळणं शक्यही नव्हतं म्हणा. त्यानं दोन वाक्यं मात्र टिपून घेतली, त्याला जरा चांगली वाटली म्हणून. ती होती, ‘अॅब्सर्ड म्हणजे असंगत. कशावरही विश्वास नसणं.’ नाटक पाहून घरी आल्यावर, त्या वाक्यापुढे स्लोअरनं लिहिलं, ‘नाटक सुरू झाल्यावर ते संपेपर्यंत नाटकातल्या प्रमुख दोन पात्रांनी निष्पर्ण झाड एवढंच नेपथ्य असलेल्या रंगमंचावर चित्रविचित्र चेहरे, संवाद आणि शारीरिक हालचाली केल्या. मध्येमध्ये ते ‘गोदो येईलच आता’, ‘येणार आहे म्हणाला होता तो’, ‘अजून का आला नाही गोदो’ आणि ‘आपण इथून जाऊ शकत नाही, कारण आपण गोदोची वाट पाहतोय,’ एवढीच वाक्यं वारंवार उच्चारली. नाटकात गोदो आलाच नाही. फसवणूक लेखकानं केली, की दिग्दर्शकानं, की गोदोची भूमिका करणारा आला नव्हता, म्हणून गोदो आला नाही, हे कळायला मार्ग नाही. प्रश्न विचारले नाहीत, धाडस झाले नाही. घरी येऊन निजलो, ते मात्र मनात खूप उत्सुकता ठेवून…’

स्लोअरनं ही नोंद केल्यानंतर दुसऱ्या रात्री नोंद केली, ‘गोदो नाटकात आला नाही, तरी मी आता त्याची मनात वाट का पाहतो आहे? माझ्या घरी रंगीत टीव्ही, दोन दुचाकी, जुनी फियाट, फ्रिज, टेलिफोन, संगणकही आला आहे, आणि तरी मला हा गोदोही यावा, असं का वाटत आहे?… तो बहुदा नेणिवेत शिरून माझ्या जाणिवांच्या प्रदेशात येऊ पाहत आहे…’

स्लोअर शहाणेच्या नोंदींचा लोलक नंतरचं पाव शतक आंदोलनं घेत हिंदकळत राहिला आहे…