काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला भेदून मागासवर्गीयांच्या राजकारणाचा पाया घालणाऱ्या समाजवादी नेत्यांमधले एक प्रमुख नेते म्हणजे शरद यादव. आता हेच राजकारण प्रखर हिंदूत्ववादी विचारांचा भाजप करू लागला आहे! जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आणि लोहियावादाच्या मुशीतून अतिकडवा काँग्रेसविरोधी लढा देणारे नितीशकुमार यांच्यासारखे नेते बिगरभाजपवादाचा जयघोष करू लागले आहेत, हा काव्यगत न्यायच म्हणायचा. खरेतर शरद यादव यांनीही बिगरकाँग्रेसवाद ते काँग्रेसवाद असे वर्तुळ पूर्ण केले होते. गेल्या वेळी बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगी सुभाषिनी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिला उमेदवारीही दिली गेली. जबलपूरमध्ये १९७४ मध्ये शरद यादव यांनी काँग्रेसविरोधकांचा संयुक्त उमेदवार म्हणून लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली, तेव्हा त्यांना इंदिरा गांधींचे गर्वहरण करायचे होते. त्यातून समाजवाद्यांनी जनता पक्ष काढला आणि जनसंघाला पोटात घेतले. याच समाजवाद्यांनी पुढे भाजपचा हात धरून केंद्रात सरकारही चालवले. देशातील या राजकीय स्थित्यंतरातील प्रमुख नेत्यांमध्ये शरद यादवही होते.
लालूप्रसाद भ्रष्ट झाले पण विचारांनी कधीही भरकटले नाहीत, ते कधीही भाजपसोबत गेले नाहीत. लालूंचा खमकेपणा नितीशकुमार, शरद यादव यांना का जमला नाही, हा प्रश्नच आहे! पण शरद यादव सत्तेत रमले नाहीत हे खरेच. नाही तर त्यांनी लालूप्रसाद यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी जिवाचे रान केले नसते. त्याच लालूंना धडा शिकवण्यासाठी नितीशकुमार यांना राजकीय बळ दिले नसते. पण आयुष्याच्या अखेरीस नितीशकुमारांनी शरद यादव यांनाच बाजूला केले, याची खंत शरद यादव यांना टोचत राहिली. दोन दशकांहून अधिक काळ वास्तव्य राहिलेला दिल्लीच्या तुघलक रोडवरील बंगला सोडताना शरद यादवांचे ‘बंगला सोडला, राजकारण नाही’, हे वाक्य नितीशकुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जाते. खरेतर भाजपने शरद यादव यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांचे आभार मानले पाहिजेत. मोदींच्या भाजपचा राजकीय डोलारा प्रामुख्याने इतर मागासवर्गीयांच्या राजकारणावर उभारलेला आहे. मंडलविरोधात कमंडलू पकडणाऱ्या भाजपने इतर मागास समाजातून (ओबीसी) आलेल्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले.
त्याआधी शरद यादव यांनी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना मंडल आयोग लागू करायला भाग पाडले होते. ओबीसींना राजकीय, शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा मार्ग खुला झाला आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. मनमोहन सिंग सरकारवर जातीनिहाय सामाजिक-आर्थिक पाहणी करण्यासाठी दबाव टाकणारे शरद यादवच. आता बिहार, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होऊ लागली असून मागासवर्गीयांचे राजकारण निर्णायक टप्प्यावर येऊ ठेपले आहे. नितीशकुमार यांच्यासारखे राजकीय नेते असोत वा योगेंद्र यादव यांच्यासारखे कडवे लोहियावादी विचारवंत असोत, त्यांचा बिगरकाँग्रेसवाद संपलेला आहे. बिगरभाजपवादाची नवी मांडणी होऊ लागली असताना ती पाहायला शरद यादव मात्र आता नसतील.