‘ Sapere aude!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Horace ( popularized by Immanuel Kant)

जगलेलं आयुष्य आणि जगासमोर आलेलं आयुष्य यांत नेहमी अंतर असतं, जे ज्ञानमीमांसेचा मध्यवर्ती प्रश्न म्हणून चर्चिलं जातं. इमॅन्युएल कांटच्या भाषेत म्हणायचं झालं तर जगलेल्या आयुष्यातील घटितं आणि गोष्टी (Ding an sich) अगम्य असतात. जे काही गम्य असतं ते पूर्वप्राप्त चौकटींचा आणि नंतर लावलेल्या अन्वयार्थाचा परिपाक असतो. घटितांविषयीच्या आकलनाचा संबंध ज्ञाताच्या पूर्वप्राप्त चौकटींवर, दृष्टिकोनावर आणि प्रयोजनावर निर्णायकपणे अवलंबून असतो. त्यामुळे उपरोक्त प्रश्न फक्त सत्यासत्यतेचा नसून अर्थपूर्णतेचा देखील असतो. कारण मनुष्याच्या द्विधा प्रकृतीत कार्यकारणभावाच्या अनिवार्यतेसोबत स्वातंत्र्याचा देखील अंतर्भाव होत असतो.

उदाहरणार्थ, आयुष्यात एखादी निर्णायक घटना घडते जी आयुष्याचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकते. त्या निर्णायक कृतीच्या चौकटीतून समग्र आयुष्याच्या बहुपदरी आणि बहुजिनसी वास्तवाला ठरावीक अर्थ दिला जातो. बहुरंगी जीवनाला विशिष्ट रंगात रंगवलं जातं. उपरोक्त प्रक्रिया लोकोत्तर व्यक्तींविषयी प्रकर्षाने दिसून येते. ‘अवतार’, ‘प्रेषित’, ‘मसीहा’, ‘संत’, ‘महात्मा’, ‘युगपुरुष’ सारख्या विशेषणांभोवती सर्वसामान्यांना नमवणारी कथानकं रचली जातात. मात्र असं करताना त्यांना लोकांपासून अनेकदा तोडलं जातं. धार्मिक आणि पौराणिक गोष्टींचा पगडा असलेल्या समाजात तर लोकोत्तर व्यक्तींना दैवी रंग चढवणं जणूकाही क्रमप्राप्त असावं. अशा मिथकीकरणाच्या आणि दैवतीकरणाच्या प्रक्रियेत मानवतेच्या पातळीवर आरसा दाखविणारं सान्त माणूसपण अदृश्य केलं जातं. त्यामुळे लोकोत्तर विभूती आणि लोक यातील अभेद्या दरी निर्माण होते.

मात्र सॉक्रेटिसच्या बाबतीत ही ऐतिहासिक प्रक्रिया त्याचं माणूसपण पुसण्यात यशस्वी झालेली दिसत नाही. हे खरं आहे की तत्त्वज्ञानात आणि एकूणच लोकसाहित्यात त्याची प्रतिमा ध्रुवीकरण करणारी आहे. पण त्याच्या आयुष्याचं दैवतीकरण झालेलं नाही. जणू सॉक्रेटिसनं दैवतीकरणाच्या प्रक्रियेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी तशी तजवीज केली असावी. प्रस्तुत लेखात सॉक्रेटिसनं संभाव्य दैवतीकरणापासून स्वत:ची सुटका कशी केली या प्रश्नाची सविस्तर चर्चा.

(अ) ध्रुवीकरण करणारा सॉक्रेटिस : सॉक्रेटिसला तब्बल ७० वर्षांचं आयुष्य लाभलं. त्याच्या दीर्घ आयुष्याविषयी तत्त्वज्ञानातच नव्हे तर लोकसाहित्यात देखील असंख्य उलटसुलट आख्यायिका सापडतात. उदा.- सॉक्रेटिस आपल्या श्रीमंत शिष्यांना मोफत तत्त्वज्ञान शिकवत स्वत: मात्र गरिबीत जगला. दिसायला अगदी गबाळ पण तरुणांना आकर्षित करण्याची हातोटी असलेला लोकशिक्षक म्हणून जगला. रात्रभर चालणाऱ्या सिम्पोझियमच्या केंद्रस्थानी राहून मानवी व्यवहाराच्या सूक्ष्म पैलूंवर संभाषण करणारा आणि सोबतच मदिरा पीत vino veritas या संकल्पनेचं प्रात्यक्षिक देणारा फिलॉसफर म्हणून जगला. कौटुंबिक जीवनाकडे दुर्लक्ष करत त्याची पत्नी झॅन्थपिच्या शिव्या खात जगला. सॉक्रेटिसच्या समलैंगिकतेविषयी देखील रोचक कहाण्या रंगवल्या जातात. एका बाजूला इरॉटिक गोष्टींचा उच्चकोटीचा जाणकार म्हणून त्याचं वर्णन केलं जातं तर दुसऱ्या बाजूला निर्विकारपणे जीवन कसं जगावं याचा वस्तुपाठ घालून देणारा आद्या ‘स्टोइक’ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यावर व्यभिचारी म्हणूनही आरोप करण्यात आले आहेत. एकूणच त्याच्या लोकप्रियतेमुळे जनमानसातला सॉक्रेटिस आणि तत्त्वज्ञानातला सॉक्रेटिस असे दोन सॉक्रेटिस दिसून येतात. उदा.-, प्रचलित आख्यायिकांमध्ये ‘know thyself ’ म्हणजे ‘स्वत:ला जाणून घे’ हा डेल्फीचा सुविचार अनेकदा चुकीने सॉक्रेटिसच्या नावे वापरला जातो. प्राचीन काळी हा सुविचार अथेन्सच्या सार्वजनिक ठिकाणी नजरेस पडत असे.

सॉक्रेटिसच्या दीर्घ आयुष्याला वैश्विक परिमाण प्राप्त करून देणारी घटना म्हणजे अथेन्सच्या लोकशाहीने त्याला ठोठावलेला मृत्युदंड. सॉक्रेटिसला माफी मागून किंवा दंड भरून स्वत:चा प्राण वाचवता आला असता. त्याच्या श्रीमंत शिष्यांच्या आणि अनुयायांच्या मदतीने त्याला पलायन करणंदेखील शक्य होतं. मात्र तसं न करता सॉक्रेटिसनं फिलॉसफीला वाचवण्यासाठी मरण पत्करलं. जणूकाही सॉक्रेटिसच्या मृत्यूतच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या ऐतिहासिक क्षणाचा जन्म झाला असावा. खरंतर, सॉक्रेटिसच्या आयुष्याचा शेवट करणाऱ्या या निर्णायक घटनेमुळे अथेन्समधल्या आणि अथेन्सबाहेरच्या लेखकांनी, विचारवंतांनी, कवी/कलाकारांनी सॉक्रेटिसच्या समग्र जीवनात रस घ्यायला सुरुवात केली. त्याचा मृत्यू अशा प्रकारे झाला नसता तर कदाचित त्याची गणना इतर सॉफिस्टांमध्ये होऊन त्याचा विसरही पडला असता.

सॉक्रेटिसनं कुठल्याही प्रकारचा स्वलिखित वारसा मागे सोडला नसल्याने त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती अंतर्विरोधात्मक साहित्य निर्माण झालेलं आहे. सॉक्रेटिस पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातला असा अदृश्य केंद्रबिंदू आहे जिथून एकमेकांना छेद देणारे वैचारिक प्रवाह निघतात. सॉक्रेटिस चिद्वादी होता की भौतिकवादी, अपोलोनियन होता की डायनेशियन, इरॉटिक होता की स्टोइक, सॉफिस्ट होता की सॉफिस्टांचा विरोधक इत्यादी वादांविषयी सगळ्या बाजूंनी साहित्यनिर्मिती झाली आहे. सॉक्रेटिसच्या संदिग्धतेचं ठळक उदाहरण म्हणजे एकोणिसाव्या शतकातला जर्मन विचारवंत फ्रेडरिक नित्श्चेची सॉक्रेटिसविषयीची संभ्रमावस्था. नित्श्चेने समग्र पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावर आसूड ओडले आहेत. त्याच्या दृष्टीनं प्लेटोप्रणीत पाश्चात्त्य परंपरा म्हणजे मनुष्याच्या दीर्घ दमनाची आणि खच्चीकरणाची गाथा होय. प्लेटोच्या अमूर्त, पारलोकवादी आणि कोरड्या बुद्धिवादावर आधारित पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची वाटचाल म्हणजे मनुष्याच्या अंगभूत उदात्ततेचं खच्चीकरण आणि गुलाम मानसिकतेचं तुष्टीकरण करण्याची मोहीम.

नित्श्चेचं ‘गॉड इज डेड’ हे विधान सर्वश्रुत आहे. पण तत्त्वज्ञानाचाही मृत्यू झालेला आहे या निष्कर्षावर तो येऊन पोहोचला होता. पाश्चात्त्य संस्कृतीची संकटग्रस्त अवस्था आणि आजारपणाचं निदान करताना त्याने प्लेटोच्या चिद्वादी जीवनदृष्टीला कारणीभूत ठरवलं आहे. समग्र पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावर हातोड्याने प्रहार करून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या तात्त्विक स्तंभांना उद्ध्ववस्त करणारा नित्श्चे सॉक्रेटिसच्या बाबतीत मात्र द्विधा मनस्थितीत दिसतो. थोडक्यात, सॉक्रेटिस समग्र पाश्चात्त्य परंपरेचं ध्रुवीकरण करणारा अदृश्य केंद्रबिंदू आहे. मात्र त्यानं कुठल्याही एका युटोपिक ध्रुवाला अंतिम न मानता लोगोसला ‘गोठवण्या’चा मोह टाळला.

(ब) सॉक्रेटिसप्रणीत ज्ञान संकल्पनेत झालेलं स्थित्यंतर : डेल्फीच्या भाकितानुसार सॉक्रेटिस अथेन्समधील सगळ्यात ज्ञानी माणूस समजला जात होता. पण ‘स्वत:ला जाणून घे’ या सुविचाराचा स्वत:वर प्रयोग केल्यावर सॉक्रेटिसला स्वत:च्या अज्ञानाची प्रखर जाणीव होते. स्व-अज्ञानाची प्रखर जाणीव असल्यामुळे डेल्फीनं त्याला सगळ्यात ज्ञानी ठरवलं असेल असा वरील कोड्याचा अर्थ निघतो. कारण सॉक्रेटिसच्या ज्ञानमीमांसेत स्वत:च्या अज्ञानाची प्रखर जाणीव ही ज्ञानाच्या शक्यतांची पूर्वअट समजली जाते. त्यादृष्टीनं, स्वत:च्या अज्ञानाची जाणीव सॉक्रेटिसची tabula rasa ची कृती समजली जाते. ‘ताबुला राझा’ म्हणजे पूर्वप्राप्त धारणा, कल्पना आणि परंपरागत समजुतींना प्रश्नांकित करण्याची आणि पुसण्याची धाडसी कृती करून स्वत:ला कोरी पाटी समजण्याचा प्रयोग.

खरंतर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या ऐतिहासिक वाटचालीत हा ‘ताबुला राझा’ चा प्रयोग अनेकदा झालेला आढळून येतो. म्हणून ‘आपली प्राचीन परंपरा जिवंत आहे आणि त्यांची कधीच मेली’ असा आत्ममुग्ध युक्तिवाद अज्ञानाचं ज्ञापक ठरतो. पाश्चात्त्यांच्या काही परंपरा आपोआप मेल्या नसून त्यांनी जाणीवपूर्वक पुसल्या आहेत. कुठलीही परंपरा आपोआप टिकून राहात नसून प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवली जाते. अनिष्ट, हिणकस आणि गतार्थ गोष्टी कोण आणि का टिकवून ठेवतं हा संशोधनाचा विषय आहे. पाश्चात्त्य परंपरेतील काही रूढीपरंपरा त्यांना बौद्धिक, तथ्यात्मक, नैतिक पातळीवर अविवेकी, अनिष्ट आणि गतार्थ वाटल्या म्हणून ‘जुनं ते सोनं’ या मानसिकतेत न अडकता सामूहिक रीतीने पुसून टाकण्यात आल्या आहेत.

‘ताबुला राझा’चे प्रयोग आणि ज्ञानाची नव्यानं केलेली मांडणी या प्रक्रियेला डायलेक्टिक्सची प्रक्रिया म्हणतात. युरोपमध्ये १५ व्या शतकापासून अनिष्ट परंपरांना पुसून टाकण्याचा हा प्रयोग अधिक वेगात झालेला दिसून येतो. पाश्चात्त्य परंपरतल्या प्राचीन किंवा मध्ययुगीन गोष्टी आजच्या युगात दिसत नसतील तर त्यासाठी तेथील लोकांची ‘ताबुला राझा’चा प्रयोग करण्याची इच्छाशक्ती आणि धाडस जबाबदार आहे.

‘ताबुला राझा’चा प्रयोग खासगीत स्वत:वर करणं तुलनेनं सोपं असतं. या प्रयोगाला सार्वजनिक करण्यात मात्र मोठी जोखीम असते. त्यासाठी धाडस लागतं. सॉक्रेटिसनं अज्ञान ओळखण्याचं आणि ज्ञाननिर्मितीच्या शक्यतांचं पद्धतीशास्त्र सार्वजनिक करून पाश्चात्त्य परंपरेसाठी तत्त्वज्ञानात्मक धाडसाचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. ज्ञानाच्या खासगी, व्यक्तिनिष्ठ, स्थितिशील व्याख्येला बाद करून सार्वजनिक, वस्तुनिष्ठ आणि गतिशील ज्ञानाची नवी व्याख्या मांडून सॉक्रेटिसनं ज्ञानाचं लोकेशनच बदलेलं आहे. ज्ञानाचं सॉक्रेटिक लोकेशन मोनॅडिक माणूस, पोथ्या किंवा थिजलेल्या पोथीनिष्ठ संस्था नसून सार्वजनिक अवकाशातील मानवी संबंध आणि मानवी संबंधाच्या दाट जाळ्याला प्रतिबिंबित करणारा ‘लोगोस’ आहे. ज्ञानाच्या संकल्पनेचं हे धाडसी स्थित्यंतर घडवताना त्याने किंमत मोजली आहे.

सॉक्रेटिसच्या फिलॉसफीच्या व्याख्येत ज्ञानाविषयी प्रेम, मैत्री, लालसेसोबतच धाडस हा मानवी पैलूदेखील अभिप्रेत आहे. त्यामुळे अठराव्या शतकात एमॅन्युएल कांटनं ‘प्रबोधन म्हणजे काय?’ या प्रश्नाचं उत्तर देताना ज्ञानाचा संबंध स्पष्टपणे धाडसाशी (Saper aude!) जोडून सॉक्रेटिक क्षणाची वैश्विकता अधोरेखित केली आहे. थोडक्यात, अडीच हजार वर्षांपूर्वीच्या या सूर्य पाहिलेल्या धाडसी माणसानं पाश्चात्त्य परंपरेत आजदेखील समकालीनत्व टिकवून ठेवलं आहे.
sharadcrosshuma@gmail.com