या चित्रावर लावलेलं घोंगडं- आणि अंगावर ते पांघरण्याची पद्धत- पाहून आपल्याकडल्या मेंढपाळ समाजाची आठवण आली असेल तर होय, तिथं त्या ‘मोक्सा राष्ट्रा’चा मुख्य व्यवसाय मेंढीपालनाचाच होता…
ठसठशीत मुखवटा. या मुखवट्यातल्या पुरुषाच्या मिशा अगदी ठळकपणे दिसतात. मग भुवया दिसतात. पण या मुखवट्याला खरा आकार देताहेत ते त्याचे डोळे! हे डोळे आपण अनेकदा पाहिले आहेत. खंडोबाचे, ज्योतिबाचे, बिरोबाच्या काही मूर्तींचे, म्हसोबा, म्हस्कोबा अशा अनेक देवांचे आणि गोव्याकडल्या वेताळेश्वराचे डोळे, एकवीरा आईसह अनेक देवींचेही हेच डोळे. सोनाराकडे मिळतात, किंवा देवळांजवळ पूजासाहित्याच्या दुकानांतही मिळतात तसे. गुजरातच्या बांकेबिहारीचेही डोळे साधारण असेच.
पण हा मुखवटा- आणि त्याचे डोळे- भारताशी संबंधित असू शकतात, हे सॅण्ड्रा गमारा हेषिकी नावाच्या त्या चित्रकर्तीला माहीतसुद्धा नसेल. तिनं स्पॅनिश भाषेत दिलेल्या मुलाखतींमध्ये तरी भारताचा उल्लेख कुठे सापडत नाही. तरीही तिनं हा मुखवटा तिच्या एका कलाकृतीत वापरला. तो कसा काय? कशासाठी? याची उत्तरं मिळवण्याआधी सॅण्ड्रा गमारा हेषिकी कोण, हेही जरा पाहू.
ती मूळची पेरू या देशातली. दक्षिण अमेरिकेतल्या अन्य देशांप्रमाणे पेरूदेखील स्पेनच्या कब्जात होता. राजकीय ताबा स्पॅनिशांनी १८६९ मध्येच सोडला तरी अर्थकारण अगदी ५० वर्षांपूर्वीपर्यंत स्पेनच्या हातात होतं. स्पॅनिश वसाहतवादामुळे झालेल्या नुकसानाची जाण वाढण्याच्या काळात, १९८०-९० च्या दशकात सॅण्ड्रा गमारा वाढली. गेली २० वर्षं ती स्पेनमध्ये स्थलांतरित होऊन, स्पॅनिश वसाहतवादाचे दक्षिण अमेरिकेवर झालेले परिणाम दाखवणारी चित्रं, शिल्पं करते आहे. याच ‘कलाकारण’ सदरात २७ एप्रिल रोजी ‘त्यांच्या भाषेत, त्यांच्या भूमीवर…’ या शीर्षकाचा लेख होता- कलेचा इतिहास आज जणू युरोपीयच मानला जातो, तसा तो असू शकत नाही हे कामातून दाखवून देणाऱ्या कलावंतांची ती दखल होती. असाच प्रयत्न सॅण्ड्रा गमारा करते आहे. स्पेनमध्ये ‘उच्च प्रतीची कला’ म्हणून व्हेलाक्वे, गोया आणि फार फार तर साल्वादोर दालीपर्यंतचे आधुनिक कलावंत यांना स्थान दिलं जातं. स्पेननं ज्यांच्यावर राज्य केलं, त्या लॅटिन अमेरिकेतली लोककला मात्र ‘जुन्या, अस्तंगत संस्कृतीच्या खुणा’ म्हणून पाहिली जाते. राजकीय किंवा आर्थिक पारतंत्र्य लोकांना दिसतं, पण अद्याप सुरू असलेला पर्यावरणावरचा, संस्कृतीवरचा छुपा वसाहतवादी अत्याचार दिसत नाही. तो स्वत:च्या विविध प्रकारच्या दृश्यकलेतून दाखवण्याचं काम सॅण्ड्रा गमारा करते.
हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : अकल्पिताचे धक्के भूकंप
पण ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये गेल्या सुमारे ११० वर्षांपासून दर दोन वर्षांनी बरेच देश आपापल्या कलेची जी दालनं मांडतात, त्यातल्या स्पेनच्या दालनात यंदा या सॅण्ड्रा गमारा यांना स्थान मिळालं होतं. स्पेनचं हे व्हेनिसमधलं दालन पाच-सहा खोल्यांच्या बंगल्याएवढं आहे आणि त्याच्या मधोमध छोटंसं बांधीव अंगणसुद्धा आहे. तिथं एकेका खोलीत एकेक प्रकारच्या कलाकृती घडवून -किंवा मदतनिसांकडून घडवून घेऊन- सॅण्ड्रा गमारानं मांडल्या आहेत (त्या येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत पाहता येतील). जुन्या स्पॅनिश चित्रकारांनी दक्षिण अमेरिकेत येऊन तिथल्या निसर्गाची किंवा लोकजीवनाची चित्रं रंगवली, त्यांचा आधार सॅण्ड्रा गमारा अनेकदा घेते- पण निसर्गचित्रांतली ‘नैसर्गिक संपत्ती’ कशी लुटली गेली, पर्यावरणाचा नाश कसा झाला, याचंही भान याच चित्राच्या प्रेक्षकाला आता यावं, इतपत बदल ती त्या जुन्या चित्रांच्या प्रतिमांमध्ये करते. सॅण्ड्रा गमाराचा दुसऱ्या प्रकारचा प्रयत्न हा दक्षिण अमेरिकी लोकसंस्कृतीतल्या जुन्या लाकडी शिल्पांना स्वत:च्या प्रदर्शनांमध्ये थेट स्थान देण्याचा आहे. काही वेळा तर जुनी चित्रं, त्या चित्रांमधल्या फक्त चेहऱ्यांच्या जागी दक्षिण अमेरिकी मुखवटे लावून, मूळच्या वसाहतवादी चित्रांमधल्या मानवाकृतींना ती परा-शरीर देते!
हेही वाचा >>> बुकमार्क : दैवतांच्या अतर्क्य जगात…
त्यापैकी एका चित्रातला हा मुखवटा- भारतातल्या (किमान पश्चिम भारतातल्या तरी) अनेक देवदेवतांची आठवण करून देणारे डोळे असलेला, मिशाळ पुरुषाचा मुखवटा. तो देवाचा नाही; पण ‘मोक्सा राष्ट्रनायका’चा आहे. हे मोक्सा राष्ट्र आज केवळ दक्षिण अमेरिकेतल्या काही जणांच्या आठवणींतच जिवंत आहे. हे ‘मोक्सा राष्ट्र’ आज बोलिव्हिया आणि पेरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांच्या डोंगर-पठारांवर होतं, अशा त्या दंतकथामय आठवणी.
पण आपणा मराठीजनांना या चित्राकडे पुन्हा पुन्हा पाहाताना जे सहज जाणवू शकतं, त्याच्याशी ‘मोक्सा राष्ट्रा’चे तपशील कमालीचे मिळतेजुळते आहेत! म्हणजे आपल्याला या चित्रावर लावलेलं घोंगडं- आणि अंगावर ते पांघरण्याची पद्धत- पाहून आपल्याकडल्या मेंढपाळ समाजाची आठवण आली असेल तर होय, तिथं त्या ‘मोक्सा राष्ट्रा’चा मुख्य व्यवसाय मेंढीपालनाचाच होता. त्यांचा राष्ट्रनायक हा समूहप्रमुखच असला, तरी त्याला देवतुल्य मानलं जाई. तो दीनदुबळ्यांचा कैवारी असाही विश्वास आजतागायत जपला जातो (इथं ‘खंडोबा’विषयी महात्मा फुले यांचं म्हणणं आठवून पाहा). आपल्या समूहाचा व्यवसाय हिरावला जाऊ नये, हा समूह सुखीसमाधानी राहावा, याची काळजी मोक्सा राष्ट्रनायक घेई.
पण त्या घोंगडीच्या खाली, तांबूस मातकट रंगात काहीतरी ढालीसारखं, खाली मानवी पायांसारखं दिसतं आहे. तो पेरू देशातल्या ‘मोक्सा राष्ट्रा’च्या भागातल्या लोकांसाठी खरोखरच लढलेला एक समूहनायक- गबार्डो हे त्याचं कदाचित स्पॅनिशांनी दिलेलं नाव. त्या लढवय्याचं हे कुणा स्पॅनिश चित्रकारानंच ‘लिथोग्राफ’ (शिलामुद्रण) पद्धतीनं केलेलं चित्र. मुळातलं ते लहान चित्र इथं मोठ्ठ्या आकारात, फक्त रेड ऑक्साइड वापरून रंगवण्यात आलंय आणि अर्थातच घोंगडी वगैरेनं ते झाकलं गेलंय. इंटरनेटवर हा मूळ लिथोग्राफ प्रयासानं सापडतो, पण तो टिपिकल वसाहतवाद्यांनी नेटिव्हांची केलेली चित्रं असतात तसाच आहे. आता त्याला सॅण्ड्रा गमारानं घोंगडी पांघरलीय, उपरण्यासारखा- प्रसंगी डोक्याला बांधता येणारा रंगीबेरंगी कपडाही आहे आणि मुखवटा तर आहेच- डोळे आणि मिशांसकट. पण या चित्राच्या चारही बाजूंना आजच्या काळातल्या लोकजीवनाची, अत्याचारांची आणि संघर्षाची वर्तमानपत्री छायाचित्रंही आहेत. वसाहतवादाच्या खुणा उद्ध्वस्त तर करायच्या नाहीत, पण त्यावर आक्षेप घेण्याची एकही संधी सोडायची नाही, ही सॅण्ड्रा गमाराची वैचारिक भूमिका आहे. या भूमिकेतूनच, जुनी-जुनी स्पॅनिश चित्रं, लिथोग्राफ यांना आता निव्वळ दंतकथावजा आठवणीतच उरलेल्या- एरवी लुप्तच झालेल्या संस्कृतीतल्या दृश्यांची जोड सॅण्ड्रा गमारा देते आहे. आमची ओळख तुम्ही तुमच्या पद्धतीनं जगाला करून दिली असेल, पण घोंगडी ही आमची अस्मिता आहे, हे ती जणू वसाहतवादी स्पॅनिशांना आणि जगालाही सांगते आहे. वसाहतकाळानं दडवलेल्या अस्मितेवरचा राब ती पुसून काढते आहे. यात तिचे कोणतेही राजकीय हेतू नसल्याची पावती म्हणजे, तिच्याच सुमारे ७० कलाकृती यंदा खुद्द स्पेनच्या दालनात मांडलेल्या आहेत.
घोंगडी पांघरणाऱ्या अस्मितेचे डोळे कुठल्याही उठावाचं, राजकीय यशाचं आवाहन करण्याइतक्या लघुदृष्टीचे नाहीत. उलट, जगात आणखीही कुठे कुठे अशाच- घोंगडी पांघरणाऱ्या- अस्मितांवर पुटं चढलेली असतील, हे या डोळ्यांना दिसत असावं.
सॅण्ड्रा गमारा हेषिकी हिचे ‘मस्कारा मेस्टिझा-५’ (परा-शरीर- ५) हे चित्र.
‘परा-शरीर- ५’चा तपशील. (छायाचित्रं : अभिजीत ताम्हणे)
abhijit.tamhane@expressindia.com