पडद्यावर कथा मांडणाऱ्या पेद्रो अल्मोदोव्हर भारतात चित्रपट माध्यमाची आवड असणाऱ्या सर्वांना माहिती असण्याची कारणे अनेक आहेत. म्हणजे ‘स्टार मूव्हीज’सह इतर आंग्ल सिनेवाहिन्यांची भरभराट होण्याच्या काळात त्याचे सिनेमा फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या दीड-दोन टक्के प्रेक्षकांनाच माहिती होते. मग त्याच्या ‘टाय मी अप टाय मी डाऊन’ नावाच्या चित्रपटावरून (कल्पना थेट उसनवारी करून उचललेला) हिंदी चित्रसृष्टीतील एका विनोदी कलाकाराची आणि एका चाणाक्ष दिग्दर्शकाची कारकीर्द उभी राहणारा सिनेमा आला. त्या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळाल्यानंतरच्या वर्षभरात भारतीय शहरांत ‘डीव्हीडी बूम’ झालेली होती. त्यामुळे महोत्सवापलीकडे पेद्रो अल्मोदोव्हरच्या सिनेमांतील रंगांची उधळण, त्याचे कथाविषय जाणणारा प्रेक्षक दीड टक्क्यांहून अधिक १० ते २० टक्के इतका वाढण्यापर्यंत झाला होता. पण २०१० नंतर पेद्रो अल्मोदोव्हर हा ‘इंटरनॅशनल बेस्टसेलर’ पुस्तकांसारखा चित्रवर्तुळात खूप डाऊनलोड करून पाहिला जाणारा दिग्दर्शक बनला होता. सुंदरतनु अभिनेत्री पेनलोप क्रूझ हिच्यासाठी किंवा देमारपटांनी नरपुंगवी प्रतिमा बनलेल्या अन्तोनिओ बन्देरास या अभिनेत्यासाठी सिनेमा पाहणाऱ्यांनाही नंतर पेद्रो अल्मादोव्हर याचे ‘टॉक टू हर’, ‘ऑल अबाऊट माय मदर’, ‘बॅड एज्युकेशन’ पाहण्यात स्वारस्य वाटू लागले. २०१६ पर्यंत पाश्चात्त्य जगताला त्याच्या मुलाखती ऐकण्यासाठी स्पॅनिश भाषांतरकाराची मदत होत असे. २०२० नंतर यात लाक्षणिक बदल झाला. म्हणजे त्याची वाक्य भाषांतर करायला अनुवादिका व्यासपीठावर हजर असते. पण अल्मोदोव्हर वट्ट इंग्रजीत बोलू लागतो. म्हणजे क्रिकेटमध्ये इजा झाल्यावर फक्त धावा काढण्यासाठी ‘रनर’ बाळगायचा आणि स्वत:ही धावायचे, असा काहीसा प्रकार. (पाहा २०२० नंतरच्या यू ट्यूबवरील मुलाखती)

हेही वाचा : अन्वयार्थ: ‘फेडरल रिझर्व्ह’ने करून दाखवले!

तर गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय सिनेपटलावर अल्मोदोव्हरचे नाव सतत गाजत आहे, ते ‘द रूम नेक्स्ट डोअर’ या त्याच्या मूळ इंग्रजीतच असलेल्या पहिल्या सिनेमामुळे. नुकत्याच झालेल्या ‘व्हेनिस चित्रपट महोत्सवा’त या चित्रपटाला ‘गोल्डन लायन’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. येत्या आठवड्यात त्याच्या सिनेमांच्या आणि त्यातील विचित्रशा कथानकांच्या प्रेमात असलेल्यांना वेगळी भेट मिळणार आहे. म्हणजे २५ सप्टेंबर रोजी वाढदिवस असलेल्या या चित्रकर्त्याचे २६ तारखेला इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित होत आहे!

‘द लास्ट ड्रीम’ नावाचे हे पुस्तक त्याच्या आत्मचरित्रात्मक कथांचे आहे. या पुस्तकामध्ये असलेल्या कथांमधून लहानपणापासून ते अगदी अलीकडच्या काळामधील सिनेमा बनविण्याच्या प्रक्रियेचे संदर्भ त्याने पेरले आहेत. ‘गार्डियन’च्या पुस्तक पुरवणीमध्ये दोन आठवड्यांपूर्वी त्याने दिलेल्या खास मुलाखतीत या पुस्तकाची बरीचशी रूपरेषा दिली आहे. आयुष्य सुकर करण्यासाठी ‘कथा’ हे किती महत्त्वाचे माध्यम आहे, असे त्याने त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सिनेमा माध्यमात उतरण्याआधीच्या काही वर्षांत साहित्यप्रेमी असलेल्या अल्मोदोव्हरला कथालेखक, कादंबरीकार वगैरे बनायचे होते. त्यादृष्टीने त्याने बराच काळ प्रत्यक्ष हात चालवले. पण ‘सुपर एट’ कॅमेरा हाती आल्यानंतर साहित्यिक बनण्याचे स्वप्न त्याने बाजूला ठेवले. सिनेमांतून आपल्याला हव्या त्या गोष्टी सांगितल्या. या मुलाखतीत त्याने आपल्या लहानपणाची एक आठवण सांगितली आहे. मुर्दाड खेड्यात निरक्षरांना पत्रे वाचून दाखविण्याचे काम करणाऱ्या त्याच्या आईविषयीची. आईबरोबर तो माद्रिदजवळच्या खेड्यांमध्ये जाई. आई जी पत्रे लोकांना वाचून दाखवते, ती तिच्या खांद्यावर बसून गुपचूप वाचे. मग त्याच्या लक्षात आले की आई पत्रात लिहिले आहे, त्यात स्वत:ची भर घालून वेगळेच काहीतरी सांगत आहे. उदा. घरात कुणीही दखल घेत नसलेल्या म्हाताऱ्या आजीची, आजोबाची विचारपूस वगैरे असलेली वाक्ये त्याची आई जाणूनबुजून पेरत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

नंतर त्याने त्याबाबत आईला विचारले, तेव्हा या खोट्या वाक्यांनी आई रचत असलेल्या कथांमुळे त्या ऐकणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरील आनंदाची जाणीव त्याला व्हायला लागली. त्या वयात ‘कथे’चे महत्त्व उत्तमरीत्या उमजलेल्या अल्मोदोव्हरने प्रत्येक चित्रपटांत आपले आयुष्य दस्तावेजीकरण करून ठेवले. आता त्याच्या आत्मचरित्रात्मक सिनेमा पाहिलेल्या किंवा न पाहिलेल्यांनासुद्धा त्याच्या कथांचा संग्रह वाचायला मिळणार आहे.

हेही वाचा : संविधानभान: विधिमंडळातील कार्यपद्धती

हिचकॉक या दिग्दर्शकाने न लिहिलेल्या कथासुद्धा आपल्याकडे गेली सहाएक दशके ‘हिचकॉकच्या कथा’ या नावाने अनुवादित होत असतात. त्याचप्रमाणे अल्मोदोव्हरच्या (त्यानेच लिहिलेल्या) कथा म्हणून पुढल्या काही वर्षांत दिवाळी अंकात आल्यास आश्चर्य वाटायला नको. पण तितकी वाट पाहायची नसल्यास इंग्रजीत अनुवादित झालेल्या कथांचे ताजे पुस्तक चांगला वाचनपर्याय आहे.

(पेद्रो अल्मोदोव्हर यांची गार्डियनमधील मुलाखत मोफत येथे वाचता येईल. https:// shorturl. at/ u41 cK)

हेही वाचा…

रेचल कुशनेर यांची ‘क्रिएशन लेक’ ही (पर्यावरणावरची हेरकथा असलेली) कादंबरी सध्या चर्चेत आहे. इतकी की साऱ्या अमेरिकी आणि ब्रिटिश माध्यमांनी गेल्या दोन आठवड्यांत कुशनेर यांच्या मुलाखती, त्यांच्यावरील लेख छापायची स्पर्धाच लावली आहे. ‘बुकर’च्या लघुयादीतही ती आता आली आहे. ‘गार्डियन’ आणि ‘न्यू यॉर्क टाइम्स’ यांनी घेतलेल्या मुलाखतींहून अंमळ वेगळा मजकूर.

https:// shorturl. at/ A3 xdq

व्हर्जिनिया क्वार्टर्ली रिव्ह्यू अर्थात ‘व्हीक्यूआर’ या नावानेच प्रसिद्ध असलेल्या मासिकाने आपल्या ताज्या अंकाला दरवर्षीप्रमाणे ‘समर इश्यू’ऐवजी ‘फिक्शन इश्यू’ असे संबोधत ११ कथांचा जुडगा दिला आहे. या नव्या-जुन्या लेखकांच्या साऱ्या मोफत कथा वाचायला दोन विकांत तरी अपुरे पडू शकतील.

हेही वाचा : लोकमानस: बाबा-बुवांना पुरस्कार नाहीत, हेच नवल!

https:// shorturl. at/ t7 gWr

नेटफ्लिक्सवरील ‘सेक्स एज्युकेशन’ मालिकेतील अधिक गाजलेल्या जिलियन अॅण्डरसन यांच्या नावावर काही पुस्तकेही आहेत. पण नवे पुस्तक त्यांच्या संपादनाचे. जगातील १७६ निनावी महिलांनी पाठविलेल्या पत्रांचे. शारीरिक संबंधाच्या इच्छा-अपेक्षांच्या मुक्त कल्पनांचे. ‘वॉण्ट : सेक्शुअल फॅण्टसीज बाय अनॉनिमस’ नावाच्या या पुस्तकात खुद्द अॅण्डरसन यांचेही एक पत्र आहे. योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ सांगणाऱ्या या पुस्तकाबाबत खुद्द अॅण्डरसन यांची ताजी मुलाखत. https:// shorturl. at/0 OaMv

बापकमाईचा उद्योग

डोनाल्ड ट्रम्प हे २०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले, मग २०२० मध्ये हरले आणि आता पुन्हा ते रिंगणात आहेत. त्यांना यश मिळण्याची शक्यता कमीच मानावी लागेल, असे मतदार सर्वेक्षणे सांगत आहेत. पण राजकारणात येण्याआधी ट्रम्प हे उद्याोगपती होते तिथेही त्यांना फारसे यश मिळाले नव्हतेच, त्यांनी उद्याोगाचा पसारा वाढवला तो बापकमाईवर- असे आकडेवारीसह सांगणारे पुस्तक नुकतेच अमेरिकी बाजारांत आले आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने याआधी ट्रम्प यांचा आर्थिक फोफसेपणा सप्रमाण दाखवून दिला होता. त्या शोधपत्रकारितेसाठी डेव्हिड बार्स्टो, सुसेन क्रेग आणि रुस बुटनर या तिघांना ‘पुलित्झर पारितोषिक’ मिळाले होते, त्यापैकी क्रेग आणि बुटनर यांनी आता हे ५१९ पानी पुस्तक लिहिले आहे. त्यात ‘जून १९९० मध्ये ट्रम्प यांच्यावरील एकंदर बँक कर्जे ३.४ बिलियन डॉलर इतकी होती’ यासारखे आकडेच फक्त नसून, अनेक किस्सेही आहेत. उदाहरणार्थ, कॅसिनोच्या उभारणीत भागीदारी मिळवण्याखेरीज गत्यंतरच नाही, अशी स्थिती आल्यावर ट्रम्प यांनी ‘हॉलिडे इन’ला गळ घातली… त्यांनी ‘कॅसिनोचे बांधकाम सुरू केल्याचे तुम्ही म्हणता याला पुरावा काय’ अशी शंका काढताच बुलडोझर व तत्सम वाहने भाड्याने आणून, कामाचा निव्वळ देखावा ट्रम्प यांनी उभारला!

४०० मिलियन डॉलरच्या बापकमाईचा चुराडा करून ‘मला वडिलांनी फक्त एक मिलियन डॉलरचे प्राथमिक भांडवल दिले… आणि मी आज यशस्वी उद्याोजक म्हणून उभा आहे’- अशी अर्धसत्ये ते ‘मीडिया’च्या तोंडावर फेकतात. माध्यमेही त्यांना प्रतिप्रश्न करत नाहीत! ही खंतदेखील ‘लकी लूझर- हाउ डोनाल्ड ट्रम्प स्क्वान्डर्ड हिज फादर्स फॉर्च्यून अॅण्ड क्रिएटेड द इल्यूजन ऑफ सक्सेस’ या नावाच्या या पुस्तकात लेखकद्वयाने व्यक्त केली आहे. ‘पेंग्विन’ने प्रकाशित केलेले हे पुस्तक भारतात ‘किंडल’ आणि पेपरबॅक स्वरूपात उपलब्ध आहे.