डॉ. जयदेव पंचवाघ
‘तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच!’ हे या प्रश्नाचं खरं आणि एकमेव उत्तर असू शकतं.. याचं कारण काय?
मणक्याच्या आजारांमध्ये जिथे शस्त्रक्रियेची गरज नसते किंवा उपयोग नसतो तिथे बऱ्याच वेळेला योग्य प्रकारे केलेल्या व्यायामांचा उपयोग होऊ शकतो. यातला योग्य प्रकारे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेख.
माझा एक मित्र, प्रवीण कोठाडियाचा पुण्यात व मुंबईत मिळून वाहनांच्या स्पेअर्सचा मोठा धंदा आहे. या व्यवसायासाठी पंचवीसेक वर्षे बऱ्यापैकी शारीरिक कष्ट यासाठी प्रवीण करत आला. यात मुंबई-पुणे प्रवासाच्या त्याच्या अगणित वाऱ्या झाल्या. सुरुवातीला एसटी, मग स्वत:ची मारुती, नंतर टोयोटा. मागच्या मे महिन्यात प्रवीण आणि त्याची बायको पायल माझ्या क्लिनिकमध्ये प्रथमच आले.
प्रवीण थोडा कमी बोलणारा, पण पायल बोलण्यावरच जगत असावी, इतकी बोलकी. प्रवीणची पाठ दोनएक वर्ष दुखत होती. विशेषत: कमरेचा भाग चालताना खूप दुखायचा. पण दुखणं अगदी हाताबाहेर गेलेलं नव्हतं. क्वचितप्रसंगी हे दुखणं कमरेतून कुल्ल्याच्या मागच्या भागात संक्रमित व्हायचं. कधी विश्रांती, कधी वेदनाशामक गोळय़ा घेऊन ते थांबायचं. प्रवीणनं मुंबई-पुण्यात मिळून किमान दहा जणांचे सल्ले एव्हाना घेतले होते. यात काही डॉक्टर, काही एक्सरसाइज गुरू, काही फिजिओथेरपिस्ट वगैरेंचा समावेश होता. शिवाय स्वत:च्या डोक्यानं इंटरनेटवर बऱ्याच साइट सर्फ करून झाल्या होत्या. कोणी त्याला ऑपरेशनशिवाय इलाज नाही म्हणून समजावलं, तर कोणी पाण्यात चालायला सांगितलं. बाहुल्यांसारख्या आकृती व्यायाम करतानाच्या चित्रांचा तर अल्बमच त्याच्याकडे झाला होता. त्यातल्या काही चित्रांवर पेननं टिक करून हे रोज घरी करत जा असं सांगितलेलं होतं.
‘‘डॉक्टर, प्रवीण रोज न चुकता पाठीचे व्यायाम करतो. खरं तर तो जरा जास्तच व्यायाम करतो.’’ पायल यांनी सुरुवात केली.. ‘‘अहो, ही व्यायामांची चित्रं बघितलीत ना!’’ पायलनं व्यायाम करणाऱ्या बाहुल्यांचे कागद मला दाखवले. त्यातल्या बाहुल्या नेमके कुठले व्यायाम करत आहेत व कुठल्या स्नायूला व्यायाम देत आहेत हे मला ‘ओळखा पाहू’ प्रकारचं कोडं वाटतं. माझ्याकडे येणाऱ्या अनेक पेशंटच्या फाइलला हे कागद लावलेले असतात. शिवाय ‘‘ही इज इन्टु योगा, यू नो’’.. पायल म्हणाली. म्हणजे भुजंगासन तर तो दररोज अनेक वेळेला करतो. आता विविध व्यायाम व आसनं यांची चित्रमालिका सुरू व्हायची शक्यता दाटून आल्यामुळे, मी पायलला थांबवण्याचा निर्णय घेतला. ‘‘पायलजी, मी प्रथम प्रवीणला तपासतो, त्याचे झालेले एक्स-रे व स्कॅन बघतो, मग आपण पुढे बोलू. चालेल?’’
मी प्रवीणची पाठ व कंबर तपासली आणि त्याच्या कमरेचे एक्स-रे व्ह्यू बॉक्सवर लावले. प्रवीणचा पाचव्या नंबरचा मणका अगदी किंचित पुढे घसरला होता आणि कमरेच्या शेवटच्या तीन मणक्यांत स्पॉन्डिलोसिसची (हा आजार स्पॉन्डिलोसिस याच नावाचा आहे) अगदी सुरुवात होती. मात्र, पाचव्या मणक्याचा ‘पार्स’ नावाचा भाग दोन्ही बाजूला कमकुवत झाला होता. याला स्पॉन्डिलोलायसिस (हा मात्र स्पॉन्डिलोसिस नाही, हा स्पॉन्डिलोलायसिस) म्हणतात. यामुळे मणक्याचा मागचा आधार कमी होऊन, मणका सारखा पुढे घसरण्याचा प्रयत्न करत असतो. स्नायू व ऊतीबंध (लिगामेंट) यांच्या पकडीमुळे तो पुढे घसरत नाही. पण कमरेच्या रचनेवरच सतत ताण येत राहतो व कंबरदुखी सुरू होते. या ताणामुळे आणि ओढाताणीमुळे जर डिस्क कमकुवत होऊन घसरली, तर मात्र मणका पूर्णत: पुढे निसटण्याची शक्यता वाढते. तसंच पायाकडे जाणाऱ्या नसांवरसुद्धा दाब येतो. आतल्या नसांची परिस्थिती कशी आहे, हे कळण्यासाठी एमआरआयची गरज असते.
प्रवीणचे तर दोन एमआरआय केलेले होते. त्याकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आले की नसांवर थोडासुद्धा दाब नव्हता. डिस्कसुद्धा जागच्या जागी होती व तिची रचना व्यवस्थित होती. अशा आजारात दोन पर्याय असतात. एक म्हणजे सर्जरी करून दोन मणके एकमेकांना ‘फिक्स’ करणे व दुसऱ्या पर्याय म्हणजे योग्य व्यायामांनी हे मणके एकमेकांजवळ येणाऱ्या स्नायूंना बळकटी आणणे. मी प्रवीण व पायलकडे बघून म्हणालो, ‘‘प्रवीणच्या केसमध्ये नसांवर अजिबात दाब आलेला नाही. कंबरदुखी होत असली, तरी ती हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे योग्य व्यायामांनीच आपण त्याची कंबरदुखी घालवणं गरजेचं आहे. काही कारणांनी जर त्याचा आजार वाढला तर ऑपरेशन करणं कधीही शक्य आहे.’’ प्रवीणने प्रथमच तोंड उघडले, ‘‘पण डॉक्टर, व्यायामांनी म्हणावा तसा काहीच उपयोग होत नाही. मी दररोज कमरेचे व्यायाम करतो. योगासनं करतो. कधी कधी तर भुजंगासन एक मिनिट केल्यावर पायात झिणझिण्या येतात.’’
प्रवीणला मी तो दररोज करत असलेले व्यायाम करून दाखवायला सांगितले. कमरेची लवचीकता वाढवणारी योगासनं आणि पाठीला उलटा बाक काढून करण्याचे व्यायाम तो करत होता. त्याला ते कोणीही व्यवस्थित शिकवले नव्हते. तो ते व्यवस्थित करतो का हे कोणी बघत नव्हतं. कागदावरची चित्रं बघून तो हे व्यायाम करत होता. अशा प्रकारची प्रवीण ही पहिलीच केस नव्हती. कागदावर बघून व्यायाम करणारे अगणित रुग्ण आहेत.
कुठल्या रुग्णाला नेमके कोणते व्यायाम करायला सांगावेत, ते प्रत्यक्ष कसे शिकवावेत याचं शास्त्र आहे. हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन आहे. १९३० च्या दशकात पॉल सी. विल्यम्स या डॉक्टरनं कंबरदुखीसाठी काही व्यायामांचा प्रयोग केला व त्यातून पुढची अनेक वर्षे विविध व्यायाम निश्चित केले गेले. या काळात मुख्य अडचण म्हणजे एमआरआय ही तपासणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे आजाराचे निश्चित निदान व्हायचं नाही. उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला उजव्या पायात कळा येत आहेत (सायटिका). आता या रुग्णाला कोणता व्यायाम सांगणार? कारण जर डिस्क घसरल्यामुळे नस दबली गेली असेल, तर कमरेत पुढे वाकण्याचे व्यायाम धोकादायक ठरतील. पण जर याच रुग्णात दोन मणक्यांमधील ‘फॅसेट’चा सांधा मोठा होऊन नस दबली गेली असेल, तर कमरेत मागे वाकण्याचे व्यायाम अत्यंत चुकीचे ठरतील- कमरेत पुढे वाकण्यानंच नस थोडी मोकळी होऊ शकेल. एकच त्रास, एकच तक्रार, पण पूर्णत: परस्परविरुद्ध व्यायाम. म्हणूनच एमआरआय आणि कधी कधी सीटीस्कॅनचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करूनच आजच्या युगात व्यायाम निश्चित करावे लागतात.
नेमक्या याच कारणासाठी मी याला सखोल शास्त्र मानतो. रुग्णाची उत्कृष्ट तपासणी, त्याचे एक्स-रे, एमआरआय, रक्ताच्या काही तपासण्या यांचा सर्वंकष विचार करूनच रुग्णाच्या व्यायामांविषयी आखणी करावी लागते. यालाच ‘रॅशनल एक्सरसाइज थेरपी’ (आरईटी) म्हटलं जातं आणि ही आमच्या न्यूरोस्पाइन प्रोग्रॅममध्ये स्वत: डॉक्टरांनी प्लॅन करावी, असा आमचा आग्रह असतो. हा झाला व्यायामाच्या प्लॅनिंगचा भाग. प्रत्यक्ष व्यायाम करून घेणाऱ्या थेरपिस्टचासुद्धा यात महत्त्वाचा भाग असतो. रुग्ण एखादा व्यायाम योग्य तऱ्हेने करतो आहे ना, चुकीचा स्नायू आकुंचित करत नाही ना, हे बघावं लागतं; त्याला ‘फीडबॅक’ द्यावा लागतो. कधी ‘आरईटी’च्या व्यायामांच्या नियोजनात चूक झाली, तर रुग्णांना व्यायाम करताना वेदना होऊ शकते. तसं झाल्यास डॉक्टरांशी चर्चा करून तो प्लॅन बदलावा लागू शकतो.
कधीकधी पाठदुखीचा रुग्ण स्थूल असतो. आयुष्यात व्यायाम म्हणजे काय हे त्याला माहीत नसतं. अशा वेळी अचानक व्यायाम सुरू केले तर उलटा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी पाठीच्या स्नायूंची किमान तयारी करून घ्यावी लागते. मणक्यातील कॅल्शियम कमी असलेले रुग्ण, मणक्याला इजा झालेले रुग्ण, अशांना विशिष्ट पद्धतीचा व पद्धतीनेच व्यायाम शिकवावा लागतो. प्रवीण कोठाडिया यांच्या बाबतीत मुख्य चूक म्हणजे, तो पाठ मागे वाकण्याचे व्यायाम करत होता. त्याला कंबर पुढे वाकवणारे, स्नायू भक्कम करण्याची गरज होती. त्याबरोबरच पोटाचे, मांडीचे व कुल्ल्याचे स्नायूसुद्धा भक्कम करणे गरजेचे होते. ही चूक सुधारताच दोन महिन्यांच्या व्यायामाने त्याची पाठदुखी गेली ती आजतागायत गेलेलीच आहे. पाठदुखीसाठी व्यायाम ठरवताना प्रत्येक रुग्ण व त्याचा आजार वेगळा असतो. प्रत्येकाला वेगळे व्यायाम शिकवावे लागतात व पहिले काही दिवस ते तज्ज्ञांनी लक्ष घालून करून घ्यावे लागतात ही गोष्ट आपण विसरता कामा नये.
(मेंदू व मणक्याचे आजार, नवीन संशोधन, भविष्यातील संभावना या विषयांसबंधी प्रत्येक आठवडय़ात लोकशिक्षण करणारे व्हिडीओ ‘Dr Jaydev Panchwagh या यूटय़ूब चॅनेलवर पाहता येतील.)
(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com