राजेश बोबडे
दुर्जनांना मान-प्रतिष्ठा देऊ नका, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे म्हणणे आहे. महाराज म्हणतात, ‘‘सर्वसामान्य जनता भोळी व दुर्बल असते. दुर्जनांना प्रत्यक्ष विरोध करण्याची त्यांची हिंमत नसते. यावर एकच उपाय आहे. गावातील जाणकार चारित्र्यवान सेवाभावी लोकांनी श्रमांच्या बळावर ग्रामाची उन्नती साधावी. दुर्जनांना कोठेही मान-प्रतिष्ठा देऊ नये. निदान एवढय़ा तरी भावना सर्वाच्या मनी भरल्या गेल्या पाहिजेत, की यापुढे लायकीचे व मानाचे स्थान त्यालाच मिळणार आहे, जो गावातील सार्वजनिक कार्याचा आदर करेल, सहकार्य करेल आणि त्यासाठी काही अडचणी सहन कराव्या लागल्या, काही त्यागही करावा लागला तर तो करेल. परंतु अशी धारणा अग्निज्योत सतत टिकवून ठेवल्याशिवाय टिकणार नाही.’’
‘‘समाजकंटकांना समजावण्याचा प्रयत्न गावातील सुजाणांनी सतत केला पाहिजे. मानवी मूल्य-प्रतिष्ठा जपण्यासाठी वर्तन चांगले ठेवावे, ग्रामाच्या उन्नतीच्या दृष्टीने विधायक कामे वाढवावीत. सेवेच्या कार्यात ज्याचा त्याग, ज्याचे उत्तम वर्तन, जिव्हाळा अधिक असेल, त्यालाच प्रतिष्ठा द्यावी. त्यामुळे मोठेपणाचा आव आणणाऱ्यांना कळ लागेल व आत्मनिरीक्षण करणे भाग पडेल. ही सर्व परिस्थिती निर्माण करणारी संघटना ग्रामात हवी आहे. त्या संघटनेचा प्रभाव जसजसा वाढत जाईल तसा तो परिसरातील इतर खेडय़ांतही पडेल.’’
‘‘या वातावरणाच्या प्रभावामुळे अधिकार गाजवू पाहणाऱ्या व्यक्तींनाही अशी जरब बसेल, की त्यांना एकदम वाटेल की नाही या गावात आपली डाळ शिजणार नाही. गावात अनेक प्रकारचे लोक असतात. सत्कार्याची थोडीफार आस्था बाळगणारे लोकच प्रथम संघटनेत येतील. परंतु कार्याचा प्रभाव व जोम पाहून इतर लोकही ओढले जातील. काही लोक वारा वाहील तिकडे पाठ, या प्रवृत्तीचेच असतात. तर काही जनतेला सुमार्गी लावण्याचा प्रयत्न करणारे असतात. पैकी दुसऱ्या प्रकारची प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना आपल्या संघटनेशी जोडून घेतले पाहिजे. पहिल्या प्रकारच्या हौशी लोकांच्या मागे लागण्यात अर्थ नसतो. असे लोक संघटनेचे बल उत्तरोत्तर वाढत आहे, हे पाहून आपोआप स्तुती करावयास लागतील. आज आपल्या मोठेपणाचा भाव दाखविणारे लोक उद्या खऱ्या मोठेपणाच्या प्रभावापुढे झुकतील. परंतु गावातील सेवाभावी लोकांनी हे महत्त्वाचे कार्य करण्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. म्हणूनच आम्ही श्रीगुरुदेव सेवामंडळाची सेवाभावी संघटना आरंभली आहे. या सेवेतून विविध रूपे प्रगट होतील.’’ ‘‘जीवनाच्या सर्वागीण विकासाची बीजे यात आहेत. पण ती प्रार्थनेच्या व भजनाच्या माध्यमातूनच वाढू शकतात. जोवर जनतेत धार्मिक भावना आहे तोवर हेच माध्यम यशस्वी होऊ शकते.’’ महाराज म्हणतात, ‘‘मला आपणास विनंती करावयाची आहे की आपल्या मनातील सद्विचारांचा आवाज आतल्या आत मरून जाऊ देऊ नका. त्याला सत्याचे व निर्भयतेचे रूप देऊन बलवान करा. स्वत:ला व जगालाही विकासाचा मार्ग दाखविणारे एवढे कार्य आपण आता शिरोधार्य मानून केले पाहिजे.
rajesh772@gmail.com