मरणाला आणि तोरणाला दोन्ही वेळा आपलं कुटुंबाशी असणारं नातं कळतं. सुखदु:खात एकमेकांना साथ देणाऱ्या माणसांनी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अनेक संकेत, मिथकं, कहाण्या पेरून ठेवल्या आहेत. आपण येतो कुठून आणि जातो कुठे या उत्सुकतेच्या भोवतालात बरंच काही दडलं आहे. या साऱ्यात आरंभापासून अंतापर्यंत कुंभ साथ देतो, तो का?
एक प्रसंग मरणाचा… तिरडी उचलून ‘श्रीराम जयराम जय जय राम’ चा घोष धीरगंभीरपणे पुढे जात होता. वारसाच्या हातात मडकं ठेवलेलं. भडाग्नी दिला, की त्यात पाणी भरून आणायला सांगितलं जातं. खांद्यावरचं ते मडकं घेऊन अग्नी देणारा मृतदेहाभोवती तीन फेऱ्या मारतो. प्रत्येक फेरीच्या वेळी एका छोट्याशा दगडाने ते मडकं फोडलं जातं. या दगडाला अश्मा म्हटलं जातं. जेवढे शब्द जुने तेवढी संस्कृती महान हे तत्त्व. ‘पुढे बघून मडकं सोडून दे’, अशी सूचना होते आणि मडकं धप्पकन फुटल्याचा आवाज होतो. ‘एकदा बोंब ठोक’ असं कोणी तरी सुचवतं. अशा दु:खद प्रसंगी ही सारी प्रक्रिया मुकाट केली जाते. मंडळी मग हातपाय धुतात. ‘जन पळभर म्हणतील हाय, हाय’ या ओळी मराठी माणसाच्या मनात रेंगाळत राहतात. अंत्यसंस्काराच्या वेळी आपण हे सारं का करतो? या रिती वर्षानुवर्षे कशा टिकतात? मरणारा अगदी पुरोगामी वगैरे असला तरी ‘अंत्य – संस्कार’ क्वचितच वेगळ्या पद्धतीने होतात. विद्याुतदाहिनी आली तेव्हापासून अंत्यसंस्काराचं परिमाण काहीसं बदललं. करोनाकाळात त्यात मोठे बदल झाले. जगण्याची सारी परिमाणं बदलली जात असताना मृत्यूच्या भोवताली सातत्याने राहणाऱ्या मसनजोग्याने सांगितलं, ‘आज २० कवट्या फुटल्या.’ तो जेव्हा असं सांगायचा तेव्हा मन हेलावून जायचं.
एक प्रसंग तोरणाचा… आता एक प्रसंग आनंदाचा. घराला तोरण बांधलेलं. सारे नातेवाईक जमलेले. महिलांनी भरजरी साड्या नेसलेल्या. घराबाहेर वाजंत्री वाजते आहे. ध्वनिक्षेपकावर सनईचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. तरुणांचे हास्यविनोद सुरू आहेत. बाहेर एक मंडप टाकला जात आहे. मंडपात ठेवायचे कुंभ कुंभाराच्या घरून मिरवत आणताहेत. मराठवाड्यात ग्रामीण भागात त्याला हारे- डेरे म्हटलं जातं. विदर्भात त्याला देवकुंड्या म्हणतात. मग कुंभ मिरवत आणला जातो. तो रंगवला जातो. कुंभाच्या गोट म्हणजे जिथे मानेसारखा भाग असतो तिथे पिवळं कापड, सुपारी, हळकुंड बांधलं जातं. नवरा- नवरीच्या वेगवेगळ्या गाठी बांधल्या जातात. त्यांची महिला पूजा करतात. हळदी- कुंकू वाहतात. हा विधी होतो. पुढचे विधी सुफलनाचे. विवाहविधीला सुरुवात होते. विवाह आणि अंत्यसंस्कार या दोन्ही विधींमध्ये कुंभाचं महत्त्व एवढं कसं?

जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये कुंभ हे स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक मानलं जातं. ‘कथा सरित्सागर’ यात असे उल्लेख आहेत. हे ग्रांथिक संदर्भ अनेक पुस्तकांमध्ये आहेत. वरच्या दोन्ही प्रसंगांतील कृतींचा आता अर्थ उलगडू शकतो. ज्या आईच्या पोटी मूल जन्मतं त्याचा अंत झाला. तो तुझा गर्भ फुटला हे सांगण्यासाठी अंत्यसंस्कारात मडकं सोडून द्यायचं, तो धप्पकन आवाज गर्भ फुटण्याचा. दुसऱ्या प्रसंगातील विवाहाच्या निमित्ताने नववधूच्या गर्भाचं पूजन म्हणून तोरण बांधलेलं असतानाही कुंभाचं पूजन होतं. अर्थात जगभरात कुंभाची पूजा न करता विवाह सोहळे होतात आणि अंत्यसंस्कारही होतात. पण धर्म संस्कृतीमध्ये जन्म मरणाच्या फेऱ्याची उत्सुकता एवढी दांडगी आहे की, त्यापोटी सारे विधी करवून घेतले जातात. विधींचे अर्थ माहीत नसतात बहुतेकांना. त्यामुळे ‘धर्मात आहे हे सारं ,’ असं म्हणत सगळेच मागील पानावरून पुढे जातात.

कुंभ सुफलनाची अनेक प्रतीकं. त्याचे नाना विधी. घटस्थापना हा विधीही सर्जनशीलचा उत्सव. पाणी हे पुरुष तत्त्व आणि भूमी हे स्त्री तत्त्व. घट म्हणजे कुंभ. मातीच्या कुंभावर वेगवेगळ्या प्रकारचं धान्य टाकायचं आणि नऊ दिवसांनी त्यातलं कोणतं उगवून येतं हे पाहायचं. विदर्भात लग्नाच्या वेळी मांडव घालताना वरमाय म्हणजे वराची आई नव्या मडक्यात पाणी घेऊन आंब्याच्या डहाळीने मांडवभर पाणी शिंपडते. भूमातेची पूजा हा सुफलनाचा विधी. वंशवृद्धी आणि मृत्यू या दोन्ही प्रसंगी कुंभ किंवा मडकं लागतं. हे कुंभ घडविणाऱ्या कुंभाराचे चाक म्हणजे निसर्गचक्र असं मानून त्याचीही पूजा पूर्वी होत असे. दक्षिण भारतात मातृदेवतांच्या पूजांमध्ये कुंभ वापरला जातो. बंगळूरुचा ‘करगा’ उत्सव अशाच पूजेचा भाग. यात बळी देण्याची प्रथा होती. पारधी समाजात मराठवाडा आणि कर्नाटकाच्या सीमेलगत ‘कारण’ उत्सव केला जातो. हा उत्सवही देवीचा. करगा आणि कारण उत्सवात साम्य आणि भेद पुढे आले नाहीत. पण पारधी समाजात ‘देवकार्य’ करणारा व्यक्ती मंडप टाकतो. पूर्वी पाल टाकायचा. पारधी समाजात देवीला ‘जोगण’, ‘इखोत’ म्हटलं जातं. अंबाबाई, लक्ष्मी यांची ती रूपं. सर्वसाधारणपणे ज्यांना मुलं होत नाहीत, वंशवृद्धी नाही, जगण्यातल्या अडचणी वाढल्या आहेत अशांसाठी हा उत्सव. या विधीमध्येही जनावरांचे बळी दिले जातात. एका शिरेतून देवाला रक्ताचा अभिषेक आणि दुसऱ्या शिरेतून रक्त पिणारे या उत्सवात सहभागी होतात. हा तांत्रिक पूजेचा उत्सवही मातृदेवतेचाच.

खरं तर विवाह म्हणजे बोहल्यावर चढणाऱ्या दोघांच्या शरीरसंबंधाना समाजमान्यता. त्यातल्या लैंगिक वर्तनातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याभोवती अनेक प्रतीकं आणि मिथकं रचली गेली. बैल किंवा वृषभ हे वर किंवा नर या अर्थाचे प्रतीक. ढवळ्या- पवळ्यामधील ‘धव’ शब्दाचा अर्थ कोशकारांनी ‘वर’ असा दिला आहे. पूर्वी धवले गाणी गायली जात. नवरा बाशिंग बांधून आल्यावर अशी गाणी म्हटली जात. या ‘ध’चा उच्चार पुढे ‘ढ’ झाला असावा. पाण्याचा डोह या शब्दाला ग्रामीण भाषेत ‘ढव’ म्हणतात. ‘ढव’ म्हणजे नदीचा गर्भाशय अशी मांडणीही जलअभ्यासक करतात. कुंभाची पूजा आणि त्यातील पाणी हेही गर्भाशय आणि गर्भजल मानलं जातं. हे सारं विज्ञान नव्हतं तेव्हाचं. विज्ञान पुढे सरकल्यानंतर अलीकडे शहरी भागांत असे विधी केवळ उपचाराचा भाग. पण ते होत नाहीत, असे नाही. आजही कुंभामध्ये बीज ठेवून त्याची पूजा केली जाणाऱ्या सणांची यादी लांबलचक आहे. संक्रांतीचं सुगडपूजन हेही याच अर्थाने होतं. आता आनंदासाठी काही सांस्कृतिक ‘इव्हेंट’ होतात.

हे सारं ‘आपण येतो कुठून आणि जग सोडून जातो म्हणजे जातो कुठे’, या कमालीच्या उत्सुकतेपोटी केलं जातं. पण या मार्गावरचा खरा ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय प्रवास हा थडग्यांच्या मार्गाने जातो. अनेक प्रकारची थडगी आणि त्याचे उत्खनन यातून मानवी संस्कृतीचे शोध पुरातत्त्व विभागातील मंडळी घेत असतात. पण एक विधी सारे जण करतात. मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी काही अस्थी गोळा करून कुंभात ठेवतात. नवा जन्म मिळू दे म्हणून किंवा गेलेल्या व्यक्तीला नवा गर्भ मिळू दे म्हणून. आत्मा असतो असं मानणाऱ्या सर्व संस्कृतीमध्ये कुंभ, डेरा, रांजण याला यामुळे कमालीचं महत्त्व आहे.

महापाषाणीय संस्कृती युरोप, आशिया आणि आफ्रिकेतही होती. या काळातील दफन विधीच्या आधारे सांस्कृतिक अभ्यास करणारी मंडळी गेली अनेक वर्षे मृत्यूच्या भोवतालाच्या संकेतांवरून काहीबाही शोधत असतात. भारतात रॉबर्ट टेलर नावाच्या हैदराबाद संस्थानातील ब्रिटिश अधिकाऱ्याने गुलबर्गा जिल्ह्यात काही थडग्यांचं उत्खनन केलं होतं. पुढे अशा दोन हजारांहून अधिक थडग्यांचं उत्खनन केलं गेल्याचे उल्लेख पुरातत्त्व शाखेचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी नोंदवून ठेवला आहे. शव खड्डा खणून पुरल्यानंतर खूण म्हणून त्याच्या भोवताली गोलाकार शिळा लावतात. मृतदेह पुरलेल्या जागी मातीचा मोठा ढीग करतात. चौकोनी दगड लावतात. अशा अनेक उत्खननांमध्ये खापरं सापडली आहेत. आजही काही जातींमध्ये अंत्ययात्रेत शिदोरी दिली जाते. दफन केलेल्या जागी खापरात शिदोरी ठेवली जाते तसंच सोमरसही असतो. पण अनंताच्या त्या प्रवासाला जाताना चुकून भूक लागली तर, ही त्यामागची भावना. निसर्गाचं देणं म्हणून पारशी जमातीमध्ये मृतदेह उघड्यावर टाकून दिला जातो. गिधाडं आणि पक्षी त्यावर जगावेत असा उद्देश असेल. निसर्गाचं आहे, निसर्गाला परत करतो आहोत, ही भावना असेल त्यामागे. आपल्याकडे मेलेली मढी उकरू नये, असं उगीच म्हणतात. खरे तर याच प्रक्रियेत संस्कृतीचे बंध सापडतात. अण्णा भाऊ साठेंच्या ‘स्मशानातील सोनं’ या कथेचा संदर्भ वेगळा असला तरी सांस्कृतिक अर्थाने थडगी ही या अर्थाने मौल्यवानच.

दक्षिण भारतात थडग्यातून नाणी सापडली आहेत. आजही कर्नाटकामध्ये हलगी लावून नाणी टाकत मृतदेह नेला जातो. मोक्षप्राप्तीचा आनंद साजरा करणारी मंडळी अनेक जातींमध्ये आहेत. पण सारे परिमाण बदलले ते करोनाकाळात. मेणकापडाच्या पिशव्यांतून मृतदेह ठेवून अंत्यसंस्कार झाले. तेव्हाचा काळ अपरिहार्यपणे म्हणा किंवा जिवाच्या भीतीने ‘विज्ञान’ म्हणून साऱ्यांनी स्वीकारला. त्या काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना झाल्या. पण नंतर आपली संस्कृती पुन्हा मोक्षप्राप्तीच्या रूढाचारात अडकली.

आता विद्युतदाहिनीतील अंत्यसंस्कार तसे अगदीच हाताच्या बोटावर मोजता येतील. शवागारात आयुष्यभर नोकरी करणारा, शवविच्छेदन करणारा, अंत्यसंस्काराला लागणारं सामान विकणारे, चिता रचून देणारे, दफनासाठी खड्डा खोदणारे यांत्रिकपणे मृत्यूकडे बघत असतील का? १२ तास शवागाराबाहेर नोकरी करणाऱ्याला मोक्ष ही संकल्पना कशी भासते काय माहीत? अशी माणसं कमालीची अबोल असतात, हे मात्र नक्की. मृत्यूनंतरचं जग अधिक चांगलं असं मानून मोक्षप्राप्तीसाठी त्याग हे जीवनाचं तत्त्वज्ञान मानणारे अनेक संप्रदाय देशभर पसरले आहेत. उपवास हा त्याच त्यागाचा भाग. खरे तर पोटाला चिमटा बसला की आपोआप आई आठवते, नाही तर देव. मानसिक पातळीवर जाणवणारी भीती हीच ‘देव’ आणि ‘दानव’ या संकल्पनेशी जोडते. त्यामुळे सारे विधी जन्म आणि मृत्यूशी किंवा वंशवृद्धीशी जोडलेले. यामध्ये कुंभ गर्भाशयाशी जोडलेला. सारं तत्त्वज्ञान पूजा या क्रियेत सामावून घेताना अनेक संकेत आणि प्रतीकं निर्माण केली गेली. कुंभ – मातीचं भांडं – आपली शेवटपर्यंत साथ देतं, अगदी मृत्यूनंतरही. हे चांगलं की वाईट, उजवं की डावं असे प्रश्न पडोत. पण आहे हे असं आहे.