सिद्धार्थ खांडेकर

गेल्या काही दिवसांतील या तीन घटना खेळातील मोजक्यांच्या अभिजनवादाची अस्वस्थ प्रचीती आणून देतात.

droupadi murmu
Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमेळ्याला देणार भेट; ‘असा’ असेल नियोजित दौरा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Krishnamai festival begins in Sangli from today
सांगलीत आजपासून कृष्णामाई उत्सव
Lahore Gaddafi stadium is ready for international cricket
लाहोरचे स्टेडियम सज्ज! नूतनीकरण विक्रमी वेळेत केल्याचा ‘पीसीबी’चा दावा
tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना

गेल्या काही दिवसांतल्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडी लक्षणीय ठरल्या. आठवडय़ाच्या सुरुवातीस दुबईत आयपीएलसाठी ‘मिनी-ऑक्शन’ झाला. १९ डिसेंबर हा तो दिवस. एक विलक्षण योगायोगच. कारण बरोबर एक महिना आधी, म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अहमदाबादेत भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभव झाला होता. काळ काही कुणासाठी थांबत नाही. व्यवहारांना सुरुवात करावीच लागते. तेव्हा अहमदाबादेतले दु:ख विसरून महिन्याभरातच दुबईमध्ये पुढील कामांना सुरुवात करणे क्रमप्राप्त होते. म्हणून तो मिनी-ऑक्शन किंवा लघुलिलाव! साम्य इतकेच की १९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन विजयी ठरले, तर १९ डिसेंबर रोजीही दोन ऑस्ट्रेलियन जॅकपॉटविजेते ठरले. दोघांच्या झोळीत विक्रमी कोटीदान पडले. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या तेज जोडगोळीसाठी अनुक्रमे २०.५० कोटी आणि २४.७५ कोटींच्या बोली लागल्या. यांतील मिचेल स्टार्क २०१५नंतर आयपीएलमध्ये खेळलेलाच नाही. ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला, त्या संघात अर्थातच स्टार्क होता. पण त्याने ४ षटकांत ६० धावा दिल्या होत्या! पॅट कमिन्सला मागे एकदा १५.५ कोटींची अशीच विक्रमी बोली लागली होती. त्या हंगामात कमिन्सला फार काही करून दाखवता आले नाही, त्याच फ्रँचायझीने अशाच एका मिनी-ऑक्शनमध्ये कमिन्सला करारमुक्त करून अध्र्या किमतीत पुन्हा खरीदले! तो आजवर आयपीएलचे केवळ ४२ सामने खेळलेला आहे. आणि पुढील वर्षी आयपीएल खेळवली जाईल, त्यावेळी स्टार्क ३४ वर्षांचा असेल आणि कमिन्स ३३ वर्षांचा. तेजतर्रार गोलंदाजी आणि माफक फलंदाजी यापलीकडे या दोघांना काही येत नाही. तरीही ‘त्यांच्यावर इतकी बोली लागली, कारण..’ या विषयावर रकानेच्या रकाने भरून लिहून आले. त्यात फार काही तथ्य नाही. दोघांनाही बोलीयुद्धाचा (बिडिंग वॉर) फायदा मिळाला, असेच म्हणावे लागेल. आयपीएलमधील बहुतेक फ्रँचायझी समृद्ध झाल्या आहेत आणि त्यांच्याकडे सांडण्यासाठी पैसा उपलब्ध आहे इतकाच याचा अर्थ. अन्यथा आजवर विक्रमी बोली लागलेले बहुतेक खेळाडू कशा प्रकारे खेळले हे जिज्ञासूंनी तपासून पाहावे. अँडर्य़ू फ्लिंटॉफ, केव्हिन पीटरसन, युवराज सिंग, ख्रिस मॉरिस, सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमेरॉन ग्रीन अशी कितीतरी नावे सांगता येतील. कमिन्स आणि स्टार्क यांच्यापेक्षा सर्वच आघाडय़ांवर अधिक चांगले क्रिकेटपटू खोऱ्याने उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे एक बरे असते. अधूनमधून त्यांचे राष्ट्रप्रेम उफाळून येते आणि आयपीएलमधील गडगंज पैशापेक्षा ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळण्यास प्राधान्य दिले जाते. त्यात थोडीफार चलाखी आहेच. यांच्यातील काहींना १५-२५ कोटी कबूल झाल्यानंतर दोन-तीन वर्षांचा आयपीएलविराम फायद्याचाच ठरतो. भलेही सगळे पैसे हंगामाअखेरीस मिळत नसतील, तरी. हे सगळे फ्रँचायझी चालकांना-मालकांना दिसत नाही काय? पण तेथे तर्क चालत नाही. अन्यथा जोफ्रा आर्चरसारख्या दुखापतग्रस्त खेळाडूवर कोटी-कोटी उधळण्याचे कारण काय होते. मार्केटमूल्य आणि मैदानावरील कामगिरीचा संबंध असता, तर लिलावाची प्रक्रिया कितीतरी अधिक गांभीर्याने चालवली गेली असती. गुंतवणुकीवर परताव्याचे गणित इतके व्यस्त ठरले नसते. दुबईतील आयपीएल ‘डय़ुटी-फ्री शॉपिंग’पासून घेण्यासारखा हाच एक धडा.

आणखी एक दखलपात्र घडामोड तिकडे युरोपातली. युरोपातील प्रस्तावित युरोपियन सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या क्लबांवर बंदी घालण्याची (ईएसएल) युरोपिय फुटबॉल महासंघ (युएफा) आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) यांची कृती युरोपिय न्यायालयाने अवैध ठरवली. युरोपिय बाजारपेठ मूल्ये आणि स्पर्धा कायद्यांशी प्रतारणा करणारी ही बंदी ठरते, असा दावा ईएसएलच्या प्रवर्तकांनी दाखल केला होता. तो मान्य करत लग्झेम्बर्गस्थित युरोपिय न्यायालयाना युएफाची कृती म्हणजे मक्तेदारीचा दुरुपयोग असल्याचे म्हटले. ही लीग अस्तित्वात आल्यास, युएफाच्या विद्यमान व्यवस्थेला थेट आणि गंभीर आव्हान मिळू शकते. ३२ महिन्यांपूर्वी ‘ए२२’ या गटाने युरोपातील काही प्रथितयश क्लबना घेऊन ईएसएलची स्थापना केली. सुरुवातीस या लीगमध्ये आर्सेनल, चेल्सी, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, टॉटनहॅम, एसी मिलान, इंटर मिलान, युव्हेंटस, अ‍ॅथलेटिको माद्रिद, बार्सिलोना, रेआल माद्रिद हे क्लब सहभागी होणार होते. पण युएफाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आणि मँचेस्टर युनायटेडसारख्या क्लबच्या बाबतीत तेथील चाहत्यांनी तीव्र निदर्शने केल्यानंतर बहुतेक क्लब प्रस्तावित लीगमधून गळाले. सध्या केवळ बार्सिलोना आणि रेआल माद्रिद हेच क्लब ईएसएलसाठी उत्सुक आहेत. पण युरोपिय न्यायालयाच्या निकालानंतर ‘ए२२’ नवीन बंडखोर लीगचा कार्यक्रमही जाहीर केला. यात पुरुषांच्या लीगमध्ये तीन स्तरांत ६४ संघ सहभागी होतील. तर महिलांचे ३२ संघ खेळतील, असे प्रस्तावित आहे. इंग्लंडमधील अनेक क्लबांनी आता यात सहभागी होण्यास विरोध दर्शवला असला, तरी नव्या स्पर्धेत कबूल करण्यात आलेली बिदागी आणि डिजिटल प्रसारण हक्कांचे मानधन नजरेआड करण्यासारखे नाही. युएफाने युरोपातील फुटबॉलचा कारभार फार आदर्श पद्धतीने चालवलेला नाही, हा अनेकांचा आक्षेप होता. पण यांतीलही बहुतेकांनी युएफाऐवजी त्यापेक्षाही अधिक नफेखोर संघटनेकडे या खेळाची सूत्रे जाऊ नये, असेही आवर्जून म्हटले आहे. परंतु कोविडोत्तर युरोपची खालावलेली आर्थिक तंदुरुस्ती आणि निधीची चणचण ही प्रमुख क्लबसमोरही असलेली समस्या, ईएसएलच्या गळाला भविष्यात अधिक मासे लागतील हेच सूचित करते. तसे झाल्यास युरोपिय फुटबॉलमध्ये भूकंप होईल. शिवाय कोणत्या लीगमध्ये सहभागी व्हायचे, या मुद्दय़ावर क्लब व्यवस्थापन आणि चाहते यांच्यात दुरावा निर्माण होऊ संभवतो. ईएसलला इतिहास नाही आणि काही कार्यक्रमही नाही. पण या लीगला युएफाही रोखू शकत नाही हे वास्तव आहे.

तिसरी घटना अर्थातच आपल्याकडे भारतातली. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पठ्ठे संजय सिंह हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. म्हणजे या संघटनेची सूत्रे अजूनही ब्रिजभूषण यांच्याकडेच राहणार. त्यांचे अस्तित्वच संघटनेत राहू नये, अशी हमी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती. कारण ब्रिजभूषण हे भाजपचे खासदार आणि उत्तर प्रदेशातील वजनदार नेते ठरतात. त्यांच्याकडून महिला कुस्तीगिरांच्या शोषणाच्या बातम्या या वर्षांच्या सुरुवातीस कुस्तीगिरांनीच प्रकाशात आणल्या. आज त्याच कुस्तीगिरांपैकी साक्षी मलिकने – जी भारताची एकमेव ऑलिम्पिक पदकविजेती महिला कुस्तीगीर आहे – तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. तर आणखी एक ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर बजरंग पुनिया याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून मात्र ‘निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप योग्य ठरणार नाही’ अशी सोयिस्कर पोक्त भूमिका घेतली गेली. देशातील किती मुली या खेळाकडे सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या अमदानीत वळतील, याविषयी रास्त शंका साक्षीनेच व्यक्त केली आहे.

या तीन घटना खेळातील मोजक्यांच्या अभिजनवादाची अस्वस्थ प्रचीती आणून देतात. खेळाचे चालक हे खेळाडू आणि प्रेक्षकांपेक्षा मोठे होतात आणि प्रसंगी सामूहिक सदसद्विवेकबुद्धीलाही स्वत:च्या हितसंबंधांसाठी धिक्कारतात. अशा वेळी खेळ हा निखळ आनंददायी प्रकार न राहता, मोजक्यांच्या मर्जीचा खेळ ठरतो. त्यातून आनंद, उत्सुकता हे लोप पावतात. पैसा येतो, पण प्रेक्षक, हितचिंतक दुरावतो. ‘खेळ, खेळी, खेळिया’ या सदरातून या मायबाप क्रीडारसिकाचाच सर्वाधिक विचार केला गेला. कारण खेळावर पहिला आणि शेवटचा हक्क त्यांचाच तर असतो!

Story img Loader