प्रदीप रावत

भिन्न प्रदेशात जगण्या-तगण्याचे ताणतणाव भिन्न! त्यासाठी स्वत:च्या मूळ ठेवणीला मुरड पडतेच! कधी ही मुरड तगण्यासाठी पोषक ठरते, कधी अपुरी, तर कधी मारक!

‘काय भुललासी वरलिया रंगा’ हा इशारा जीवविज्ञानात पदोपदी आळवावा लागतो. युरिटेमोरा अफिनिस नावाचे अगदी छोटे जलजीव असतात. जेमतेम एक ते दोन मिलिमीटर लांबीचे पण त्यांच्या अंगावर कवचाचा टोप असतो! काही समुद्रतळाशी, काही खाडीच्या पाण्यात, काही पाणथळ जंगलाच्या पडलेल्या पानगळीखाली नांदणारे अशी त्यांची विविध ठिकाणे आहेत. खाडीच्या तोंडाशी नद्या ठिकठिकाणचे रासायनिक कण ओढून आणतात. तिथे पोषणाची चंगळ असते, म्हणून जलचर तिथे अंडी घालतात. तिथे सूक्ष्मजीव फोफावतात आणि इतर जलचरांचे मुबलक अन्न म्हणून उपयुक्त ठरतात. आरंभी सगळे युरिटेमोरा अफिनिस एकाच प्रकारात गणले जात असत. नंतर ठिकठिकाणचे युरेटिमोरा पडताळले गेले, तेव्हा ध्यानात आले की त्यांचा आपसात सफळ संकर होत नाही. त्यांच्या निरनिराळय़ा प्रदेशांत निरनिराळय़ा जाती आहेत. पण असा साक्षात्कार फक्त या छोटय़ा जीवांबाबत झाला असे नाही. हत्तींचे दोन ढोबळ जातींत वर्गीकरण केले जात असे: आफ्रिकन आणि आशियाई! परंतु आफ्रिकेतील गवताळ सवाना भागांमधले हत्ती आणि हिरव्या जंगलांतील हत्तींमध्येदेखील जाती भिन्नतेची भिंत आहे!

इतकी साधम्र्याची कुंडले बाळगणारे जीव कधी ना कधी एकाच कुळातील एकाच फांदीचे असणार! मात्र आता त्यांच्यात सफळ संकर घडेनासा होतो असे का व्हावे? संशय प्रथम वळतो तो त्यांच्या भिन्न भौगोलिक प्रदेश आणि तेथील परिसराकडे! निराळा प्रदेश आणि परिसर लाभण्याच्यादेखील दोन मोठय़ा तऱ्हा. मूळ भौगोलिक प्रदेशात भलीमोठी उलथापालथ होणे किंवा तशाच मोठय़ा संकटामुळे जीवांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून जाणे. यापैकी काही असले तरी जीवांना तगून राहण्यासाठी नवा परिसर, नवे शत्रू, नवे स्पर्धक, नवे अन्नाचे स्रोत यांच्याशी किंवा यांच्यासाठी झुंजावे लागते! नव्या भूभागांमध्ये काही पार अस्तंगत होतात. काही सुकर सोयीस्कर परिसर शोधत स्थलांतरित होतात आणि फोफावतात. अन्य काही भाग्यवंतांच्या वाटय़ात स्पर्धा निवळण्याचा आपसुखे लाभ पडतो तर काहींच्या पदरी स्पर्धा तीव्र होण्याचा अभिशाप येतो. काही जाती तगतात पण इतर ‘सहजातीं’च्या मानाने त्यांचा तगण्याचा जोम दुबळा ठरतो. त्यामुळे एकूण संख्येत अशा दुबळय़ांच्या लोकसंख्येचा वाटा कमी होतो. जगणे आणि तगणे यांच्या रेटय़ामुळे बदल तर अटळ असतो! बदल कशामध्ये घडतात? त्यांच्या बाह्यरूप ठेवणीमध्ये, जगण्याच्या तऱ्हांमध्ये, परिसररूपात मिळणाऱ्या अन्नसामग्रीमध्ये! निराळय़ा प्रदेशात जुळवून घेत गुजराण करताना त्यांच्या बाह्य ठेवणीत तर फरक घडत जातातच शिवाय त्यांची वसतिस्थाने दुरावली की त्यांचा आपसातील संपर्क खालावतो.

पण या बाह्य लक्षणांच्या ठेवणी त्यांना स्वतंत्र जाती म्हणून दर्जा देऊ शकतील का? मेयरच्या व्याख्येनुसार त्यांच्यात सफळ संकर होतो का? होऊ शकतो का? याचा विचार केला पाहिजे. भौगोलिक फारकतीने येणाऱ्या दुराव्यापोटी संकरासाठीची नरमादी जवळीक ही मुदलातच हरवते. जरी कालांतराने जवळीक अवतरली तरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. जनुकीय बदल तर हजर असतातच! पण संकरासाठीचा प्रणय करण्याची जुनी शैली लोप पावते आणि नवे प्रणय संकेत उद्भवतात. स्वतंत्र जाती त्यांच्या नर-मादी संपर्काचे देखाव्याचे संकेत, आकर्षून घेण्यासाठी करावी लागणारे दिखाऊ गुण, ते गुण मिरवण्याचे संकेत हे सगळेच पालटत जातात. अनुनय करण्यासाठीचे फेरधरणे, पाठलाग, साद घालणारे कूजनकारी आवाज यात रूपांतर घडते. त्यामुळे त्यांच्यात सफल संकर घडण्याची क्षमता असो वा नसो पण अशा संपर्काची ही प्राथमिक पायरीच लोप पावते!

तशीच स्थिती नव्या परिस्थितीत अन्न मिळविण्याबद्दल असते. काही बदल निराळय़ा भूभागातील निराळे अन्न हुडकून ते सफळ हस्तगत करण्याच्या क्षमतेशी संबंधित असतात. उत्क्रांती विज्ञानामध्ये अशी बरीच उदाहरणे रूढ आहेत. त्यातील सर्वात प्रख्यात उदाहरण फिंच पक्ष्यांचे आहे. या फिंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत. खुद्द डार्विनने त्यांच्या बहुविध जाती गॅलापागोस बेटावर पाहिल्या होत्या. त्यांच्या बाह्यरूपांतील भिन्नता दर्शविणारा एक विशेष म्हणजे त्यांच्या चोचींची ठेवण. ज्या जातीत जन्मावे तशी चोच तसे अन्न! पण इतक्या निरनिराळय़ा ठेवणींची चोच असलेले फिंच कसे कधी कशामुळे वेगवेगळे रूप साकारत अस्तित्वात आले? इतके भेद त्यांच्यात उद्भवले कसे? त्यांच्यातील परस्पर संकर आणि प्रजनन थोपविणाऱ्या भिंती कधी आणि कशाने उद्भवल्या? एलिनोर ग्रान्ट आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही सलग ४० वर्षे या बेटांवर फिंच पक्ष्यांच्या जाती न्याहाळत आणि त्यांच्या नोंदी ठेवत राहिले.

त्यांच्या संशोधनामध्ये एकाच भूभागात राहणारे, एकाच कुळातील वरपांगी भाऊबंद वाटावेत, पण वेगळी जातीची चूल मांडलेले असे फिंच पक्षी होते. ४० वर्षांत ते त्यांच्या मागावर राहिले. त्यांची एकूण संख्या, त्यातील चढउतार त्यांच्या विणीचे प्रमाण नोंदवत राहिले. या खटाटोपातून नवीन जाती उद्भवाच्या जोडीने आणखी एक मोठा साक्षात्कार झाला! नैसर्गिक निवड या सूत्राने उत्क्रांती अगदी अतिमंद गतीने होत राहते, अशी डार्विनची अटकळ होती! ग्रान्ट दाम्पत्याची निरीक्षणे आणि नोंदींतून ती अवघ्या दोन वर्षांतसुद्धा घडते, असे दिसून आले!

भौगोलिक फारकत होऊन संपर्क संपुष्टात आला तरच स्वतंत्र जातीची शक्यता निर्माण होते का? अजिबात नाही! फार दूरवर नसलेल्या, निकट म्हणाव्यात अशा परिसरातदेखील असे संकर निषिद्ध करणारे विलगीकरण होते! अगदी सहजी सरमिसळ व्हावी अशा एकछत्री प्रदेशातदेखील फाटाफूट होऊन नव्या जातींची निराळी चूल मांडली जाते! या वस्तुस्थितीमुळे भौगोलिक दुरावलेपणाच्या निरनिराळय़ा तऱ्हा चितारणारे वेगवेगळे प्रकार वैज्ञानिकांनी पत्करले. त्यांना समदेशी, समांतर-देशी अशी नावे आहेत. अशा वर्गीकरणाचा मूळ हेतू नव्या जातींच्या पैदाशीमध्ये भौगोलिक विलगतेचा भिन्नभिन्न अंश आणि त्यांचा प्रभाव किती याचा अदमास घेण्याचा आहे. जातीभेद कशाने उद्भवतो याची कारणे निखळ भौगोलिक तर नाहीतच पण ती वेगवेगळय़ा मुख्य प्रक्रियांनी साचतसाचत घडणारी क्रिया आहे. त्याच भौगोलिक परिसरामध्ये तफावत किंवा फारकत नसली तरी नवीन जाती उद्भवाचे सत्र जारी राहते. ग्रान्टद्वयांनी केलेल्या फिंच पक्ष्यांच्या अध्ययनात हे आढळले होतेच. अलीकडे २०२० साली अगदी तळय़ांच्या छोटय़ा परिसरात सिक्लिड माशांच्या जातीभेदाच्या भिंती आणि नव्या जाती प्रकारांच्या उद्भवाचे लक्षणीय दाखले मिळाले आहेत.

भिन्न प्रदेशात जगण्या तगण्याचे ताणतणाव भिन्न! त्यासाठी स्वत:च्या मूळ ठेवणीला मुरड पडतेच! कधी ही मुरड तगण्यासाठी पोषक ठरते, कधी अपुरी, तर कधी मारक! अशा मुरड पडलेल्या जीवांची छबी आणि प्रतिबिंबे दिसायला जरा निराळी पण अगोदरच्या ठेवणीचा ठसा शाबूत राहिलेली अशी असतात. कुठली मुरड का? कुठे? कधी पडते? पुढच्या पिढीत सहजी उतरावी अशी ती असते का? जीवांची बाह्य लक्षणे आणि चेहरामोहरा पालटला म्हणजे अंतरंगातले कोणते इतर गुण पालटले? याचे काही पूर्वनिश्चित नियम नाहीत! असे काही बदल घडले हेदेखील बदल घडल्यावरच उमगणार! जीवांच्या शरीरांतर्गत हे बदल होत असतात! म्हणजे कुठे? कुठल्या पातळीला? तर जनुकांच्या पातळीवर! हे एक सुटसुटीत पण मोठे गहन उत्तर आहे! अशा यदृच्छय़ा घडणाऱ्या आगंतुकी बदलांना उत्परिवर्तन म्हणतात. इंग्रजीत म्युटेशन. आपण त्याला सोयीसाठी आगंतुकी म्हणू. अशा आगंतुकींमुळे ‘परस्पर सफळ संकर’ न होण्याची तटबंदी उद्भवू शकते. नव्या जातीचा उदय होण्यात अशा जनुकी आगंतुकीचा वाटा असतो. पण एवढे पुरेसे नाही. त्या आगंतुकीचे पाईक झालेल्या पिढय़ा तगल्या फोफावल्या एकूण समजीवींच्या संख्येत त्यांचे प्रमाण किती वाढले किंवा स्थिरावले? याचाही हिशेब करावा लागतो. परिसरातील तगण्या-जगण्याचा रेटा आगंतुकी आणि जीवांच्या संख्याबळाची बदलती ‘जाती’य ठेवण या सगळय़ाचा परिणाम जातींच्या उद्भवाचे भवितव्य रेखाटतो. अतिसूक्ष्म भासणाऱ्या जनुकांच्या उठाठेवी घडामोडींमध्ये एवढे सारे रामायण सुरू होते! म्हणून जनुक नावाच्या नजरेने सृष्टीकडे बघणे खरे श्रेयस्कर!

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत. 

pradiprawat55@gmail.com

Story img Loader