‘‘मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख या नात्याने मी येथे ‘जाळी सादरीकरणासाठी’ जमलेल्या सर्वांचे स्वागत करतो. समस्याग्रस्त नागरिकाने उडी मारून जीव देऊ नये म्हणून आपण ही जाळी लावली पण त्याचा वापर आता आंदोलनासाठी होऊ लागला आहे. त्यावर उड्या मारणाऱ्यांना बाहेर काढताना नाकीनऊ येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील नामवंत जाळीनिर्माते आनंद जाळेकर सादरीकरण करतील…’’ जाळेकर उभे राहताच आंदोलनाने कावलेल्या पोलिसांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘जाळी आंदोलनांवर उपाय शोधायला हवा असा विचार आला व आम्ही जाळीचे नवनवे प्रकार विकसित करण्यास सुरुवात केली. त्यातील पहिला म्हणजे ‘काटेवाली जाळी’. यातील प्रत्येक दोऱ्यात सुया गुंफलेल्या असतील. त्यावर उडी मारली की आंदोलनकर्ते कळवळतील व बाहेर काढा असे आर्जव करतील. पोलिसांनी केवळ दोर फेकायचा आणि आंदोलनकर्त्याला वर ओढायचे. तेव्हाही त्याला सुया टोचतील, पण वेदनेमुळे तो लवकर बाहेर येईल. दुसरा प्रकार ‘खाज सुटणाऱ्या जाळीचा’. त्यातील दोऱ्यावर एक विशिष्ट औषध लावलेले असेल. उडी मारणारा त्यावर पडला की त्याच्या सर्वांगाला खाज सुटेल. त्याची तीव्रता इतकी जास्त असेल की प्रसंगी तो कपडेही फाडेल. हे औषध इतके जालीम आहे की कपड्याच्या आत असलेल्या शरीरालासुद्धा प्रभावित करेल. ही खाज नंतरचे आठ दिवस तरी त्याला त्रास देत राहील. त्यालाही दोऱ्याच्याच साहाय्याने बाहेर काढायचे. तिसरा प्रकार ‘चिकट जाळीचा’. यात जाळीला गोंदसदृश कोटिंग लावलेले असेल. त्यावर माणूस पडला की त्याचे कपडे जाळीला घट्ट चिकटतील. त्यामुळे त्याच्या हालचालीवर मर्यादा येईल. त्यातून सुटका करून घेण्याच्या नादात कपडे फाटतील. शरीराची कातडीसुद्धा या कोटिंगला चिकटेल. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना रबरी हातमोजे व गमबूट घालून जाळीवर उतरावे लागेल. चौथा प्रकार ‘फासाची जाळी’. ही त्रिस्तरीय असेल. उडी मारली की वरचा स्तर आपसूकच आक्रसत जाईल व त्यात आंदोलनकर्ते बंदिस्त होतील. हा फास इतका घट्ट असेल की त्यात कुणालाही हालचाल करता येणार नाही. त्यांची घोषणाबाजी तेवढी सहन करावी लागेल. या फासाच्या वर एक मोठा दोर असेल व चाकाच्या साह्याने त्यांना मजल्याजवळ आणता येईल. पाचवा प्रकार ‘तकलादू जाळी’चा असून यावर उडी मारली की जाळीला भोक पडून माणूस थेट खाली पडेल. त्याला इजा होऊ नये म्हणून खाली ‘जिम्नॅस्टिकची गादी’ बसवली जाईल.’’

हेही वाचा : संविधानभान: केंद्रराज्य संबंधांचे आर्थिक आयाम

हे ऐकून देखभाल दुरुस्ती खात्याचा अधिकारी म्हणाला ‘याचा खर्च किती’ त्यावर उत्तर मिळाले ‘वरच्या चार प्रकारच्या जाळीसाठी प्रत्येकी शंभर कोटी तर पाचव्यासाठी पन्नास’ हे ऐकताच उपस्थित एक शिपाई म्हणाला ‘एवढा खर्च करण्यापेक्षा समस्याच उद्भवू नये यासाठी मंत्रालय प्रयत्न का करत नाही’ हा प्रश्न कानावर पडताच सारे त्याच्याकडे रागाने बघू लागले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St quota to dhangars maharashtra tribal mlas jump onto safety net from mantralaya s 3rd floor css