वर्षातील बहुतेक सगळेच दिवस हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची आता सवय करून घ्यायला हवी की काय, असा प्रश्न यासंबंधीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालामुळे निर्माण झाला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंचे कालमान गेली कित्येक शतके बहुतांशी नियमित होते. ते गेल्या काही दशकांत बदलले. उन्हाळा आणि हिवाळ्यात गारांचा पाऊस, ढगफुटी, पावसाळ्यात अधिक तापमान यांसारख्या हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशाने तातडीने तयारी करायला हवी. त्याबाबत कोणतीही उपाययोजना न झाल्याने देशातील सगळी शहरे हवालदिल होत चालली आहेत. तेथील नद्या-नाले केवळ प्रदूषितच झालेले नाहीत, तर ते बुजवून त्यावर भली मोठी निवासी संकुलेही उभी राहिली आहेत. शहरांमध्ये सांडपाण्याच्या विसर्गाची कोणतीही भक्कम यंत्रणा नाही. त्यामुळे ढगफुटीसारख्या घटनांमध्ये शहरांतले रस्ते जलमय होतात आणि नागरिकांचा, प्राण्यांचा हकनाक बळी जातो. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पाणथळ जागांवरही निवासी संकुले उभी करण्याचा ठाणे शहराच्या विकास आराखड्यातील बदल निसर्गाचे आणि पर्यायाने शहराचेही किती अतोनात नुकसान करणार आहे, याचे भान नसणे, हे काळजी वाढवणारे आहे. ठाण्यातील पामबीच रस्त्यावरील पाणथळ जागांवर फ्लेमिंगोंची वस्ती असते. त्यावरही घाला घालून घरे बांधण्याचा निर्णय निर्दयी म्हणायला हवा. देशातील सगळ्या शहरांमध्ये अशाच पद्धतीने विकासाच्या नावाखाली धुडगूस घातला जातो. शहरे केवळ उपजीविकेची ठिकाणे बनत चालल्याने तेथील नागरिकांच्या जगण्याचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे, याचे भान नियोजनकारांनी ठेवायला हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा