खरं म्हणजे गोवा हा काही जीनप्रदेश नव्हे. ही भूमी काजू-कन्या फेणीची. पण त्या मांडवी-जुवारी-शापोरा-साळ नद्यांच्या पाण्यात काय जादू आहे कळत नाही. त्यांच्या काठी नवनवे प्रयोग होत राहतात…
दिवस कसे बदलतात !
लंडनमध्ये एक डॉक्टर होता. फ्रान्सिस्कस सिल्वियस नावाचा. ही सतराव्या शतकातली गोष्ट. हा सिल्वियस मूळचा डच. म्हणजे हॉलंडचा. त्याकाळी अनेक डॉक्टर स्वत:ची औषधं स्वत: तयार करायचे. त्यामुळे या सिल्वियसचा रसायनशास्त्राचाही चांगला अभ्यास होता. त्याकाळी तिथले स्थानिक धर्मगुरू आपल्या करवंदांसारख्या दिसणाऱ्या ज्युनिपर (Juniper) नावाच्या फळांचा अर्क गाळत. या फळाचा काढा केला जात असे. त्या फळांचा गर उकळवून ऊर्ध्वपतनाने त्याची वाफ गार करून पुन्हा तिला द्रवरूप दिलं जात असे. अगदी सर्दी, पडसं, कफपासून ते अगदी प्लेगपर्यंतच्या आजारात या फल-रसाचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग केला जायचा. ही फळं काळसर. साहजिकच त्यांचा गरही तशाच रंगाचा.
तर या सिल्वियसला असं लक्षात आलं की या गराचं पुन्हा पुन्हा ऊर्ध्वपतन केलं की एक टप्पा असा येतो की त्याचा रंग अगदी पाण्यासारखाच होऊन जातो. म्हणजे पाणीच. स्वत:चा असा रंग, गंध काहीच नाही. पण स्वभावाने मात्र कडक. एकदम. म्हणजे पाणीच आहे आपलं निरुपद्रवी असं समजून कोणी तो द्रव प्यायला तर अगदी झुम बराबर झुम शराबीच ! टुल्ल व्हायचे तो द्रव पिणारे. सिल्वियसच्या काळात या द्रवाला नाव मिळालं ‘ज्युनिव्हर’. म्हणजे ज्युनिपरपासून बनलेलं म्हणून. फ्रेंचांनीही या पेयाला असंच काही नाव दिलं. त्याआधी स्पेनच्या युद्धात १५८५ च्या आसपास या ज्युनिव्हरचा वापर झाल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू व्हायच्या आधी सैनिकांमध्ये जी एक अस्वस्थता असत… अलीकडचा लोकप्रिय शब्द म्हणजे एन्झायटी… ती कमी व्हावी म्हणून त्या सर्वांना ग्लास ग्लासभर हे पेय दिलं जायचं.
हेही वाचा >>> अन्यथा : व्यायामाची गरज..!
पण हे पेय लोकप्रिय व्हायला सतरावं शतक उजाडावं लागलं. इंग्लंडमध्ये सत्ताबदल झाला आणि प्रॉटेस्टंटाचा कैवार घेणारा राजा सत्तेवर आला. त्यानं ब्रँडीच्या बदल्यात या पेयाचा पुरस्कार केला. त्या ‘ज्युनिव्हर’चा अपभ्रंश होऊन जिनिव्हा झालं आणि या जिनिव्हाचं अखेर झालं जीन. त्यात फ्रेंचांचं आणि इंग्लंडचं बिनसल्यामुळे फ्रान्समधनं येणारी द्रवरूप रसद आटली. मग काय? बघता बघता जीनची मागणी कमालीची वाढली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की १७३६ साली इंग्लंडच्या सरकारला ‘जीन अॅक्ट’ मंजूर करून तिचा दर्जा निश्चित करावा लागला.
हा काळ सोडला तर आणि पुढे नवनवी पेयं आल्यावर अगदी अलीकडेपर्यंत जीनकडे इंग्लिश अभिजन तसे कमीपणाच्या भावनेनेच बघत. जीन पिणाऱ्यांकडे ‘‘काय वेळ आलीये बिचाऱ्यांवर..(चच्च)…जीन प्यावी लागते’’ अशा नजरेनं पाहिलं जायचं. या बहुगुणी पण निर्गुणी पेयाला प्रतिष्ठा दिली ती आयन फ्लेमिंगच्या मानसपुत्रानं. म्हणजे जेम्स बाँड यानं. हा रगेल, रंगेल आणि उन्मत्त बाँड तितक्याच रंगेल, रगेल आणि उन्मत्त छटाकडीला हाताशी ठेवून जेव्हा ऑर्डर द्यायला लागला ‘‘मार्टिनी: शेकन; नॉट स्टर्ड’’ त्यामुळे जीनची प्रतिष्ठा एकदम वाढली. कारण मार्टिनी या कॉकटेलचा आधारच जीन. खरं तर अनेक कॉकटेल्सचे संसार या जीनमुळे मार्गी लागले. हिने इतक्या कॉकटेल्सना आधार दिलाय की त्याची स्पर्धा फ क्त पाण्याशीच होईल.
हेही वाचा >>> अन्यथा : इतिहास आणि वर्तमान!
ही सर्व जीन्सची पुण्याई. ती आता एकदम आठवून जीनबाबत कृतज्ञतेची भावना दाटून आली कारण घरात नुकतंच अनेक जीन्सचं आगमन झालं. आणि त्यांच्या कौतुकाचं आणखी एक कारण आहे. एकजात सगळ्या गोंयकार! या गोव्याचे उपकार मानावेत तितके थोडे. त्या गोव्याच्या लाल मातीत काय आहे काही कळत नाही. तिथून आलेले सूर आणि सुरा… दोघेही वेड लावतात. गोव्यातल्या सूरवंतांचं मोठेपण नव्यानं सांगायची काही गरज नाही. आताची ही ‘बैठक’ गोव्याच्या या नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या आणि अर्थातच नव्या चवीच्या सुरावंतांविषयी…
दोजा: हे प्रकरण तसं भारीच म्हणायचं. कारण भारतीय आणि जपानी संस्कृतीचा हा संकर आहे. त्यातले काही पदार्थ भारतीय आहेत तर काही जपानी. आता जपानी घटकांची नावं सांगून तसा काही उपयोग नाही. कारण त्यातलं काहीच कळत नाही. उदाहरणार्थ सांशो पेपर आणि हिनोकी यांचं अनोखं मिश्रण या जीनच्या चवीत आहे. ती ‘युझु डॉमिनंट’ आहे असंही तिचे निर्माते सांगतात. ही तीनही नावं जपानी संस्कृती, भाषातज्ज्ञ यांनाच माहीत असतील. अन्य आपल्यासाठी एक घटक फक्त महत्त्वाचा. चव. ‘‘एक घोट: दोन संस्कृती’’ असं तिचं वर्णन केलं जातं. कोणत्याही चांगल्या जीनप्रमाणे ही देखील अत्यंत हलकी, तरल अशी आहे.
निसाकी: ही बनते तांदळापासून. गोंयच्या ‘नुस्त्यां’चं (पक्षी: मासे) कालवण आणि त्या मातीतलं ‘शीत’ (पक्षी: भात) ज्यांनी खाल्लं असेल त्यांना सर्वसामान्य कुकरात शिट्ट्या फुंकत शिजणारा तांदूळ आणि गोव्याचा लालसर भात यातला फरक लगेच लक्षात येईल. (आणि ज्यांनी ही चव चाखली नसेल त्यांच्याविषयी फक्त अपार करुणा). तांदळाच्या अर्काचं तीन तीनवेळा ऊर्ध्वपतन झाल्यावर ती विशिष्ट जातीची लिंबं आणि भूमध्य समुद्री प्रदेशातली ज्युनिपर यांच्या रसाच्या साहाय्यानं मुरवली जाते. आता आपली लिंबं आणि युरोप, सायप्रस वगैरेतली संत्र्यांच्या आकाराची लिंबं यातलाही फरक जाणकारांना लक्षात येईल. हे सांगितलं कारण लिंबं म्हटलं की हातगाडीवर ‘वीसला पाच’ वगैरे मिळणारी हिरवी-पिवळी फळं ज्यातून दोन-चार थेंबांपेक्षा काही पडत नाही अशी काही चीजवस्तू अनेकांच्या डोळ्यासमोर येईल; म्हणून. तर असं हे मिश्रण नंतर दोन-दोनशे लिटरच्या तांब्यांच्या भांड्यात शांत केलं जातं. महिन्याभरानंतर ही शांतता मग आकर्षक बाटलीतून आपल्यापर्यंत येते. गंमत अशी की ही जीन ग्लासात रंग बदलते आणि पिणाऱ्याचा ‘रंग’ दाखवते. म्हणजे तीत सोडा घातला तर रंग वेगळा, टॉनिक वॉटर घातलं की वेगळा आणि साध्या पाण्यात ती वेगळी दिसते. गुलाबी, गडद गुलाबी ते निळा आणि आकाशी…! त्यामुळे चवीप्रमाणे रंगप्राशनाची हौसही पूर्ण करण्याची ‘ताकद’ तिच्यात आहे.
सोसी: हे प्रकरण अजबच आहे म्हणायचं. सगळे गुण घेऊनच ही सोसी जन्माला आलीये. म्हणजे असं की जीन म्हटलं की तिची चव घेताना लिंबू, संत्र्या-मोसंब्याचा रस, व्हर्जिन मोईतो वगैरे असं काय काय मिसळावं लागतं. जीनला स्वत:चं असं काही व्यक्तिमत्त्व नसतं. पण हिचं तसं नाही. करवंदासारख्या दिसणाऱ्या ज्युनिपर बेरी, कोथिंबीर, काळी मिरी, वेलची आणि चक्क काकडी यांच्या रस-स्वादात ही बनते. यातही वेलची आणि काकडी वगैरे म्हणजे खासच. बहुधा उपवासाला चालणारी जीन बनवायचा प्रयत्न असावा या कंपनीचा. त्यामुळे हिचा आनंद घेणं एकदम सोपं. पाणी किंवा सोडा फक्त. बाकी तिची तीच…
पुमोरी: ही सोसीची थोरली बहीण असावी. ती परदेशस्थ तर ही देशस्थ. हिमालयन ज्युनिपर बेरी, वेलची, बदाम, व्हॅनिला, विशिष्ट संत्र्या-लिंबांची साल, रोझमेरी, जायफळ, धने, दालचिनी, ज्येष्ठमध… असे काय काय घटक तिच्यात आहेत. पण महत्त्वाचं असं की ती ‘हँड क्राफ्टेड’ आहे. म्हणजे तिचं उत्पादन अगदी मर्यादित असं केलं जातं. म्हणजे कारखान्यातल्या उत्पादनाप्रमाणं ती बनवली जात नाही. अगदीच निगुतीनं चंद गिने-चुने शौकिनांपुरतीच ती बनते.
या ‘चारचौघी’ गोव्यात बनतात. गेल्या वर्षभरात जवळपास अर्धा डझन नव्या जिन्स एकट्या गोव्यात जन्माला आल्यात. खरं म्हणजे गोवा हा काही जीनप्रदेश नव्हे. ही भूमी काजू-कन्या फेणीची. पण त्या मांडवी-जुवारी-शापोरा-साळ नद्यांच्या पाण्यात काय जादू आहे कळत नाही. त्यांच्या काठी नवनवे प्रयोग होत राहतात. इतक्या साऱ्या जीनची निर्मिती हा असाच एक प्रयोग… दिवस कसे बदलतात ते दाखवणारा…!
तेव्हा या ‘जीन थेरपी’चा उपचार करून पाहायला हरकत नाही. निमित्त आहेच…
girish.kuber @expressindia.com
@girishkuber