गिरीश कुबेर

पाठीला कणा असतो आणि तो वापरायचा असतो, याची एकालाच नाही, तर अनेकांना जाणीव होती, अशा काळात राज कुमार तलवार वावरले. बरं आहे तलवार आता हयात नाहीत! पण त्यांची गोष्ट पुन:पुन्हा सांगण्यासारखी..

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
Loksatta samorchya bakavarun Supreme Court Article Prohibition of conversion of places of worship
समोरच्या बाकावरून: हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे?
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…
icc agree for hybrid format for 2025 champions trophy
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम

काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्यासारख्या असतात. ही एक त्यातली. ती आहे एका ‘साध्या’ माणसाची. त्याचा जन्म पाकिस्तानातला. १९२२ सालचा. शिक्षण म्हणाल तर लाहोर विद्यापीठाची गणितातली पदवी. त्या लाहोरातच ते १९४३ साली एका बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाले. अंगभूत गुणवत्तेच्या जोरावर झरझर वर चढत गेले. लाहोरातून पश्चिम बंगाल. नंतर मद्रास. हैदराबाद सर्कल म्हणजे अख्ख्या आंध्र प्रदेशाची जबाबदारी अशा ठिकठिकाणी महत्त्वाची पदं त्यांना मिळत गेली. गुणवत्तेच्या जोडीला होती तत्त्वनिष्ठा. स्वत:च्या मताशी ठाम राहू देणारी नैतिकता. अशा गुणांना महत्त्व असणारा तो काळ. त्याच काळानं मग १ फेब्रुवारी १९६८ या दिवशी या ‘सामान्य’ माणसाला त्या बँकेचं व्यवस्थापकीय संचालक केलं. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी हा सामान्य माणूस या बँकेचा प्रमुख बनला.

त्याचं नाव राज कुमार तलवार आणि त्यांना नोकरी देणाऱ्या संस्थेचं नाव इम्पीरिअल बँक ऑफ इंडिया. म्हणजेच आजची स्टेट बँक ऑफ इंडिया. सगळ्यात लहान वयात बँकेचं प्रमुखपद दिलं जाण्याचा विक्रम तलवारांचाच, तो आजपर्यंत कायम असावा. १९६९ मध्ये बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे सगळ्याच बँका त्यावेळी एकाच पातळीवर आल्या. पण स्टेट बँकेला सगळ्यांमधली एक असून चालणार नाही, हे तलवार यांना लक्षात आलं. त्यांनी नवनवे प्रयोग केले. तोपर्यंत बँका फक्त बड्या उद्याोगपतींना वगैरेच कर्ज द्यायच्या. सामान्य माणसाला काही थाराच नव्हता. तलवार यांनी हे चित्र बदललं. बँकेला ग्राहकाभिमुख केलं. आणि बघता बघता स्टेट बँक इतरांपेक्षा मोठी झाली. देशाच्या मध्यवर्ती रिझर्व्ह बँकेच्या खालोखाल स्टेट बँक गणली जाऊ लागली. ‘बँकांची बँक’ असं तिला मानलं जाऊ लागलं.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : वसुंधरेचा फिरता रंगमंच

नंतर काळ बदलला.

तो इंदिरा गांधी यांचा काळ. बांगलादेश युद्ध, गुंगी गुडिया वगैरे. तो इंदिरा गांधींचा ताठ कणा. अमेरिकेच्या रिचर्ड निक्सन, हेन्री किसिंजर अशा मातबरांना वाट पाहायला लावणारं त्यांचं वर्तन वगैरे असणं सगळं काही छान छान होतं सुरुवातीला. मग आली आणीबाणी. आणि त्या आणीबाणीतलं संजय गांधी यांचं प्रति-पंतप्रधान असल्यासारखं वागणं. आपण म्हणजेच सरकार अशी गुर्मी. त्यातूनच त्यांनी तेव्हाचे अर्थमंत्री सी. सुब्रमण्यम यांना आदेश दिला… स्टेट बँकेला सांगा अमुक एका सिमेंट कंपनीला कर्ज द्यायचंय.

ती अमुक एक कंपनी होती देशातल्या आजही तितक्याच बड्या असलेल्या वर्तमानपत्र समूह चालवणाऱ्या कुटुंबाच्या मालकीची. राजस्थानात असलेली ही कंपनी अन्य सिमेंट कंपन्यांच्या तुलनेत अगदीच भिकार. नवीन तंत्रज्ञान नाही. गुंतवणूक नाही. त्यामुळे सिमेंटची गुणवत्ता नाही. आणि म्हणून मागणी नाही. त्यामुळे कर्जही द्यायला कोणी तयार नाही. या कुटुंबानं स्वतंत्रपणे प्रयत्न करून पाहिला. पण कर्ज काही मिळेना. एव्हाना इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीचा वरवंटा फिरू लागलेला. इंडियन एक्स्प्रेससारख्या समूहानं त्या आणीबाणीविरोधात ठाम भूमिका घेतलेली. पण इंडियन एक्स्प्रेस हा एकमेव अपवाद ठरला होता. सिमेंट कंपनीसाठी कर्ज घेऊ पाहणारा तो वर्तमानपत्र समूह मात्र ‘अनुशासन पर्व’ म्हणत आणीबाणीचे गोडवे गाऊ लागला. सत्ताधीश कोणीही असो त्याच्या तालावर नाचण्याची या समूहाची सवय रक्तातलीच. तर ही आणीबाणीची आरती करत करत हा समूह संजय गांधींपर्यंत पोचला. सर्वच सत्ताधाऱ्यांना लांगूलचालन करणारे माध्यमसमूह आवडतात. हे कालातीत सत्य. हा त्यामुळे संजय गांधींच्या गळ्यातला ताईत झालेला. त्याचा फायदा घेत या समूहानं संजय गांधींना विनंती केली… आमच्या सिमेंट कारखान्याला कर्ज हवंय.

हे काय काम आहे? संजय गांधी यांना असं वाटलं. त्यांनी सुब्रमण्यम यांना सांगितलं… स्टेट बँकेला सांगा या कंपनीला कर्ज द्या. सुब्रमण्यम यांनी तलवार यांना सांगितलं, ‘कर्ज द्यायचा आदेश आहे वरनं’

तलवार म्हणाले… जमणार नाही.

सुब्रमण्यम हादरले. त्यांनी तलवार यांचं मत तसंच्या तसं ‘वर’ कळवलं. वर बसलेला धक्का यापेक्षाही मोठा होता. अजूनही या देशात कोणी ताठ मानेनं उभं आहे हे संजय गांधी यांना खरंच वाटेना. त्यांनी सुब्रमण्यम यांना सांगितलं… तलवार यांना सांगा मला भेटायला या. सुब्रमण्यम यांनी स्वत: तसा निरोप तलवार यांना दिला.

‘संबंध काय?’, असं त्यावर तलवार म्हणाले. पंतप्रधानांचा मुलगा म्हणून काही वेगळे घटनात्मक अधिकार असतात काय त्यांना? नाही ना. मग मी त्यांना भेटायला जायचं कारणच काय?

या प्रतिवादानं खरं तर सुब्रमण्यम यांचीच पाचावर धारण बसली असणार. ते म्हणाले, तो त्या सिमेंट कारखान्याच्या कर्जाचा मुद्दा आहे. देऊन टाक कर्ज त्यांना. तुझं काय जातंय?

‘‘ …पण स्टेट बँकेचं जाईल ना. स्टेट बँकेच्या हितरक्षणाची जबाबदारी माझी आहे. आहे त्या परिस्थितीत अजिबात कर्ज दिलं जाणार नाही. ते बुडीत खात्यात जाणार. हवं असेल तर त्यांनी या कंपनीची मालकी अन्य कोणाकडे द्यावी. मग मी कर्ज देण्याचा विचार करीन.’’

सुब्रमण्यम यांनी तलवार काय म्हणाले ते तसंच्या तसं स्वत: जाऊन संजय गांधी यांना सांगितलं. संजय गांधी रागानं वेडेपिसे झाले. मालकी बदला असं त्या माध्यम समूहाला सांगणं म्हणजे आपल्याला अधिकार नाही, याची कबुली देणं. संतापानं धुमसणाऱ्या संजय गांधी यांनी सीबीआयला आदेश दिला. ‘‘तलवार यांची चौकशी करा. काहीतरी काळंबेरं आढळायला हवं.’’

तोपर्यंत सीबीआयच्या प्रमुखांनाही पाठीचा कणा असायचा बहुधा. कारण सीबीआयनं चौकशी केली, जंगजंग पछाडलं. पण तलवार यांच्या विरोधात काहीही आढळलं नाही. कणावाल्या प्रमुखांनी हे संजय गांधी यांना सांगितलं. (तेव्हा ईडी-पिडी नव्हती. असो). संजय इतके रागावले की त्यांनी देशाच्या अर्थमंत्र्याला तिथल्या तिथे आदेश दिला. ‘‘तलवार यांना काढून टाका.’’ हे सगळं तलवार यांच्या कानावर गेलं. ते जणू काही घडलंच नाही, असं वागत होते. ते जराही विचलित झाले नाहीत.

पण त्यामुळे सुब्रमण्यम यांची डोकेदुखी वाढली. संजय गांधी यांचा आदेश तर पाळायलाच हवा. तलवार यांना तर घालवायला हवं. पण ते करायचं कसं? कारण ज्या कायद्यान्वये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्या १९५५ च्या कायद्यानुसार बँकेच्या प्रमुखाला असं पदावरनं काढायची काही तरतूदच नव्हती. सुब्रमण्यम यांना लक्षात आलं, आपण काही तलवार यांना काढू शकत नाही. तसं त्यांनी संजय गांधी यांना सांगितलं. तलवार या नावानंही एव्हाना संजय गांधी यांचा मस्तकशूळ वाढू लागला होता. त्यांना काहीही ऐकायचंच नव्हतं. त्यांनी सुब्रमण्यम यांना आदेश दिला. ‘‘कायदा बदला.’’

तोपर्यंतच्या स्टेट बँक कायद्यानुसार प्रमुखपदावर एखादी व्यक्ती नेमली की नेमली. तिचं काही करता येत नसे. संजय गांधी यांच्या हट्टानुसार मग हा कायदा बदलून स्टेट बँकेच्या प्रमुखाला काढण्याचे अधिकार सरकारला देणारं उपकलम घातलं गेलं. हा बदल झाला आणि ४ ऑगस्ट १९७६ या दिवशी तलवार यांना १३ महिन्यांच्या रजेवर पाठवणारा आणि पदाची सूत्रं दुसऱ्याकडे देण्याचा आदेश प्रसृत झाला.

तलवार शांतपणे पायउतार झाले. पाँडिचेरीला त्यांनी आपलं बस्तान हलवलं. ते त्यांचं आवडीचं ठिकाण. त्या ठिकाणी अगदी साधेपणानं ते राहायचे. सायकलवरनं फिरायचे. २००२ साली ते निवर्तले.

तेव्हापासून सुरू झाला मुदतवाढ देता-घेता येणाऱ्या प्रमुखांचा काळ. या काळात मग एखादा उद्याोगपती पंतप्रधानांच्या समवेत दिसल्या दिसल्या त्याची कर्ज मंजूर होऊ लागली. त्या उद्याोगपतीच्या डोक्यावरच्या कर्जडोंगराकडे दुर्लक्ष सुरू झालं. एखादा प्रमुख बँकेच्या काऊंटरवर एखाद्या फोन कंपनीची सिम कार्डं ठेवू लागला आणि निवृत्तीनंतर त्या फोन कंपनीचा संचालक होऊ लागला. याच काळात स्टेट बँकेचे प्रमुख दिनेश खारा यांना साठीनंतरही २०२४ च्या ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ लागली आणि याच काळात एका दिवसातल्या कामासाठी स्टेट बँक ११४ दिवसांची मुदतवाढ मागू लागली.

एकदा परदेश दौऱ्यात तलवार यांना तिथल्या एका बड्या बँकेचा प्रमुख भेटला. त्याला स्टेट बँक माहीत नव्हती. तलवार त्याला म्हणाले : स्टेट बँक लवकरच भारतातली सगळ्यात मोठी बँक होईल; तेव्हा तुझा परिचय होईलच. तुला लक्षात येईल स्टेट बँक इज अ बँक दॅट कॅन डू नो राँग.

बरं आहे तलवार आता हयात नाहीत! पण त्यांची गोष्ट का सांगायची?

सत्ता मिळाली की सगळेच कसे एकसमान, एकसारखे असतात हे कळावं म्हणून.

काही काही गोष्टी खरंच पुन्हा पुन्हा सांगण्यासारख्या असतात!

girish.kuber

@expressindia.com @girishkuber

Story img Loader