खोदकामाचे प्रचंड स्वरूप व हजारो मजूर पाहून हरिद्वारचे पुजारी व परिसरातील लोक बिथरले. ‘आपल्या गंगामातेला वळवून तिचे पवित्र पाणी इतरत्र पळवून नेण्याचा इंग्रजांचा डाव आहे’ असा अपप्रचार सुरू झाला. पण..

प्रत्येकाचा जन्म एखादे जीवित कार्य करण्यासाठी होतो. काही जणांना आपले जीवित कार्य सापडते. काही जणांना आयुष्यभर सापडत नाही. प्रॉबी कॉटली या इंग्रज इंजिनीअरला आपले जीवितकार्य भारतात सापडले. ते होते – मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या लाखो भारतीयांसाठी गंगा कालवा बांधण्याचे.

technical inventions used by indians brilliantly in the freedom struggle
स्वातंत्र्याच्या पाऊलवाटेवरचे तंत्रज्ञान!
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
chipuln flood
चिपळूणच्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश
Four rabid Naxalites surrender gadchiroli news
२८ लाखांचे बक्षीस, ८२ गुन्हे…चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Chandrashekhar Bawankule , Chandrashekhar Bawankule Amravati ,
चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट? चर्चेला उधाण…

वर्ष १८३८. प्रॉबी कॉटली सहारानपूर येथे नोकरीवर होते. त्याच काळात भीषण दुष्काळ पडला होता. हजारो कुटुंबे देशोधडीला लागली होती. मृत्यूचे असे थैमान की, सहारानपूर येथे दररोज १००-२०० भुकेली माणसे खुरडत यमुनेकाठी येऊन प्राण सोडत. सकाळी सैन्याच्या तुकडया त्या अस्थीपंजर देहांची विल्हेवाट लावून, यमुनेचा किनारा ‘स्वच्छ’ करीत. मृत्यूचे हे तांडव पाहून कॉटली अंतर्बाह्य हादरले. ‘सिंचन’ हाच या संकटावरचा कायमस्वरूपी उपाय होता. त्यासाठी ‘गंगा कालवा’ निर्माण करणे हेच आपले जीवितकार्य आहे असे कॉटली यांनी ठरवले आणि त्यांच्या जीवनातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

प्रॉबी कॉटली यांचा जन्म ३ जानेवारी १८०३ रोजी इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमध्येच शिक्षण घेऊन ते १८१९ मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘बंगाल आर्टिलरी’त प्रविष्ट झाले. ‘बंगाल इंजिनीअर्स’च्या दिल्ली विभागात कॅनॉल सुपिरटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. मध्ययुगात यमुनेवर बांधण्यात आलेल्या ‘पूर्व यमुना कालव्या’ची देखरेख व बांधकाम हे त्यांचे काम होते. १३ वर्षे त्यांनी मथुरा, आग्रा आणि सहारानपूर येथे काम केले. त्या काळात इथे वारसा प्रश्नावरून ईस्ट इंडिया कंपनी आणि संस्थानिक यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. त्याच वेळी कॉटली मात्र दुष्काळावर मात करण्यासाठी गंगा कालव्याचा विचार करीत होते. १८३६ मध्ये त्यांनी हरिद्वार येथून गंगा व यमुना दुआबात कालव्याने पाणी नेण्याची संभाव्यता शोधून पाहिली होती. पण ते जमले नाही. सोबत त्यांनी कालव्याच्या झडपांचे प्रयोग आणि जलयांत्रिकीचा अभ्यास केला. एका महान कार्यासाठी ते नकळत तयार होत होते. त्याच काळात वर उल्लेखलेला १८३७-३८ चा भीषण दुष्काळ पडला.

हेही वाचा >>> बुकमार्क : आजच्या काळातील भयकथा

दोन नद्यांच्या मधील प्रदेश म्हणजे दुआब. हा शब्द आप म्हणजे पाणीवरून आलेला आहे. उत्तर भारताचा बराच भाग गंगा व यमुना यांच्या दुआबात येतो. दोन महान नद्यांच्या मधील हा सुपीक गाळाचा प्रदेश खरे तर भारतातील सर्वात समृद्ध भाग असावयास हवा. पण लहरी मान्सून व विशिष्ट भूरचनेमुळे तो सतत पूर किंवा दुष्काळात उद्ध्वस्त होत होता. हजारो वर्षांत कुणीही यावर उपाय योजना केली नव्हती. १३५५ मध्ये फेरोजशहा तुघकाच्या काळात यमुनेवर एक कालवा बांधण्यात आला होता. पण त्याच्यातून होणारे सिंचन मर्यादित असून त्याचा दुआबात काही उपयोग नव्हता.

वरिष्ठ इंजिनीअर कॉल्व्हीन निवृत्त होताच कॉटली प्रमुख बनले. हरिद्वारच्या वरच्या बाजूस बंधारा गृहीत धरून सर्वेक्षण सुरू झाले. एकटयाने मोजमापे, नोंदी घेऊन १८३८ मध्ये त्यांनी प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला. ईस्ट इंडिया कंपनीला असल्या कामात फारसा रस नव्हता. हे सर्वेक्षण पूर्ण करण्यास परवानगीच तब्बल एक वर्षांनंतर मिळाली. जीवतोड मेहनत करून १८४० मध्ये कॉटलींनी आपला अहवाल सादर केला. अखेर १८४१ मध्ये गव्हर्नर जनरल ऑकलंड यांनी ‘कमीत कमी खर्चात करावे’ या सूचनेसह गंगा कालव्याच्या कामास मान्यता दिली. त्यामागे दुष्काळ कायमचा दूर करणे, यापेक्षाही कंपनीला अधिक महसूल मिळेल हे धोरण होते. १८४२ मध्ये प्रत्यक्ष खोदकामाला व वीटभट्टया सुरू करायला परवानगी मिळाली. इतकी वर्षे एकाकी काम करणाऱ्या कॉटलींना काही कर्मचारी मिळाले.

हरिद्वारजवळ प्रत्यक्ष खोदकाम सुरू झाले, तेव्हा एक नवीच समस्या उभी राहिली. खोदकामाचे प्रचंड स्वरूप व हजारो मजूर पाहून हरिद्वारचे पुजारी व परिसरातील लोक बिथरले. ‘आपल्या गंगामातेला वळवून तिचे पवित्र पाणी इतरत्र पळवून नेण्याचा इंग्रजांचा डाव आहे’ असा अपप्रचार सुरू झाला. कॉटलींनी चर्चेतून लोकांची समजूत घातली. गंगेचा एक अस्खलित प्रवाह स्नानासाठी कायम ठेवण्याचे आश्वासन देऊन हरिद्वार येथे नव्याने घाटांचे बांधकाम सुरू केले. लोकांना कालव्याचे महत्त्व पटू लागले आणि विरोध मावळू लागला. पण पुन्हा अडचणी उभ्या राहिल्या. काबूल युद्धामुळे पैशाचा तुटवडा निर्माण झाला. कालव्याचे काम बंद पडले. दरम्यानच्या काळात कॉटलींचा फॅनी यांच्याशी विवाह झाला. परंतु कॉटलींकडे सुखविलासासाठी वेळ नव्हता. विवाहानंतर काही दिवसांतच त्यांनी पुन्हा कालव्याच्या कामात वाहून घेतले. त्यामुळे फॅनीशी त्यांचा दुरावा वाढत होता. त्यांचा मुलगा वॉल्टर सतत आजारी असे. कंटाळून फॅनी इंग्लंडला परत गेली. कॉटली अतिश्रमाने आजारी पडले. विश्रांतीसाठी ते इंग्लंडला गेले. पण तेथे अखेर पत्नीने त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. मुलगा वॉल्टरचा मृत्यू झाला. कौटुंबिक आघाडीवर असे पराभूत झाले तरी ते स्वस्थ बसले नाहीत. तेथे त्यांनी जीवाश्मांवर संशोधन केले. त्याबद्दल पुढे त्यांना १९४६ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आले. या काळात त्यांनी इंग्लंडमधील कालव्यांचा अभ्यास केला.

१८४५ मध्ये गंगा कालव्याचे काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आणि कॉटली भारतात परतले. दरम्यान कालव्याची अनेक कामे सुरू झाली होती. या शेकडो किलोमीटर लांबीच्या कालव्याला अनेक शाखा होत्या. त्या वेळी त्या प्रकारचे ते जगातले सर्वात मोठे काम होते. पण कालव्याच्या कामासाठी हवे तेवढे प्रशिक्षित इंजिनीअर्स उपलब्ध नव्हते. कॉटलींच्या आग्रहांमुळे मग रुरकी येथे भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. नोकरशाहीचे अडथळे, वरिष्ठांचा लहरीपणा, ज्यांच्यासाठी कालवा होता त्यांचीच अनास्था या सर्वांवर मात करीत कॉटलींनी आपले काम पूर्ण केले. दुआबात हरिद्वार ते अलाहाबादपर्यंत जाणारा गंगेवरचा पहिला ‘गंगा कालवा’ तयार झाला. एप्रिल १८५४ मध्ये गव्हर्नर जनरल डलहौसींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्यासाठी अनेक संस्थानिक व लाखो लोक उपस्थित होते.

हे महान काम पूर्ण करून कॉटली निवृत्त झाले. इंग्लंडला जाण्यापूर्वी कोलकाता येथे जनतेतर्फे गव्हर्नर जनरल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला व तेथील टाऊन हॉलमध्ये जिवंतपणी त्यांचा पुतळा बसवण्यात आला. लोक त्यांचा उल्लेख ‘गॉड इंजिनीअर’ असा करू लागले. १८६०-६१ मध्ये उत्तर भारतात त्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ पडला. पण या वेळी दुआबात गंगा कालवा होता. त्यामुळे तेथे दहा लाख लोकांना वर्षभर पुरेल एवढया अन्नधान्याची निर्मिती झाली व जिथून गंगा कालवा गेला होता, तेथे जनावरे व माणसे यांची उपासमार टळली.

आज गंगा कालवा आणि त्याच्या शाखा व वितरिका यांची एकूण लांबी २५ हजार कि. मी. असून जगातले हे सर्वात मोठे जलजाळे आहे. कालव्याच्या उद्घाटन प्रसंगी रुरकी येथे कॉटलींनी उभारलेले सिंहाचे दोन भव्य पुतळे आणि गंगा कालव्याचे बांधकाम आजही तसेच भक्कम आहे. हरिद्वारच्या ‘हर की पौरी’ येथे खळाळणारे आणि त्या दुआबात सर्वदूर शेतापर्यंत अव्याहत झुळझुळणारे गंगेचे पाणी सांगत असते – १७० वर्षांपूर्वीच्या गंगा कालव्याची आणि प्रॉबी कॉटलींची कहाणी.

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत. 

lkkulkarni@gmail.com

Story img Loader