सुदानमध्ये सध्या जे सुरू आहे, ते सर्वसाधारणपणे अनेक आफ्रिकी देशांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि तेथील भारतीयांच्या परिस्थितीवरून आपल्या देशात जे राजकारण सुरू आहे, ते येथील राजकीय ध्रुवीकरणाचे निदर्शक ठरते. एके काळी सुदान हा आफ्रिकेतील सर्वात मोठय़ा आकाराचा देश होता. गेल्या दशकात दक्षिण सुदान या देशापासून फुटून वेगळा झाल्यानंतर ही परिस्थिती बदलली. सहाराच्या दक्षिणकेडील मोजक्या अरब आफ्रिकी देशांपैकी हा एक. रूढार्थाने आफ्रिकी टोळय़ांमार्फत तो चालवला जातो असे नाही. येथील नागरिक स्वत:ला अरब म्हणवतात. अरब समूहातील धनाढय़ आणि प्रभावी अरब देशांना हा दावा मान्य असल्यामुळे सुदान हा अरब लीगचाही सदस्य आहे. तरी या देशाचा प्रकृतिपिंड अरबांपेक्षा आफ्रिकी देशांच्या जवळ जाणारा. इतर अनेक अरब देशांसारखा हा देश सधन व सुस्थिर अजिबातच नाही. पण लोकशाही हे सामूहिक उत्थानाचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे इतर अनेक आफ्रिकी देशांतील जनतेप्रमाणे सुदानी जनतेलाही वाटते. पण लोकशाही व्यवस्था आल्यास आपल्या मनमानीवरच नव्हे तर अस्तित्वावरही गदा येईल, ही भीती वाटणारे लष्करशहा येथेही आहेत. त्या देशात सध्या लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल बुऱ्हान आणि निमलष्करी दलांचे प्रमुख जनरल मोहमद हमदान दगालो यांच्या समर्थकांमध्ये आणि सैनिकांमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. सुदानमध्ये लष्करी राजवटीकडून लोकशाही व्यवस्थेकडे संक्रमण कशा प्रकारे व्हावे, या मुद्दय़ावरून दोहोंमध्ये मतभेद आहेत. त्यातून हे युद्ध भडकल्याची मीमांसा पाश्चिमात्य माध्यमे करतात. इतक्या तात्त्विक मुद्दय़ावर मतभेद असल्यास त्यासाठी राजधानी खार्टूममधील जनतेस वेठीस कशासाठी धरले जाते हा प्रश्न उपस्थित होतोच. खार्टूममध्ये दोन दलांदरम्यान विपुल प्रमाणात युद्धसामग्री आणि सैनिकांचा वापर सुरू आहे. तेव्हा लोकशाहीच्या पुनरुत्थानासाठी नव्हे, तर सुदानच्या निरंकुश आधिपत्यासाठी ही लढाई सुरू आहे हेच खरे सत्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा