भाऊसाहेब आहेर
दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ऊसतोड कामगार विविध राज्यांत स्थलांतर करतात. जवळजवळ सहा महिन्यांसाठी ते स्वत:चे गाव आणि कुटुंबापासून दूर राहतात. जिथे जातात तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था गावाबाहेरच असते. कधी ती स्मशानाजवळ तर कधी हागणदारीजवळही असते. वीज, पाणी, शाळा, दवाखाना अशा मूलभूत सोयीसुविधांसाठी या कामगारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागते. पाण्याची कमतरता, पिण्याचे अशुद्ध पाणी, अस्वच्छ जागा, अत्याधिक शारीरिक श्रम, अपुरी विश्रांती, कामाचा ताण, अंधश्रद्धा, व्यसन आणि आरोग्यसेवा-सुविधांचा अभाव यामुळे या कामगारांमध्ये आजारांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या आरोग्याकडे फारसे कुणाचे लक्ष नसते. ऊसतोड कामगारांना ती गावे नवीन असतात. गावाबाहेर राहावे लागत असल्यामुळे दवाखाने जवळ नसतात. फडावरही आरोग्य कर्मचारी फारसे फिरकत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्याची स्थिती

ऊसतोडीसारख्या मेहनतीच्या कामात दुखापत, अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, दूषित पाण्यामुळे होणारे जुलाब-उलट्यांसारखे आजार नेहमीचेच असतात. त्यात महिलांमध्ये जननेंद्रियांच्या संसर्गामुळे होणारे गर्भाशयाचे आजार, शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढावा लागण्याचे प्रमाणही अधिक आहे. गावाबाहेर फड असल्यामुळे दवाखान्यात गेल्यावर दिवसाचा रोजगारही बुडतो आणि त्या दिवसाचा खाडाही भरावा लागतो. दवाखाना, जाणे-येणे आणि औषधपाण्याला पैसे लागतात ते वेगळेच. म्हणजे तिहेरी नुकसान. त्यामुळे अनेकदा लहानसहान आजार अंगावरच काढले जातात. ज्याची परिणती पुढे गंभीर आजारांत होण्याची शक्यता अधिक असते. वेळा जुळत नसल्यामुळे काही वेळा उपचारांसाठी खासगी दवाखान्यात जावे लागते. अनेकदा स्थानिक औषधांच्या दुकानातून औषधे घेतली जातात.

आरोग्यावरील खर्च

वर्ष २०२२-२३ मध्ये ‘सोपेकॉम’ या ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणाऱ्या संस्थेने बीड व हिंगोली जिल्ह्यातून ऊसतोडीस गेलेल्या, ४३ कामगार कुटुंबांच्या आरोग्यसेवांवरील खर्च आणि आजारांचे स्वरूप यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून धक्कादायक बाबी समोर आल्या. १५ प्रकारच्या आजारांच्या नोंदींपैकी तब्बल २५ टक्के प्रकरणांमध्ये कोणताही उपचार घेण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे ७१ टक्के रुग्णांनी खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेतले, तर १४ टक्के प्रकरणांमध्ये केवळ औषधांच्या दुकानातून औषधे घेण्यात आली. सरकारी आरोग्यसेवा मोफत असली तरीही वेळ गैरसोयीची असल्यामुळे २९ टक्के प्रकरणांमध्येच कामगारांना तिचा लाभ घेता आला. सरकारी आणि खासगी आरोग्यसेवांमधील खर्चातील तफावत अधिकच गंभीर आहे. सरकारी दवाखान्यात तपासणी आणि उपचारांसाठी कामगारांना सरासरी १४० रुपये खर्च आला. याउलट, खासगी दवाखान्यात तपासणी, उपचार आणि औषधांसाठी तब्बल एक हजार ५२० रुपये खर्च करावे लागले. याचा सरळ अर्थ असा की, खासगी आरोग्यसेवांवरील खर्च सरकारी सेवांच्या तुलनेत पाचपट अधिक आहे.

अभ्यासातून हे स्पष्ट होते की, साध्या आजारांसाठीसुद्धा ऊसतोड कामगारांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सरकारी आरोग्यसेवा कार्यक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर गरिबी आणि आरोग्य संकटाचा दुहेरी फास या कामगारांच्या गळ्यात अडकतच राहणार आहे.

‘आरोग्य सखी’ एक अभिनव प्रयोग

ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज वारंवार समोर येत असल्याने, यावर उपाय म्हणून ‘सोपेकॉम’ या संस्थेने ‘अनुसंधान ट्रस्ट- साथी’ या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या सहकार्याने ‘आरोग्य सखी’ हा अभिनव प्रयोग राबवला. साध्या आजारांच्या उपचारासाठी ऊसतोडीला जाणाऱ्या महिलांनाच प्रशिक्षित करणे हा या प्रयोगाचा उद्देश. यामुळे त्या ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतील आणि त्यांचे पैसेही वाचवू शकतील. या प्रयोगासाठी बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील ‘महिला ऊसतोड कामगार संघटनां’शी संलग्न, किमान लिहिता-वाचता येणाऱ्या २० महिला ऊसतोड कामगारांची ‘आरोग्य सखी’ म्हणून निवड करण्यात आली. आरोग्य सखींना सहज सोप्या पद्धतीने समजावे म्हणून चित्रमय प्रशिक्षण पुस्तकाचा (मोड्युल) वापर करून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात साध्या आजारांवर उपचार (अंगदुखी, डोकेदुखी, ताप, जुलाब- उलट्या), जखमांची काळजी, स्वच्छता, मासिक पाळी व्यवस्थापन, गर्भवतींना मार्गदर्शन, जलशुद्धीकरण, संदर्भ सेवांची माहिती, फडावर स्वच्छतागृहांची व्यवस्था, स्थानिक आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधणे, तसेच सरकारी आरोग्य योजनांबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. या आरोग्य सखींना आरोग्याबद्दल किती माहिती आहे हे समजून घेण्यासाठी त्यांची प्रशिक्षण पूर्व-परीक्षा घेण्यात आली. तसेच, प्रशिक्षणातून त्या किती शिकल्या हे तपासण्यासाठी प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा घेण्यात आली. सर्व महिलांनी उत्तम गुण मिळवत आपण सक्षम आरोग्य सखी असल्याचे सिद्ध केले. याची प्रचीती त्यांना प्रत्यक्षात आरोग्य सखी म्हणून जबाबदारी पार पाडताना येऊ लागली.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरोग्य सखींना प्राथमिक उपचारासाठी गरजेच्या सर्व औषधांसह आवश्यक सामग्री असलेली औषधांची पेटी देण्यात आली. उपचार करताना आरोग्य सखींना औषधांची ओळख सहज आणि अचूक व्हावी, यासाठी औषधांच्या डब्यांवर संबंधित आजारांच्या उपचारानुसार स्पष्ट चित्रे आणि औषधांची नावे मोठ्या आणि वाचनीय अक्षरात चिकटवण्यात आली. यामुळे त्यांना कोणत्या आजारासाठी कोणते औषध द्यावे, हे त्वरित ओळखता येते. यासोबतच, औषधांचा वापर अधिक अचूक आणि सुरक्षित व्हावा व आरोग्य सखींना औषधांच्या वापराबाबत अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोपी व चित्रमय पुस्तिकाही देण्यात आली. ही औषधांची पेटी घेऊन त्या ऊसतोडणीच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांवर उपचार करू लागल्या. सोबतच त्यांना दिलेल्या नोंदवहीत रुग्णाची माहिती, उपचार, औषधांचा डोस याची नोंद करू लागल्या. नोंदींचे विश्लेषण केल्यावर, ‘आरोग्य सखी’चा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसून आले. नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या पाच महिन्यांत ३४९ रुग्णांवर या आरोग्य सखींनी उपचार केले. या प्रयोगामुळे कामगारांचे दवाखान्यात जाणे, तपासणी खर्च आणि औषधांवरचा खर्च वाचला. कामगारांचे जवळपास ४ लाख २७ हजार रुपये वाचले.

या वर्षी बीड जिल्हा आरोग्य विभागाने या प्रयोगाला पाठबळ देऊन आरोग्य सखींना आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून दिला. त्यात पॅरासिटॅमॉल, डोमपरिडोन, फ्युराझोलिडोन, कापूस, बँडेज, कॅल्शियमच्या गोळ्या इत्यादींचा समावेश होता. या पाठबळामुळे आरोग्य सखी कामगारांवर अधिक सक्षमपणे उपचार करू लागल्या. हिंगोली जिल्हा आरोग्य विभागानेही या उपक्रमाला समर्थन दर्शवले असून पुढील हंगामात औषधांचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

या आरोग्य सखी ऊसतोड ठिकाणीच नव्हे, तर आपल्या गावातही कामगारांच्या आरोग्यासाठी कार्यरत आहेत. काही आरोग्य सखी आरोग्यवर्धिनी केंद्रातील ‘जन आरोग्य समिती’त या कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहेत. ऊसतोड कामगारांसाठी गाव व आरोग्यवर्धिनी पातळीवर आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मागील दोन वर्षांत बीड व हिंगोली जिल्ह्यात ३० गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली, ज्यात १००० महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

आरोग्य सखींचे अनुभव

हिंगोली जिल्ह्यातील जलालदाभा गावच्या आरोग्य सखी अरुणा घोंगडे सांगतात, ‘‘लोक मला ‘फडावरची आशा’ म्हणायचे, ते ऐकून खूप छान वाटायचं. मी आमच्या टोळीतील ५७ लोकांवर उपचार केले. दवाखाना लांब असल्याने कामगार रात्री उशिराही माझ्याकडे यायचे. महिलांमध्ये कंबरदुखी, डोकेदुखी यांसारखे आजार जास्त दिसतात. पॅराच्या गोळ्या आणि बँडेज संपायच्या, त्यामुळे पुन्हा पुन्हा गोळ्या मागवाव्या लागायच्या.’’ बीड जिल्ह्यातील काठोडा गावच्या साधना वाघमारे सांगतात, ‘‘मी ४७ लोकांवर उपचार केले, प्रत्येक जण दोन-तीन वेळा तरी आला असेल. यामुळे किमान १०-१२ हजार रुपये वाचले असतील. माझ्या मुलीला मासिक पाळीत पोटदुखी व्हायची. खाडा आणि दवाखाना असे मिळून १०-१५ हजार खर्च व्हायचे. पण यावेळी मी तिच्यावर घरीच उपचार केले.’’ बीड जिल्ह्यातील आम्रपाली डोंगरे यांचाही असाच अनुभव आहे- ‘‘टोळीतले लोक विहीर आणि नदीचं पाणी प्यायचे. दूषित पाण्यामुळे जुलाब झाले. ‘फ्युरा’ दिलं आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरिन वापरायला सांगितलं. ८० पेशंटच्या ताप, जुलाब, अंगदुखीवर उपचार केले. ‘पॅरा’ आणि ‘फ्युरा’ गोळ्या जास्त संपल्या. फडावर शुद्ध पाण्याची व्यवस्था होणं आवश्यक आहे.’’

गावातील आशासेविका आणि आरोग्य यंत्रणेच्या जबाबदाऱ्या ‘आरोग्य सखी’ विनामूल्य पार पाडत आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यांत हे कामगार स्थलांतरित होतात, तिथे हा प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक उसाच्या फडावर प्रशिक्षित ‘आरोग्य सखी’ नियुक्त करणे आणि तिला आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. राज्य सरकार आणि ऊसतोड कामगार महामंडळाने या प्रयोगाची दखल घेऊन तो व्यापक स्तरावर राबविल्यास, आरोग्य समस्यांचे निराकरण होऊ शकते. या प्रयोगाचा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ‘प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन प्लानिंगमध्ये’ नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून नक्कीच समावेश करता येऊ शकतो. सरकारी आरोग्यसेवांवरील विश्वास वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्यसेवा ऊसतोड कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘आरोग्य सखी’ फडावरील ‘आशा’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या उपक्रमामुळे केवळ उपचारच उपलब्ध होणार नाहीत, तर कामगारांमध्ये सरकारी आरोग्यसेवा व योजनांचा उपयोग करण्याबाबत जागृतीही निर्माण होईल.

भाऊसाहेब आहेर

सार्वजनिक आरोग्य सेवेचे अभ्यासक व आरोग्य कार्यकर्ते

bhausahebaher@gmail. com