‘माझी गाणी माझ्याबरोबर संपून जातील. तसे होऊ नये, यासाठी पूर्वजांचे संचित पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. ती मी जमेल तशी पार पाडते…’ सुक्री आजी प्रत्येक मुलाखतीत हे सांगत. आपल्या पूर्वजांचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड आता थांबली आहे. पद्माश्री सुक्री बोम्मगौडा यांचे नुकतेच वयाच्या ८८व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
एक काळ होता जेव्हा संपादन केलेले ज्ञान नोंदवून ठेवणे कठीण होते. ना कागद होते, ना लेखणी, ना लिपी. मौखिक परंपरेतूनच पुढील पिढ्यांकडे ज्ञानाचे हस्तांतर होत राहिले. पण आजच्या डिजिटल युगातही काही समुदाय असे आहेत, ज्यांच्या ज्ञानसंचिताची कुठेही नोंद नाही. कर्नाटकातीली हलक्की वोक्कलिगा ही आदिवासी जमात अशांपैकीच एक होती. या जमातीने माती, पाणी, आकाशाच्या निरीक्षणांतून सुमारे पाच शतकांत संपादित केलेले ज्ञान लोकगीतांत गुंफले. अलीकडच्या काळापर्यंत हे संचित केवळ मौखिक स्वरूपातच होते. या ज्ञानाची नोंद करण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले अशांपैकी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सुक्री बोम्मगौडा. त्यांच्याकडे हा गीत, संगीताचा वारसा सुपूर्द केला होता त्यांच्या आईने. सुक्री आजींना तब्बल हजार गाणी तोंडपाठ होती. म्हणूनच त्यांना लोकगीतांचा ‘चालता बोलता कोश’ किंवा ‘नाइटिंगेल ऑफ हलक्की’ म्हणून संबोधले जात असे. त्यांची गाणी ‘कर्नाटक जनपद अकादमी’ आणि ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या कारवार केंद्राने ध्वनिमुद्रित केली. आजही आदिम जीवन जगणाऱ्या हलक्की वोक्कलिगांच्या इतिहास आणि परंपरांचे या गाण्यांच्या माध्यामतून कायमस्वरूपी जतन झाले आहे.
सुक्री आजी केवळ लोककलाकार नव्हत्या. त्यांनी त्यांच्या जमातीपुरती समाजसुधारकाची भूमिकाही बजावली. त्या अवघ्या १६ वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. कारण होते- व्यसनाधीनता. पण सुक्री बोम्मगौडा यांनी खचून न जाता आपल्या परिसरात दारूबंदी चळवळ सुरू केली. दारू पिणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा फतवाच काढला. मद्यापानाचे दुष्परिणाम समजावून सांगणारी गीते रचली, कथा सांगितल्या. आपल्या भाषणांतूनही त्या यासंदर्भात जनजागृती करत. त्यातून त्यांच्या समाजातील व्यसनाधीनता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. सुक्री आजींना लिहिता-वाचता येत नसे, पण त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ‘मुलीचे लग्न झाले आणि नवरा दारुडा असेल, तर ती कशी जगणार? स्वत:च्या मुलांचे पोट कसे भरणर? त्यामुळे प्रत्येक मुलीने शिक्षण घेतलेच पाहिजे,’ अशी आग्रही भूमिका त्या मांडत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी त्यांच्या समाजाच्या विकासाला हातभार लावला.
सुक्री बोम्मगौडांना १९९९ साली ‘जनपद पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. २०१७ साली पद्माश्री प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली. एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावरून हात फिरविणाऱ्या दोन आदिवासी आजींचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यापैकी एक होत्या पद्माश्री तुलसी गौडा (यादेखील हलक्की वोक्कलिगा जमातीच्याच) आणि दुसऱ्या सुक्री बोम्मगौडा. ‘या पुरस्कारांचे मी काय करू, माझा समाज पुढे जाणं महत्त्वाचं आहे,’ असे म्हणणाऱ्या सुक्री आजी विविध मानसन्मानांनंतरही जुन्या, लहानशा घरात राहात. हलक्की जमातीची ओळख असलेला पोशाख आणि अनेक पदरांच्या माळा परिधान करत. त्यांच्या निधनाने पुरातन मौखिक परंपरा आजच्या डिजिटल युगाला जोडणारा दुवा निखळला आहे.