डॉ. जयदेव पंचवाघ
बराच काळपर्यंत सोसाव्या लागणाऱ्या वेदना हसत सहन करण्याची शक्ती मेंदूमधली काही रसायनं देतात..
दीर्घ मुदतीच्या किंवा प्रलंबित वेदनांच्या आजारांबद्दल मागच्या लेखात आपण चर्चा सुरू केली होती. कुठल्याही वेदनेचा अनुभव मज्जासंस्थेनं वारंवार घेतला तर मेंदूच्या संरचनेत आणि कार्यात कसा बदल होत जातो हे आपण थोडक्यात पाहिलं. या भूमीवर वारंवार होणाऱ्या वेदनेचं रूपांतर दीर्घ मुदतीच्या दुखण्याच्या ‘व्यथे’त होण्याआधीच वेदना मुळासकट दूर का करावी हे आपण पाहिलं. पण जर वेदना मुळासकट दूर करण्याचा निश्चित उपायच नसेल तर?
या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याआधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडलेल्या एका घटनेकडे आपण बघू.
वेदनेचे तीन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे चेहरा, हात, पाय किंवा शरीरावरील इतर भागांतील नसांच्या टोकांना प्रत्यक्षात दुखण्याची संवेदना होणं. उदाहरणार्थ हाताला किंवा पायाला जर सुई टोचली तर होणारी टोचल्याची वेदना. दुसरा प्रकार म्हणजे शरीरातील नसांमध्ये गडबड झाल्यानं दु:खदायक नसलेल्या संवेदनाही दु:खदायक वाटणं. यात डायबेटिक-न्यूरोपथीसारखे आजार येतात. नसांवरील आवरण झिजल्यामुळे यात कापडाचा हळुवार स्पर्शसुद्धा त्वचेची आग होण्याची किंवा सुया टोचल्याची संवेदना निर्माण करतो. याला ‘अॅलाडायनिया’ (वेदनादायक नसलेली संवेदना वेदनेप्रमाणे जाणवणं) असंही म्हणलं जातं. तिसरा प्रकार म्हणजे मेंदूतील वेदना अनुभवण्याच्या आणि त्याच्याशी निगडित विविध केंद्रांमध्ये झालेल्या रचनात्मक आणि रासायनिक बदलांमुळे जाणवणारी वेदना. यात मेंदूतील केंद्रं अतिसंवेदनशील झालेली असतात. शरीरात प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची वेदना उत्पन्न होत नसतानासुद्धा मेंदूतल्या या केंद्रांच्या स्व-उद्दीपनामुळे वेदना झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. ‘फँटम लिम्ब पेन’ या प्रकारात येतं. जो अवयव अपघातात किंवा युद्धात कापला गेलेला असतो (उदा. युद्धात उजवा पाय कापला जाणे) त्या अवयवातच वेदना झाल्याची भावना निर्माण होते.. उजव्या पायाच्या संवेदना ग्रहण करून त्याचं पृथ:करण करणाऱ्या मेंदूतील केंद्रांचं उद्दीपन झाल्यावर तो पाय प्रत्यक्षात आहे- एवढंच नव्हे तर त्यात वेदना होत आहेत- असा अनुभव व्यक्तीला येतो.
सन १९४३-४४ च्या सुमाराला, अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत हेन्री बीचर या डॉक्टरने अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नमूद करून ठेवलेलं आहे. बीचर हा इटलीमधल्या युद्धग्रस्त भागात अमेरिकन वैद्यकीय सेवेत कार्यरत होता. युद्धभूमीवरून गंभीररीत्या जखमी झालेल्या अमेरिकन सैनिकांवर उपचार करणाऱ्या विभागाचा तो प्रमुख होता. या जखमी सैनिकांपैकी बहुतेकांना बोटीनं किंवा विमानानं युद्धभूमीवरून बाहेर काढण्यात येणार होतं. बहुतेकांना मायदेशी पाठवलं जाणार होतं. युद्धभूमीवरच्या तात्पुरत्या वैद्यकीय छावणीत बीचर त्यांच्यावर उपचार करत होता. रोज अनेकदा त्यांना भेटत होता आणि उपचारादरम्यान त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारण्याची संधीही दवडत नव्हता. एकूणच या अशा भयानक परिस्थितीत सापडलेल्या सैनिकांची मन:स्थिती, त्यांच्या वेदना, गंभीर शारीरिक इजांमुळे झालेला आघात वगैरे गोष्टींच्या संशोधनात त्याला रस होता. बीचरने या काळातल्या त्याच्या अनुभवांबद्दल आणि निरीक्षणांबदल तपशीलवार लिहून ठेवलं आहे. बीचर लिहितो : या सैनिकांपैकी बहुतेकांना इतक्या खोलवरच्या आणि मोठय़ा जखमा झालेल्या होत्या की त्या वेदनांनी ते खरं तर कळवळायला हवे होते. वेदनांनी टाहो फोडल्यामुळे त्या वैद्यकीय छावणीला नरकासमान स्वरूप यायला हवं होतं.
पण प्रत्यक्षात अगदी उलटी परिस्थिती होती. थट्टा-मस्करी, थोडंफार संगीत, हसणं, वाइन असं एखाद्या पार्टीसारखं स्वरूप कधीकधी दिसत होतं.
आश्चर्य म्हणजे यापैकी फार कमी सैनिकांनी आपल्याला वेदना होत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे किंवा नर्सेसकडे केली. मात्र त्यांना इंजेक्शन देण्यासाठी नर्स सििरज घेऊन गेल्यावर मात्र कित्येक जण घाबरून ‘हळू इंजेक्शन द्या’ असं सांगायचे. मूळ मोठय़ा गंभीर जखमांच्या वेदनेचा फार बाऊ नव्हता!
या विरोधाभासी निरीक्षणामुळे डॉक्टर हेन्री बीचर पूर्णत: गोंधळून गेला. गुडघे-खांदे यांचे सांधे फुटलेले, हाडं निखळलेली, त्यावर मोठय़ा आकाराच्या जखमा होऊन त्वचा वेडीवाकडी फाटलेली, बॉम्ब पडून त्यातून निघालेले अणकुचीदार लोखंडी तुकडे शरीरात खोलवर रुतलेले. कुणाचा हात तर कुणाचा पाय तुटलेला. ज्या इजांमुळे खरं तर मरणप्राय वेदना व्हाव्यात त्या तुलनेने फारच कमी त्रासदायक ठरत होत्या. या निरीक्षणामुळे गोंधळलेल्या बीचरनं यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला.
आता, वेदनादायक जखमांपासून मेंदूपर्यंत वेदनेच्या संवेदना अर्थातच पोहोचत होत्या कारण जखमांच्या प्रत्यक्ष भागातल्या संवेदना शाबूत होत्या. याचा अर्थ त्या वेदनेचा मेंदूमध्ये अर्थ लावून तिला योग्य भावनिक व शारीरिक प्रतिक्रिया देण्याचा जो भाग असतो तिथे काही तरी वेगळं घडत होतं. बीचरने या सैनिकांशी अधिक खोल संवाद साधला. त्याच्या असं लक्षात आलं की या जखमांकडे ते अक्षरश: एक वरदान म्हणून बघत आहेत. जखमी रुग्णांना अर्थातच युद्धभूमीवरून बाहेर काढलं जातं आणि ते परत लढण्यासाठी जाऊही शकत नाहीत. याचाच अर्थ या गंभीर जखमांमुळे आता ते परत मायदेशी जाणार होते. आपापल्या कुटुंबीयांना किंवा आप्तजनांना परत भेटणार होते! युद्ध सुरू झाल्यावर, अनेक वर्ष, महिने आपण लगेच मायदेशी परत जाऊ अशी कल्पनासुद्धा त्यांनी केली नव्हती. किंबहुना आपण बहुतेक या युद्धातच संपणार याची खात्रीच व्हावी असं भयानक वातावरण आजूबाजूला होतं. त्या भूमीवर या जखमा म्हणजे खरोखरच वरदान होतं आणि म्हणूनच जखमांच्या वेदनासुद्धा अगदी अत्यल्प वाटाव्या अशा दिसत होत्या. म्हणजेच वेदना होण्याच्या प्रक्रियेमध्ये ही जी शेवटची पायरी आहे, जिच्यामध्ये मेंदूत त्या वेदनेच पृथक्करण करून प्रतिक्रिया दिली जाते, ती वेदनेचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकू शकते हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं हे अनुभव संख्याशास्त्राच्या आधारावर लिहून ठेवले आहेत.
हा वेदना निवारणशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा शोध होता. वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जर मुद्दाम सकारात्मक करता आला तर वेदनेची तीव्रता कमी करता येईल असा त्याचा अर्थ होता. या अनुभवाच्या आधारावर बीचरने पुढच्या काळामध्ये ‘प्लासिबो’ औषधांवर काम केलं. एखाद्या औषधाने दुखणं थांबेल आणि आपण बरे होऊ असा प्रामाणिक विश्वास रुग्णामध्ये निर्माण केला गेला तर औषध म्हणून साखरेची गोळी किंवा पिठाची गोळी करून दिली तरी ती बऱ्याच रुग्णांमध्ये वेदनानिवारणाचं कार्य करू शकते, हा त्याचा अर्थ.
गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचा दृढ विश्वास प्रत्यक्षात येण्यासाठी मेंदूकडून कोणत्या प्रकारची चेताउद्दीपक रसायनं तयार केली जातात आणि नेमक्या कुठल्या ठिकाणी ती पाझरतात यावर भरपूर संशोधन झालं आहे.. आणि अजूनही होत आहे. मेंदूची स्वत:ची अशी वेदना निवारणाची एक क्षमता असते. वेदनेची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यामध्येच बोथट करण्यासाठी मेंदूकडून काही संदेश उलटय़ा दिशेनं म्हणजेच शरीराच्या दिशेनं पाठवले जातात. हे संदेश चेतापेशींमध्ये तयार होणाऱ्या चेताउद्दीपक रसायनांमार्फत कार्य करतात. ही रसायनं म्हणजे शरीराची स्वत:ची अशी वेदनानाशक औषधंच असतात असं म्हणायला हरकत नाही.
प्रलंबित काळच्या वेदनांच्या व्यथेमध्ये ही रसायनं अत्यंत उपयुक्त कार्य करू शकतात; मात्र त्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी उपयुक्त ठरतात हे माहीत असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे अत्यंत सकारात्मक मन:स्थिती असली तर वेदनेची तीव्रता बोथट होते हा सर्वसामान्य अनुभव आहे, पण अशी सकारात्मक स्थिती कृत्रिमरीत्या कशी तयार करणार? एखाद्याला फक्त शाब्दिक उपदेश देऊन ते करता येणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी स्वसंमोहनासारख्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो हे आता समजलं आहे. प्रलंबित वेदनेच्या व्यथेनं त्रासलेल्या व्यक्तींच्या आजूबाजूला मित्र व नातेवाईकांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली तरीसुद्धा यात मदत होऊ शकते. याच कारणासाठी काही अँटिडिप्रेसंट औषधांचा वेदना निवारणात अप्रत्यक्ष उपयोग होऊ शकतो. आयुष्यामध्ये विशिष्ट ध्येय आणि अर्थ निर्माण करून त्या दिशेनं मानसिक ऊर्जा कार्यान्वित केली तर वेदना निवारणाच्या प्रक्रियेत अनमोल मदत होते.
दुसरी सिद्ध झालेली गोष्ट म्हणजे शारीरिक व्यायाम आणि या रसायनांचा संबंध. आपल्याला सायकोसोमॅटिक किंवा मनो-शारीरिक परिणाम होतात हे माहीत आहे; पण शरीराच्या हालचालींचे आणि व्यायामाचे मेंदूवर चांगले परिणाम होतात, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. विशेषत: उत्साहाच्या वातावरणात आणि अगदी घाम येईपर्यंत केलेल्या व्यायामानं मेंदूमधली वेदना निवारक रसायन अधिक प्रमाणात स्रवली जातात हे वारंवार सिद्ध झालं आहे. योगासनांचा अशा वेदनांच्या व्यथेवरचा सकारात्मक परिणामसुद्धा वादातीत आहे.
मेंदूमधली अशी वेदना निवारक केंद्रं उद्दीपित करण्यासाठी स्टिम्युलेशन (डीप ब्रेन स्टिम्युलेशन – डीबीएस)चा सुद्धा उपयोग आता करता येऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रलंबित वेदनेच्या व्यथेमध्ये (क्रॉनिक पेन) इतर औषधांबरोबर या गोष्टी नीट समजून त्यांचा उपयोग केला तर खूपच फायदा होतो आणि पूर्णत: बऱ्या न होऊ शकणाऱ्या वेदना सुसह्य होतात हे लक्षात ठेवणं उपयुक्त ठरेल.
जाता जाता असं म्हणावंसं वाटतं की, डॉ. बीचर यानं जी निरीक्षणं भयंकर युद्धाच्या मध्यात नोंदवून ठेवली त्याला खरोखरच तोड नाही!
लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.
brainandspinesurgery60@gmail.com