डॉ. जयदेव पंचवाघ
अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होणं हा योगायोग नसून विशारदाचं कौशल्य, प्रगत उपकरणं असे योग त्यासाठी जुळावे लागतात!
आज एका वेगळय़ा विषयावर लिहिणार आहे. कुठल्याही शस्त्रक्रियेत कौशल्य आणि नैपुण्य हे विशेष जोपासणारी केंद्रं का महत्त्वाची असतात हा तो विषय. मी स्वत: इंटर्नशिप करताना मेंदूच्या आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया सर्वप्रथम असिस्ट केल्या. म्हणजे त्याला आता तीस वर्ष झाली. निदान तेव्हापासून या क्षेत्रात होणारे आश्चर्यकारक बदल आणि प्रगती मी बघत आलो आहे आणि माझ्या सौभाग्याने त्यांचा थोडय़ा प्रमाणात भागसुद्धा आहे. खरं तर एखाद्या विषयाच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना- मग त्या चांगल्या-वाईट काहीही असोत- नीट वाचल्या, आठवल्या तर तुम्हाला वर्तमानाच्या संदर्भातसुद्धा मार्गदर्शक ठरतात. एखादा डॉक्टर घेत असलेले वैद्यकीय निर्णय या अनेक वर्षांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागावर अवलंबून असतात.
गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय व्यवसायात काही नवीन गोष्टी घडताना मी बघतो आहे. उदाहरणार्थ अशा काही कंपन्या निघालेल्या आहेत, ज्या रुग्णांना विचारतात तुम्हाला अमुकतमुक आजार आहे? आमच्याकडे नोंदणी करा. तुमच्या जवळच्या रुग्णालयात त्या प्रकारच्या आमच्या यादीतल्या डॉक्टरांपैकी एकाला आम्ही पाठवू आणि तुमची शस्त्रक्रिया करून देऊ. यावर कडी म्हणने या कंपन्यांचे संचालक डॉक्टर असतातच असं नाही, किंबहुना नसतात. न्युरोसर्जरीसारख्या विषयांमध्ये असे प्रकार घडत नसले तरी साध्या साध्या शस्त्रक्रियांसाठी हे सुरू आहेत असं माझ्या मित्रानं मला सांगितलं.
म्हणजे एखादी दुचाकी गॅरेजमध्ये नेऊन दुरुस्त करून घेतल्यासारखं! खरं तर आपली साधी दुचाकीसुद्धा दुरुस्त करून घेण्याआधी आपण त्या गॅरेजचा नावलौकिक आणि मेकॅनिकचं नैपुण्य कसं आहे याचा शोध घेतो. आपल्याकडे असलेल्या विशिष्ट बनावटीच्या दुचाकीची दुरुस्ती करण्यामध्ये त्याचं विशेष नैपुण्य आहे का हेसुद्धा बघतो. असं असताना आपल्या शरीराला झालेल्या आजारासाठी छोटय़ा असल्या तरी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रुग्ण एखाद्या कंपनीकडे जाऊन माहीत नसलेल्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया करून घेतात हे ऐकून मला विस्मय वाटला. वैद्यकशास्त्राच्या इतिहासात प्रथमच असं काही तरी घडताना मी पाहिलं. असो. मूळ विषय हा एखाद्या शस्त्रक्रियेचं उत्कृष्ट आणि विशेष नैपुण्य असलेलं केंद्र म्हणजे काय आणि अशी केंद्रं प्रगत समाजात कशासाठी तयार केली जातात हे समजून घेणं हा आहे.
सर्वसाधारणपणे अशा केंद्रांना ‘टर्शरी सेंटर’ म्हणतात. मेंदू व मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचं शास्त्र- म्हणजेच न्युरोसर्जरीच्या संदर्भात मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच हा फक्त न्युरोसर्जरीपुरता सीमित नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं.
मेंदू, मज्जारज्जू आणि मणका यांच्या शस्त्रक्रिया या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असतात. न्युरोसर्जरीमधल्या अधिक अवघड शस्त्रक्रियांमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी व्यक्तीला अनेक वर्ष घालवावी लागतात. गेल्या काही वर्षांमध्ये या शस्त्रक्रिया अधिक सुलभ, निर्धोक आणि यशस्वी होण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, उपकरणं आणि यंत्रसामग्री यांमध्ये झपाटय़ानं सुधारणा होत गेल्या आहेत. संगणक आणि नवनवीन सॉफ्टवेअर्स या शस्त्रक्रिया अचूक करत आहेत. या देदीप्यमान सुधारणांचा दुसरा भाग म्हणजे हे तंत्रज्ञान प्रगत कंपन्यांकडून विकत घ्यावं लागतं. मेंदूच्या एखाद्या अवघड शस्त्रक्रियेसाठी समजा पाच प्रकारची प्रगत उपकरणं लागत असतील तर त्यासाठी ती खर्च करून दुसऱ्या देशांतून आयात करावी लागतात. म्हणजेच शस्त्रक्रियेसाठी लागणारं व्यक्तिगत नैपुण्य, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि संवेदनशील सर्जन असेल तर शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढेल हे ओघानं आलं.
या सर्व गोष्टी पन्नास ठिकाणी उपलब्ध करायचं म्हणाल तर ते अशक्य. म्हणूनच पाश्चात्त्य जगात विशेष नैपुण्य असलेल्या शस्त्रक्रिया केंद्रांची कल्पना जन्माला आली. अशा केंद्रामध्ये एकाच विषयाच्या, विशेषत: क्लिष्ट, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वारंवार केल्या जातात. उदाहरणार्थ मेंदूतल्या गाठींवर शस्त्रक्रिया करण्याचं केंद्र. अशा केंद्रात मेंदूतल्या विविध ठिकाणी झालेल्या गाठींवर विशेष कौशल्यानं शस्त्रक्रिया होतात. या शस्त्रक्रियांमध्ये विशेष रस असलेले डॉक्टर्स तिथे काम करतात. या शस्त्रक्रिया निर्धोक व सुलभ होण्यासाठी लागणारी विविध प्रकारची प्रगत यंत्रं तिथे म्हणजे एकाच ठिकाणी उपलब्ध असतात. एवढंच नाही, तर अशाच प्रकारच्या अनेक शस्त्रक्रिया रोज होत असल्यामुळे तंत्रज्ञानाविषयी लागणारं संशोधनसुद्धा अशा केंद्रांमधूनच पुढे येऊन जगात पसरतं. वैद्यकीय संशोधनाबद्दल तर वेगळं बोलायची गरजच नाही, कारण विविध प्रकारच्या गाठींवर शस्त्रक्रिया होत असल्यामुळे त्यांची लक्षणं, उपचार, उपचारांचे अधिक प्रगत मार्ग.. यांवर रोजच नवनवीन संशोधन अशा ठिकाणी होऊ शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रगत तंत्रज्ञान आणि मानवी नैपुण्य हे अशा प्रकारच्या अनेक रुग्णांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा खर्चसुद्धा अनेक रुग्णांमध्ये विभागला जातो आणि अगदी नवीनच आलेलं आणि ‘परवडणार नाही’ असं वाटणारं तंत्रज्ञानसुद्धा अशा ठिकाणी सहज उपलब्ध करता येतं.
शस्त्रक्रियेतलं नैपुण्य आणि शस्त्रक्रियेतून साधले जाणारे उत्कृष्ट दर्जाचे ‘रिझल्ट’ यांवर अनेक वर्ष वेगवेगळय़ा देशांत संशोधन झालेलं आहे. या संशोधनांतून असं स्पष्टपणे दिसून आलं की एखादा सर्जन किंवा एखादी सर्जिकल टीम विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेत मनापासून रस घेऊन आणि स्वत:ला झोकून देऊन काम करत असतील तर शस्त्रक्रियेचे परिणाम अनेक पटींनी सुधारतात. आता एखाद्याला प्रश्न पडेल, यात आश्चर्य ते कोणतं? पण कुठलंही विधान करण्याआधी त्याला संख्याशास्त्राचं पाठबळ आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं म्हणून हे विशेष नमूद केलं.
हे सांगण्यामागचं कारण असं की, एक रुग्ण म्हणून समाज प्रगल्भ व्हायचा असेल तर हा विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे समजणं फक्त समाजकारणासाठी नाही तर स्वत:च्या तब्येतीविषयी निर्णय घेताना अत्यंत महत्त्वाचं असतं. गेली तीस वर्ष वेगवेगळय़ा रुग्णांना भेटल्यानंतर हे आवर्जून सांगण्याची गरज आहे असं वाटण्याइतकी ही समज विरळा असते.
मेंदूतल्या गाठींसारख्या अवघड आजाराचं निदान झाल्यावर रुग्णांनी आणि नातेवाईकांनी काय विचार करायला हवा? आपल्या गावाजवळ किंवा घराजवळ असलेल्या रुग्णालयात जाणं महत्त्वाचं की अशा प्रकारच्या गाठींच्या शस्त्रक्रियेचा विशेष अनुभव आणि नैपुण्य असलेल्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं? हा विचार स्वत:च्या मेंदूच्या आरोग्याशी संबंधित आहे याची किमान जाणीव तरी निर्णय घेताना ठेवणं गरजेचं आहे.
अमेरिकेतील फिनिक्स या ठिकाणी अक्षरश: काहीही नसलेल्या भागात रॉबर्ट स्पेट्झलर या न्युरोसर्जननं फक्त न्यूरोसर्जरी विषयाचं केंद्र १९८०च्या दशकात काढलं. ‘अॅरिझोनासारख्या वाळवंटी भागात जाऊन तुझ्या हातातलं कौशल्य आणि विषयातलं नैपुण्य वाया घालवशील,’ असं त्याला अनेकांनी सांगितलं, त्याच्या हितचिंतकांचा आणि शिक्षकांचाही त्यात समावेश होता. न्युरोसर्जरीसारख्या विषयाचं असं वेगळं केंद्र बाकीच्या शाखा नसताना कसं चालू शकेल अशा प्रकारच्या शंकासुद्धा उपस्थित केल्या. पण विशिष्ट ध्येयानं भारावलेल्या व्यक्तीला कोणीही थांबवू शकत नाही. पुढच्या काही वर्षांत रॉबर्ट स्पेट्झलरनं फिनिक्समध्ये न्युरोसर्जरीचं असं केंद्र काढलं की अमेरिकेतील विविध भागांमधून मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण तिथं जाऊ लागले. फक्त अमेरिकेतूनच नाही तर युरोप, एशिया आणि जगातल्या इतर भागांतून विशिष्ट प्रकारच्या मेंदूच्या आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्ण तिकडे जाऊ लागले.
याचा परिणाम त्या काळात असा झाला, की या शस्त्रक्रियांसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री करणाऱ्या कंपन्यांनी तिथे त्यांची संशोधन केंद्रं उभारली. आजच्या काळात आम्ही न्युरोसर्जरीत जे प्रगत मायक्रोस्कोप, नेव्हिगेशन मशीन्स आणि इतर उपकरणं वापरतो ती अशा केंद्रांमध्ये झालेल्या संशोधनाच्या आधारावर उभी असतात. फिनिक्समध्ये या क्षेत्रात त्या काळात उत्कृष्टतेचा ध्यास घेतल्यामुळे तिथून शिकून बाहेर पडलेले अनेक न्युरोसर्जन आज अमेरिकेतल्या अनेक न्युरोसर्जरी विभागांचे प्रमुख आहेत.
विशिष्ट नैपुण्य आणि कौशल्य निर्माण करण्याच्याच उद्देशानं सुरू केलेल्या ट्रायजेमिनल न्युराल्जिया व हेमिफेशिअल स्पाझमच्या केंद्राविषयीचे माझे अनुभव मागच्या काही लेखांमध्ये मी लिहिले आहेत. हा विषय मुद्दाम मांडावासा वाटला याचं कारण लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या कंपन्यांविषयी मी ऐकलेली माहिती. हा विषय फक्त न्युरोसर्जरीपुरता मर्यादित नाही हे पुन्हा नमूद करतो.
आपल्या शरीरावर शस्त्रक्रिया होणार असेल तर ती उत्कृष्ट ठिकाणी आणि त्या शस्त्रक्रियेत विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तीकडून करून घ्यावी, हे सांगण्याची वेळ आली आहे की काय असं वाटण्यासारखी ती बातमी होती म्हणून या लेखाचा उपद्वय़ाप!
लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.
brainandspinesurgery60@gmail.com