प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाही हा विषय आजही कसा काय चर्चेत असतो हेच आश्चर्य. कारण देशातील जवळपास सर्वच प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीतूनच नेतृत्व पुढे केले जाते. तमिळनाडूत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपले पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. ‘उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड ही मला मदत करण्यासाठी नव्हे तर तमिळनाडूच्या लोकांच्या मदतीसाठी’ केल्याचा दावा मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला. या राज्यातील द्रविड पक्षांची परंपरा वारस नेमण्याची आहेच. ‘द्रविडार कळघम’तर्फे १९४०च्या दशकात पेरियार रामस्वामी यांनी स्वतंत्र तमिळ राज्यासाठी चळवळ सुरू केली, तेव्हापासूनची. ७० वर्षीय पेरियार यांनी एका ३२ वर्षीय मुलीशी विवाह केल्यावर तिला आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केल्याने अण्णादुराई यांनी ‘द्रमुक’ची वेगळी चूल मांडली. पुढे अण्णादुराईंच्या निधनानंतर करुणानिधी यांच्याकडे सूत्रे आली. करुणानिधी व एम. जी. रामचंद्रन यांच्या वितुष्ट निर्माण झाल्यावर एमजीआर यांनी अण्णामलाईंचे नाव वापरून ‘अण्णा द्रमुुक’ची स्थापना केली. एमजीआर यांनी त्यांची निकटवर्तीय जयललिता यांचे नेतृत्व पुढे आणले.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : कुठे चाललो आहोत आपण?

करुणानिधी मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली. तोच कित्ता आता स्टॅलिन यांनी गिरवला आहे. पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल यांनी मुख्यमंत्रीपदी असताना आपले पुत्र सुखबीरसिंग यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली होती. करुणानिधी किंवा बादल यांची पिता-पुत्राची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची जोडी झाली. पण अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये नेत्यांची मुलेच पक्षात दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी पार पाडतात. यात भाजपचे मित्रपक्षही आहेतच. तेलुगू देशमचे नेते, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाची खाती पुत्र नारा लोकेश यांना दिली आहेत. सुपरस्टार पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री असले तरी चंद्राबाबूंनंतर लोकेशच सरकारमध्ये अधिक महत्त्वाचे मानले जातात. एन.टी रामराव यांनी स्थापन केलेल्या तेलुगू देशमलाही घराणेशाहीची किनार आहेच. चंद्राबाबू यांनी सासऱ्यांच्या विरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्रीपद मिळविले. तेलुगू देशममधून बाहेर पडलेली रामराव यांची कन्या पुरंदेश्वरी या सध्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. तेलंगणात के सी. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सत्तेत असताना त्यांचे पुत्र के. टी. रामाराव हे जणू काही अप्रत्यक्ष (डी फॅक्टो) मुख्यमंत्री होते. कर्नाटकात देवेदौडा यांनी घराणेशाहीस कितीही नाके मुरडली तरी कुमारस्वामी यांच्याकडे सारी सूत्रे सोपविली. दुसरे पुत्र रेवण्णा, जावई, नातवंडे साऱ्यांनाच खासदारकी-आमदारकी दिली.

सध्या निवडणूक होत असलेल्या हरियाणात दिवंगत माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या कुटुंबातील आठ जण; तर भजनलाल आणि बन्सीलाल या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबांतील पाच जण रिंगणात आहेत. जम्मू-काश्मिरात तिसऱ्या पिढीतील ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हे रिंगणात आहेत. अखिलेश यादव, चिराग पासवान, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन हे पक्ष-संस्थापकाचे पुत्र आज पक्ष सांभाळताहेत, तर मायावतींचा भाचा आकाश आनंद, ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जी आत्यांच्या पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.

हेही वाचा >>> संविधानभान : पंचायत राज व्यवस्थेची स्थापना

काँग्रेस म्हणजे घराणेशाही असे ठसवू पाहणाऱ्या भाजपमध्येही येडियुरप्पांचा पुत्र प्रदेशाध्यक्षपदी; हरियाणात राव इंद्रजित सिंह या केंद्रीय मंत्र्यांची कन्या उमेदवार; राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज हे आमदार तर दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या खासदार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पीयूष गोयल हेदेखील राजकारणातल्या दुसऱ्या पिढीचे; महाराष्ट्रातून आमदार/खासदारपदी संतोष दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन… अशी उदाहरणे आहेतच. पण शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, अजित पवार आणि आता सुनेत्रा पवार, अमित ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले जाते. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या आपल्या जावयाला दिलेले मंत्रीपद, ही ‘डावी’ घराणेशाही! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हेच पार पाडतात.

‘आमदार/ खासदार होणे निराळे आणि थेट प्रमुखपदी येणे निराळे’ अशी कुरकुर होत राहाते; पण ‘घराणेशाही’ ही सर्वपक्षीय असते. घराणेशाहीचा आरोप होवो वा न होवो- पुढली पिढी राजकारणात टिकते किती आणि कशी, हे सर्वस्वी कर्तृत्व आणि चातुर्यावरच अवलंबून आहे, हे उमगेल तेव्हाच ‘घराणेशाही’विरोधी प्रचार कालबाह्य ठरेल!