तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या पुत्राचा मंत्रिमंडळात समावेश करून द्रमुकमधील घराणेशाहीची परंपरा कायम ठेवली. घराणेशाही जणू काही भारतीय राजकारणाचा अविभाज्य भागच झालेला आहे. नेतेमंडळी आपली पत्नी, मुले, मुली, जावई, सुना आदींनाच सत्तेत किंवा पक्षाच्या पदांमध्ये प्राधान्य देतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये हा कल अधिकच अनुभवास येतो. देवेगौडा, करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन, करुणाकन, एन. टी. रामाराव, चंद्राबाबू नायडू, वाय. एस. राजशेखर रेड्डी, जी. के. मूपनार, एस. आर. बोम्मई, के. चंद्रशेखर राव, पिनयारी विजयन आदी डावे, उजवे, समाजवादी कोणीच या गोष्टीला अपवाद नाहीत. डावे पक्ष नेहमी घराणेशाहीला नाके मुरडतात, पण केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांनी विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलेल्या आपल्या जावयाचा मंत्रिमंडळात समावेश केला. तेलंगणात के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री तर त्यांचे पुत्र रामाराव हे मंत्री आहेत. याशिवाय त्यांची कन्या आमदार आहेच. शेजारील तमिळनाडूत स्टॅलिन मुख्यमंत्री तर आता त्यांचे पुत्र उदयनिधी यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. स्टॅलिन यांच्या सावत्र भगिनी कानीमोझी खासदार आहेतच. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर त्यांचे पुत्र आदित्य हे मंत्रिमंडळात होते.
घराणेशाहीला कोणताच राजकीय पक्ष अपवाद नसला तरी प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही अधिक प्रभावीपणे जाणवते. शरद पवारांपासून (राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष असला तरी पाळेमुळे राज्यातच) बाळासाहेब ठाकरे, प्रकाशसिंग बादल, डॉ. फारुख अब्दुल्ला, मुलायमसिंग यादव, करुणानिधी, बिजू पटनायक, मुफ्ती मोहंमद सईद, एन. टी. रामाराव आदी बहुतांश प्रादेशिक नेत्यांनी आपला राजकीय वारस म्हणून घरातीलच कोणाला तरी संधी दिली. या साऱ्या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी आपले वडील करुणानिधी यांची परंपरा पुढे कायम ठेवली. स्टॅलिन किमान चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आल्यावर मग त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. याउलट स्टॅलिन पुत्र पहिल्यांदाच निवडून येताच त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपल्या घरातील कोणाला सत्तेत वाटा देणार नाही, असे आश्वासन स्टॅलिन यांनी दिले होते. या आश्वासनाची आठवण आता अण्णा द्रमुक व भाजपने त्यांना मुलाच्या शपथविधीनंतर करून दिली आहे. मे २०२१ मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून दीड वर्ष तरी त्यांनी आपल्या मुलाचा मंत्रिमंडळातील समावेश टाळला होता. ४५ वर्षीय उदयनिधी तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता आहेत. चित्रपट क्षेत्रात अधिक व्यस्त असल्यानेच त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश लांबणीवर पडला होता, असे म्हटले जाते.
उदयनिधी द्रमुकच्या युवा संघटनेचे सरचिटणीस आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. उगवता सूर्य म्हणजे इंग्रजीत ‘रायिझग सन’ हे द्रमुकचे निवडणूक चिन्ह आहे. उदयनिधी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे ते सार्थ झाल्याची टीका केली जात आहे. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यापेक्षा त्यांचे मंत्रिपुत्र रामाराव अधिक वजनदार मानले जातात. तमिळनाडूतही स्टॅलिन पुत्राचे दुसरे सत्ताकेंद्र निर्माण होण्याची शक्यता अधिक. स्टॅलिन यांना या पद्धतीने आपल्या पक्षचिन्हाला ‘न्याय’ द्यायचा असला तरी हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण कसे मानणार?