प्रिय पप्पा, तुम्ही माझ्या बँकॉक ट्रीपचा बोजवारा उडवला व यावरून माझी सर्वत्र बदनामी झाल्याने मी कमालीचा नाराज आहे. मित्रवर्तुळात सर्वत्र माझी ‘छी थू’ होतेय. तुम्हाला हा ‘ड्रामा’ उभा करण्याची काहीच गरज नव्हती. तुम्ही नाही म्हटल्यावरसुद्धा बँकॉकला निघालो म्हणजे मसाजट्रीपलाच असे तुम्हाला वाटलेच कसे? गेल्या अनेक वर्षांपासून मी आपल्या शिक्षण संस्थांचा व्याप सांभाळतोय. त्याचा परदेशात विस्तार करावा, थायलंडमध्ये एखादा फॅशन डिझाइनचा कोर्स सुरू करावा या ‘उदात्त’ हेतूने हा दौरा घाईगडबडीत आखला. तो यासाठी की समोरची विमान कंपनी भाड्याचे काही लाख रुपये रोख घ्यायला तयार झाली. घरात असलेल्या रोख रकमेचे काय करायचे असा प्रश्न नेहमीच आपल्यासमोर असतो. यानिमित्ताने तेवढीच ती वापरात येईल असे वाटले म्हणून मी घाई केली.
तुमचा ‘चोख’ व्यवहारवाद, संस्था असो वा मंत्रीपद ‘योग्य’ मोबदल्याशिवाय काहीच करायचे नाही या धोरणामुळे आपण भरपूर पैसा कमावला. इतका की तो ठेवायचा कुठे असा प्रश्न सतत सतावतो. अंघोळीला गेल्यावर टॉवेलसाठी कपाट उघडले तरी पैसा, पांघरण्यासाठी रजई काढली तरी त्यातून पैसा, कपडे घ्यायला गेले तरी पैसा, रॅकमधून चपलांचे जोड काढायला गेले तरी त्यातून पैसा बाहेर पडत असतो. सॉरी पप्पा पण, इतक्या पैशाचे करायचे काय? मग थोडा खर्च केला तर इतके आकांडतांडव करायची गरजच काय? मी तर ‘साधे’ विमान भाड्याने घेतले, विकत थोडीच घेणार होतो? तरीही तुम्ही आकाशपाताळ एक करून सारी यंत्रणा कामाला लावली. बायकोचा वाढदिवस असताना कशाला जातो असे तुम्ही म्हणालात. अहो पण तो दरवर्षीच येतो. संस्थेच्या हितासाठी एखादी गोष्ट मनावर घेतली व ती पूर्ण झाली नाही की मला अनेक दिवस झोप येत नाही. तो असह्य होणारा त्रास टळावा यासाठी मी हे पाऊल उचलले. त्याच्या आठ दिवस आधी ४७ लाख खर्चून मी दुबईला गेलो ते संस्थेसाठीच. केवळ पुणे, सोलापूर व परभणीत संस्थाविस्तार म्हणजे डबक्यात गटांगळ्या खाण्यासारखे. संस्थेला ‘ग्लोबल’ करायला मी झटतोय हे तुमच्या लक्षात कसे येत नाही? तुम्ही नेहमी म्हणता, जितका जास्त खर्च करू तेवढा अधिकचा पैसा मिळेल. मग करू द्या ना मला खर्च. कशाला आडकाठी आणता? तुम्ही निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला पण मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे दुहेरीची आवक एकेरीवर आली. या स्थितीत मी विस्ताराचा विचार केला तर त्यात चूक काय?
संस्थेचा व्याप सांभाळताना व नोटांच्या बॅग्जची ने-आण करताना मीही थकतो. या पार्श्वभूमीवर परदेशवारी म्हणजे थोडाफार विरंगुळा. तेवढा अधिकार मला नाही का? तुम्हाला तर गुवाहाटीला जायला मिळते. आमच्या नशिबात तेही नाही. पप्पा, पैशाने पैसा वाढतो हे तत्त्व मी स्वीकारले. तुमचा भर तो ‘डंप’ करण्यावर. ही जुनाट वृत्ती सोडा आता. या कृतीतून तुम्ही माझीच नाही तर संस्थेचीही बदनामी केली. आपल्याकडे प्रचंड पैसा आहे हे अधिकृतपणे जगजाहीर झाले. आता कर्मचारी वेतनवाढ मागतील. या नाट्यात तुम्हाला ज्यांनी मदत केली तेही कधी ना कधी उपकाराची परतफेड मागतील. कायम पैशाच्या मागावर असलेल्या तपासयंत्रणा सटरफटर नोटिसा काढून तुमच्याकडून वसुली करतील. हे धोके तुमच्या लक्षात कसे आले नाहीत? तुम्हाला एकच सांगतो. भविष्यात मला असा त्रास पुन्हा देऊ नका. नाही तर तुमचा ‘कच्चाचिठ्ठा’ जनतेसमोर उघड करीन. ज्याचे वळते (विमान) त्यालाच कळते हे लक्षात असू द्या.