सोव्हिएत रशियाचे १९२८ ते १९५३ असे २५ वर्षे राष्ट्राध्यक्षपद भूषविणाऱ्या स्टॅलिनचे ६ मार्च, १९५३ रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने स्टॅलिनच्या कार्य आणि योगदानाचा आलेख चित्रित करणारा श्रद्धांजलीपर लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या मे, १९५३ च्या अंकात लिहिला होता. या लेखाचा पूर्वार्ध स्टॅलिनच्या क्रांतिकारी कार्याचे गौरवीकरण करतो, तर उत्तरार्ध या कार्याची समीक्षा करणारा आहे. तर्कतीर्थ एकाच लेखात परस्परविरोधी मते व्यक्त करतात, असे सहसा दिसून येत नाही. हा लेख त्यास अपवाद होय.
पूर्वार्धात तर्कतीर्थ कार्ल जॅस्पर्स या जर्मन-स्वीस मानसोपचारतज्ज्ञ व धर्मशास्त्र तत्त्वज्ञ असलेल्या विचारवंतांचे उद्धरण उद्धृत करून आपले विवेचन सुरू करतात. त्यानुसार, ‘मानवी आंदोलनास जेव्हा उच्चतम उद्रेकाचे स्वरूप प्राप्त होते, बहुतेक तेव्हाच सत्याचा गंभीर आविष्कार होतो.’ रशियाच्या उद्रेकातून निर्माण झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जोसेफ स्टॅलिन (१८७९ – १९५३). असे तर्कतीर्थांना येथे सुचवायचे आहे. ‘कम्युनिझमने उत्पन्न केलेल्या प्रश्नांचा निकाल लावणे, हेच विद्यामान विश्वव्यापी मानवतावादी आंदोलनाचे उद्दिष्ट आहे,’ हे तर्कतीर्थांचे
विधान रशियात झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीसंदर्भात आहे, ज्याच्या यशाचे श्रेय इतिहास लेनिन आणि स्टॅलिनला देत आला आहे. माणसावरील आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक सत्ता नष्ट कशी करता येईल व समतेचे आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे जीवन माणसास कसे निर्माण करता येईल, या ध्येयातून खरे तर रशियन कम्युनिस्ट क्रांती जन्माला आली. तिचा कारागीर स्टॅलिन होता, हे या लेखाचे सूत्र होय. स्टॅलिनचे जीवन क्रांतिकारकाचे होते. १९०२ ते १९१७ पर्यंत सतत १५ वर्षे भडकलेल्या आगीत झारच्या प्रचंड सत्तेशी लढा देत तो उभा होता. अद्भुतरम्य साहसाने भरलेल्या रोमांचकारी लढ्याचा इतिहास असेच स्टॅलिनच्या चरित्राचे स्वरूप या लेखात वर्णिले आहे. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर रशियात अनागोंदी निर्माण होईल, अशी शंका असताना प्रत्यक्षात रशियात असे काही घडले नाही, याचे श्रेय स्टॅलिनने आपल्या हयातीत निर्माण केलेल्या यंत्रणेस द्यावे लागेल.
स्टॅलिन ही या शतकाची (विसाव्या) अद्वितीय राजकीय विभूती होय, असे गौरवीकरण लेखात तर्कतीर्थांनी केले आहे. त्याने रशियात आपले विरोधक रॅडिक, सिनॉचिव्ह, बुखारिन, कॅमेनेव्ह, क्रॉसिन, रॅकोवस्की, स्ट्रॉटस्की प्रभृतींचे शिरकांड केले. हे अर्थातच हुकूमशाहीचे कृत्य होते. त्याचे समर्थन करत तर्कतीर्थ लेखात म्हणतात की, ‘हुकूमशाही कठोर नसावी हे म्हणणे म्हणजे तलवारीला धार नसावी असे म्हणण्याइतके अनुचित आहे. क्रांतिकारकांना बळी देणे हे क्रांतीचे ऐतिहासिक कार्य आहे. ‘क्रांती ही पुत्रभक्षक माता आहे,’ ही म्हण ध्यानात ठेवली पाहिजे. स्टॅलिनला कर्तव्य पार पाडणे अपरिहार्य होते. ‘भगवद्गीते’चा आदेश प्रमाण मानणाऱ्या स्टॅलिनचे कृत्य गर्ह्य (निंदनीय) वाटणार नाही. ‘आडवा आलेला गर्भ कापावा लागतो. कापणाऱ्याला कोणीच दोषी ठरवीत नाही, असे स्टॅलिनचे समर्थन होऊ शकते.’ म्हणत तर्कतीर्थ सहमती व्यक्त करतात, याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.
लेखाचा उत्तरार्ध मात्र उपरोक्त कथनाचा व्यत्यास ठरतो. त्यानुसार, ‘सोविएत युनियनच्या स्तुतिपाठाच्या पोथ्या पाठ करीत आधुनिक कम्युनिस्ट श्रद्धाजड बनला आहे. एकतृतीयांश मानवजातीत जो कम्युनिझमचा प्रयोग सुरू आहे, त्याच्यात मूलभूत मानवी मूल्यांना मूर्तिमंत स्वरूप देण्याचा प्रयत्न सफल होत असता तर पाश्चात्त्य राष्ट्रांच्या नागरिकांनी त्याचे सौहार्दाने स्वागत केले असते. आज भांडवलशाही अर्थव्यवस्थेची अब्रू कुठेच शिल्लक नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांतील भांडवलशाहीच्या नावाने खडे फोडणे, हेसुद्धा अंधपरंपरेचे लक्षण आहे. प्रयोगात आलेला कम्युनिझम मानवात बंधमुक्तीची आशा निर्माण करू शकत नाही. कम्युनिझमच्या पलीकडे गेले पाहिजे. कारण कम्युनिझमने मानवतावादी मूल्यांना दुय्यम स्थान दिले आहे. स्टॅलिनने कम्युनिझमला व्यवहारी आणि मूर्तिमंत स्वरूप दिले, हेच त्याचे जागतिक इतिहासातील अद्वितीय कार्य आहे. त्याच्या कार्याची नीट समीक्षा करून माणसाने पुढे जावे, असा इशारा त्याचा अस्त देत आहे.’
लेखाच्या शेवटी तर्कतीर्थ मानवतावादी मूल्यांना दुय्यम स्थान देण्याच्या कम्युनिस्ट वृत्तीस दूषणे देत असले, तरी लेखाचा भर स्टॅलिनच्या गौरवीकरणावर आहे.
drsklawate@gmail.com