धर्मकोशसंपादनार्थ धर्मकोश मंडळाने हजारो संस्कृत हस्तलिखित ग्रंथ जमविले होते. त्यांच्या आधारे धर्मकोशाचे खंड तयार होत होते. परंतु या संग्रहित संस्कृत हस्तलिखित ग्रंथांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता किमान त्यांचा विवरणात्मक परिचय व्हावा, या उद्देशाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची’ (कॅटलॉग) दोन भागांत प्रकाशित करण्याची योजना आखून ती तडीस नेली. या विवरणात्मक सूचीत संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची माहिती इंग्रजीत देण्यात आली आहे. हेतू हा की, या हस्तलिखित ग्रंथांची माहिती जगास होऊन भविष्यकाळात यावर संशोधन व्हावे. या दोन्ही भागांमध्ये सुमारे ११ हजार पोथ्यांची माहिती आपणास होते. एकूण १५ रकान्यांत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आपणास प्रत्येक पोथीचे शीर्षक, पोथी लेखक, या हस्तलिखिताचा भाष्यकार, पोथीचे माध्यम (कागद, भूर्जपत्र, कापड, चामडे, इ.), पोथीची लिपी (देवनागरी, खरोष्ठी, चित्रलिपी, इ.), पोथी पृष्ठाचा आकार (सेंटिमीटरमध्ये), पोथीची पृष्ठसंख्या, प्रत्येक पृष्ठावरील ओळी, ओळीतील शब्दसंख्या, पोथी स्वरूप (पूर्ण, अपूर्ण, इ.), त्या हस्तलिखिताची स्थिती (जीर्ण, सुव्यवस्थित, इ.) तसेच पोथीचा काळ समजण्यास मदत होते.

सूचीच्या पहिल्या भागात वेद, प्रकीर्णक, उपनिषदे, वेदांगे, शिक्षा, ज्योतिष, छंद, निरुक्त, निघंटु (कोश), श्रुतसूत्रे, श्रौतप्रयोग, गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, स्मृती, निबंध, प्रयोग, इतिहास आणि पुराणविषयक हस्तलिखितांची माहिती देण्यात आली असून, दुसऱ्या भागात तत्त्वज्ञान, सारसंग्रह (कॉम्पेडिया), न्याय, नव-न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, वेदांत, जैन तत्त्वज्ञान, भक्ती, शास्त्र, स्तोत्रे, तंत्रमंत्रागम, काव्य, महाकाव्य, चंपू, आख्यायिका, गोष्टी (कथा), सुभाषितसंग्रह, संकलने (अँथॉलॉजी), व्याकरण, कोश वाङ्मय, छंदशास्त्र, अलंकारशास्त्र, नाट्य, गीत, शिल्प, अर्थशास्त्र, क्रीडाशास्त्र, कामशास्त्र, आयुर्वेद, ज्योतिष, गणित, मुहूर्त व शकुनविषयक हस्तलिखितांचे विवरण आपणास मिळते. पोथ्यांचे हे विषय डोळ्याखालून घातले तरी आपले प्राचीन संस्कृत वाङ्मय किती वैविध्यपूर्ण होते, तसेच जीवनाच्या सर्वांगांना स्पर्शणारे होते, हे लक्षात येते.

ही हस्तलिखिते साधारणपणे सतराव्या, अठराव्या शतकातील आहेत. पूर्वसुरी ऋषी, मुनी, पंडितांच्या ज्ञानाचे जतन करण्याच्या उद्देशाने पूर्वहस्तलिखिते उतरवून काढली असून त्यामुळेच आज आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. वेदवाङ्मय पौरुषेय की अपौरुषेय, हा गतकाळातील संभ्रम आता दूर झाला असून, ते सर्व वाङ्मय मानवनिर्मित आहे, ही धारणा आता रूढ झाली आहे. या सर्व हस्तलिखितांतील मानवी प्रज्ञा आणि प्रतिभा आपल्या प्राचीन वाङ्मयाचे सौंदर्य व समृद्धी म्हणून पाहता येते. नवसंशोधकांसाठी ही सूची संशोधनासाठीचे आव्हान आहे. समाजशास्त्र, संस्कृत, साहित्य, भाषा अशा कितीतरी अंगांनी या हस्तलिखितांचा अभ्यास शक्य आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्याचे संपादन याच उद्देशाने केले असावे. कारण, याबाबत त्यांनी फारसे लिहिलेले आढळत नाही. या पोथ्यांचे मूळ लेखक व्यास, वाल्मीकी, याज्ञवल्क्य यास्क, आश्वलायन, बौद्धायन, आपस्तंब, कौशिक, इ. असल्यानेही या हस्तलिखितांचे ऐतिहासिक महत्त्व आहे.

मी काही संदर्भाने ‘दि हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या मे, २०१९ च्या एका अंकात चुडामणी नंदगोपालांचा ‘हेरिटेज ऑफ इंडियन मॅन्युस्क्रिप्ट ट्रॅडिशन’ शीर्षक लेख वाचला. त्यांच्या प्रारंभीच लेखकाने जे स्पष्ट केले आहे, ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेल्या कार्याचे समकालीन औचित्य सांगणारे आहे. ते म्हणतात की ‘‘दस्तावेजीकरणाच्या प्रक्रियेत आजच्या डिजिटलीकरणाच्या काळात जणू क्रांतीच घडते आहे. जुन्या कागदपत्रांचे जतन हवेच पण या कागदपत्रांतला मजकूर अधिकाधिक सहजपणे उपलब्ध व्हावा, यासाठीही प्रयत्न हवेत. जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलते, तेव्हा तेव्हा नव्या तंत्रज्ञानाआधारे जुन्या कागदपत्रांचे अद्यातनीकरण झाले तरच हे शक्य आहे’’ या पार्श्वभूमीवर प्रस्तुत हस्तलिखित विवरणात्मक सूचीकडे पाहत असताना लक्षात येते की, या सर्व धडपडीमागे तर्कतीर्थ भारतीय ज्ञानाच्या जतन साक्षरतेचा संस्कार समाजात रुजवू पाहत होते. ते त्यांचे द्रष्टेपण होते नि शहाणीवही. drsklawate@gmail.com

Story img Loader