तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या फेब्रुवारी, १९७९ च्या अंकाचं ‘संपादकीय’ लिहिलं होतं. हे संपादकीय ज्ञानयुग, ज्ञानसमाज, ज्ञानकोश, ज्ञानसत्ता, ज्ञानजिज्ञासा असे शब्द वापरणाऱ्या नि स्वत:स ज्ञानी मानणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. या सदरातील या सप्ताहाच्या पूर्व तीन स्तंभ मजकुरात आपण तीन वेगवेगळ्या कोशांना लिहिलेल्या तर्कतीर्थ यांच्या प्रस्तावनांवर विचार करीत कोश व्यवहारासंबंधी त्यांचे विचार जाणून घेतले. त्याच काळात आयुष्यातील सहस्राचंद्रदर्शन स्पर्श करत असतानाच्या काळात हा ज्ञानयोगी नित्य नवज्ञानांचा शोध घेत होता, हे त्यांच्या ज्ञानसाधक पदवीस शोभणारेच होते.

प्रस्तुत संपादकीयामध्ये त्यांनी ज्ञानव्यवहाराचे जे नवे दर्शन घडविले, त्यावर विचार करणे अनिवार्य आहे. हे संपादकीय १९७७ मध्ये प्रकाशित एका अभिनव ज्ञानकोशाकडे आपले लक्ष वेधते. त्या ज्ञानकोशाचे (खरं तर अज्ञात (न) कोशाचे!) नाव आहे, ‘एनसायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’. रोनाल्ड डंकन आणि मिरांडा वेस्टन-स्मिथ यांनी तो सांपादिला आहे. त्याचं उपशीर्षक लक्षवेधी आहे, ‘एव्हरीथिंग यू एव्हर वॉन्टेड टू नो अबाऊट दि अन्नोन.’ माणसाची निरंतर जागृत होणारी ज्ञानजिज्ञासा म्हणजे अज्ञाताच्या शोधाची धडपड असते. तर्कतीर्थांनी समजावले आहे की, मानवाचा अज्ञाताच्या शोधाचा प्रवास पुरातन काळापासून निरंतर सुरू आहे. प्राचीन उपनिषदांपैकी ‘छांदोग्य उपनिषद’मध्ये उद्दालक ऋषी हा आपल्या गुरूगृही वेदविद्या-पारंगत होऊन आलेल्या श्वेतकेतु नामक पुत्रास म्हणतो की, ‘‘बाळा, तुला वाटते की आपण सर्वविद्या पारंगत झालो आहोत. परंतु तुझा अभिमान व्यर्थ आहे. तू आपल्या गुरूस असा प्रश्न विचारलास का की, ‘‘विज्ञानाने सर्व जे काही अस्तित्वात आहे, ते ज्ञात होईल?’’ पुत्र म्हणाला, ‘‘नाही.’’ त्यानंतर सर्व ज्ञात होईल असे तत्त्व उद्दालक ऋषींनी पुत्रास उपदेशिले.

परंतु बुद्धाच्या लक्षात आले होते की, असे काही शक्य नाही. तो आपल्या शिष्यास म्हणतो, ‘‘मी विश्वाचे संपूर्ण ज्ञान देणारा प्रेषित नाही. आपल्यापुढे प्रचंड विस्तारासह उभा असलेल्या या शिंशिप वृक्षाची (शिसम) आपल्या हातात मावतील तेवढी पाने घ्यावीत आणि पाहावीत. मग असे दिसते की, आपल्या हातात मावणार नाहीत एवढी अगणित पाने या वृक्षावर वाऱ्याच्या झुळकेबरोबर नाचत असतात. जेवढे माणसाला ज्ञात होते, ते हातात मावणाऱ्या पानांइतकेच असते. विश्वाच्या अज्ञानाचे क्षेत्र अनंत आहे.’’

असेच एकदा आइन्स्टाइन म्हणाला होता की, ‘‘परमेश्वर विश्वाशी जुगार खेळत नसतो. आज नियम सापडले नाहीत म्हणून निराश होता कामा नये. केव्हा तरी नियम सापडतील. सतत प्रयत्न करीत राहा.’’ असाच प्रयत्न ‘एन्साक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’च्या संपादकांनी केला. या कोशात त्यांनी मानवास अद्याप माहीत नसलेल्या ५० क्षेत्रांतील अज्ञात बाबींचा ऊहापोह केला आहे. या कोशातील हे ५० निबंधांचे लेखक आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. खगोल, सूर्यमाला, अवकाश, गुरुत्वाकर्षण, पुंज यामिकी (क्वांटम मेकॅनिक्स), रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, ज्ञानशास्त्र, रोगविज्ञान, उद्याोग, तंत्रज्ञान, गणित, भाषाविज्ञानसारख्या क्षेत्रांत अद्याप आपणास मेंदू, विवेक, झोप, स्वप्न, पाने-फुले, प्राणी, आहार, व्यसन, द्वंद्व, रक्त, भूगर्भ, अवकाश यांबद्दल काय काय माहीत नाही, हे हा अज्ञानकोश समजावतो आणि त्या बाबींबद्दल जिज्ञासा निर्माण करतो.

तर्कतीर्थांनी केलेले हे विवेचन लक्षात घेऊन मी प्रस्तुत कोश मिळविला नि वाचला. माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की, माहिती, तंत्रज्ञान, विज्ञानाचा विस्फोट म्हणून आपण ज्या ज्ञानविश्वाची प्रशंसा करतो, ते ज्ञानविश्व प्रत्यक्ष ज्ञानाचा विस्तार लक्षात घेता एक छोटे डबके आहे. अज्ञाताचा सागर अनंत नि अपरंपार आहे. मानवाने कितीही ज्ञान कवेत घेण्याची बढाई मारली, तरी (अ)ज्ञाताचे साम्राज्य हा न हटणारा समुद्र होय. या कोशाच्या संपादकांनी आपल्या हेही लक्षात आणून दिले आहे की, आपण आज ज्याला ‘अज्ञात’ म्हणतो, ते आपल्या वकुबाप्रमाणे. प्रत्यक्ष अज्ञाताचा प्रदेश नि क्षेत्र कवेत न येणारे आहे. भविष्यात पूर्वसिद्धांत रद्द होण्याची, बाधित होण्याची शक्यता समजावणारा हा कोश म्हणजे उद्याच्या ज्ञानाचे नवे इंद्रधनुष्य होय!

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com