बोधिसत्त्व धर्मानंद कोसंबी यांची जन्मशताब्दी १९७५-७६ मध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे १९७७ मध्ये धर्मानंद कोसंबींच्या ‘बुद्धलीलासारसंग्रहा’चे प्रकाशन केले. त्यास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना आहे.

या प्रस्तावनेनुसार ‘बुद्धलीलासारसंग्रहा’त बोधिसत्त्वाच्या पारमितासाधनेच्या आठ कथा सांगितल्या आहेत. या ग्रंथाचे तीन भाग असून, पहिला भाग म्हणजे या आठ कथा होत. यात दहा पारमिता म्हणजे माणसांनी साध्य करावयाचे दहा अंतिम नैतिक आदर्श दान, शील, वीर्य, धैर्य, सत्य, संकल्प, प्रेम, त्याग, अंतर्दृष्टी, उपेक्षा होय. भगवान बुद्धांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या नीतिशास्त्रात असलेले आदर्शांचे स्वयंपूर्णत्व सांगितले आहे. याआधारे पुढे बौद्ध धर्मातील एका संप्रदायात या पारमिता म्हणजेच परमेश्वर असे मानले गेले. मानवी जीवनाची परिसीमा म्हणजे या पारमिता होत. भगवान बुद्ध आणि तीर्थंकरांनी उपदेशिलेली अहिंसा ही परधर्माच्या विधायक स्वरूपातला निष्कर्ष होय. बुद्धांनी मैत्री पारमितेला उपदेशात केंद्रस्थानी ठेवलेले आहे. यामुळेच बुद्धकालीन मान्यवर त्यांच्याकडे आकर्षिले गेले होते. सम्राट अशोक त्यांपैकी एक. त्यांनी विश्वव्यापी मैत्रीचा संदेश दिला.

तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे की, अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य, त्याचप्रमाणे सत्य, ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची अंतिम उद्दिष्टे होत. नैतिक आदर्श ही मात्र मानवी दु:खाचा परिहार करण्याची निश्चित साधने होत. बुद्धाचा हा नैतिक बुद्धिवाद नित्य अबाधित राहणारा, विनाशातून वाचविणारा आहे. आत्मविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञानाच्या संघर्षातून बुद्धाने नैतिक तत्त्वज्ञान वेगळे केले, ही बुद्धाची जगाला देणगी होय. भगवान बुद्धाचे ‘बुद्धलीलासारसंग्रह’मधील संवाद मार्गदर्शक होत.

प्रस्तुत ग्रंथाबद्दल अभिप्राय व्यक्त करत तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, धर्मानंद कोसंबी यांचे लेखन मोकळ्या, सरळ, अस्सल मराठीत केले गेलेले आहे. अलीकडे मराठी शैलीतील साधी अर्थवाहकता कमी होत चालली आहे. विशेषत: ललित साहित्यातील शैली नटवी, पसरट व गुंतागुंतीची होत चालली आहे. कवितांमध्ये याचा प्रत्यय अधिक येतो. प्रसन्नता, अर्थवाहकता हा दोष ठरेल की काय, अशी भीती वाटत आहे. गूढ वा अव्यक्त अर्थ असलेली शैली साहित्य पदवीला भूषवू लागली आहे. याचे एक कारण असे की, विचार आणि प्रत्ययशीलता अर्थाला सरळ पोहोचेनाशी झालेली आहे. धर्मानंद कोसंबी यांची लेखनशैली या अवनतीपासून मराठीस वाचवेल, अशी आशा वाटते. तर्कतीर्थ साहित्य समीक्षक होते, तद्वतच चोखंदळ वाचक होते, याचा प्रत्यय देणारे हे निरीक्षण तत्कालीन लेखनशैलीतील गमावत चाललेली अर्थवाहकता किती महत्त्वाची आहे, हेच अधोरेखित करते.

या प्रस्तावनेत तर्कतीर्थांनी धर्मानंद कोसंबी यांच्या समग्र साहित्यावर केलेले भाष्य ‘बुद्धलीलासारसंग्रह’वरील भाष्याइतकेच सारग्रही आहे. त्यांनी म्हटले आहे की, धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या लेखनात आधुनिक ऐतिहासिक दृष्टी आणि संशोधन पद्धती आत्मसात केली होती. त्यामुळे ‘बुद्धचरित्र’ आणि ‘बौद्धधर्म’ या दोन ग्रंथांत सार काय नि असार काय, याचा तपशीलवार पूर्ण निवाडा त्यांनी केला होता. बुद्धावर व बौद्ध धर्मावर धर्मानंदांची नितांत श्रद्धा होती, परंतु ती डोळस होती. या श्रद्धेमुळेच अगणित हालअपेष्टा सोसून, परदेशात राहून त्यांनी बौद्ध धर्माचे व साहित्याचे अध्ययन केले. परदेशात (अमेरिकेत) असताना समाजसत्तावादाचे विशेष अध्ययन केले. मार्क्सवाद हा समाजसत्तावादाचा एक श्रेष्ठ आधार होय, परंतु मार्क्सवादातील हिंसात्मक क्रांतिवाद त्यांना मान्य नव्हता. मार्क्सवादातील मानवतावाद कोसंबी यांनी आत्मसात केला होता. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘जगातील श्रमजीवी वर्गाने प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाहीत, परंतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्यांना तो सापडणार कसा?’’ भगवान बुद्ध, जैन तीर्थंकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी धर्मानंदांचे चित्त पूर्ण भारावून गेले होते. त्यामुळे ते (धर्मानंद) म्हणतात की, ‘‘राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगातून पार पडण्याचा (मुक्त होण्यास) दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही.’’
drsklawate@gmail.com