तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पोटजातीतील विवाहाचे समर्थन करत जशी धर्मसुधारणेस गती दिली, तसेच त्यांनी कन्या विवाहाचे किमान आणि कमाल वय किती असणे शास्त्रसंगत आहे, याबाबतच्या तत्कालीन समाजमान्यतेत सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. कन्या विवाहाच्या संबंधाने तत्कालीन समाजात रूढ असलेल्या धारणा लक्षात घेता, त्या काळी परिस्थितीस आणि शास्त्रास (धर्म) अनुसरून विवाह कालमर्यादेचे नियम (कायदा) करणे किती वर्षांपर्यंत योग्य होईल, स्त्रीला ऋतू प्राप्त झाल्यावर होणारा विवाह हा मुख्य गौण की आपद्धर्म म्हणून समजायचा, कन्येस ऋतू प्राप्त झाला असता वृजस्वल (रजस्वल, ऋतुमती, रजवती इ.) सांगणाऱ्या वचनांचा आशय कसा समजावा इत्यादी प्रश्न ऐरणीवर होते. धर्मसभा, संमेलने, परिषदांमध्ये त्यावर विचार होत असे. अशा सभांमध्ये भाग घेऊन तर्कतीर्थ शास्त्राधार देऊन पारंपरिक धारणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत. काशी येथे २९ ऑक्टोबर १९२८ ते ७ नोव्हेंबर १९२८ या काळात अखिल भारतीय भारतवर्षीय ब्राह्मण महासंमेलन संपन्न झाले. त्यात दीडशे प्रख्यात धर्मपंडित उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यासंबंधी साप्ताहित ‘केसरी’, ‘ब्राह्मण’ मासिकांत आपले मत मांडले. संमेलन संयोजक पंडितांच्या दुराग्रही भूमिकेविषयीही सविस्तर लिहिले. (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय, खंड ८ आणि ९) त्यानुसार निर्णय देताना निर्णयकांनी देशकालपरिस्थितीचा विचार तर केला नाहीच; पण ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ याऐवजी ‘मम वाक्यं प्रमाणं’ अशी नीती स्वीकारली! याबद्दल वरील पंडितांना अभिमान वाटतो. परिस्थितीप्रमाणे शास्त्र बदलू नका, तर शास्त्राप्रमाणे परिस्थिती बदला, असे त्यांचे आग्रहाचे सांगणे आहे. या संमेलनात ‘ऋतुप्राप्तीनंतरचा विवाह अत्यंत निंद्या होय, ती कन्या कोणत्याही धर्मकृत्यास अयोग्य ठरते,’ असा निर्णय घेण्यात आला. तर्कतीर्थांनी केवळ कन्या विवाह वय वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, तर प्रौढ विवाह, विधवा विवाहाचे समर्थन करणारे प्रयत्न आणि लेखन केल्याचे दिसते.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित ‘महाराष्ट्रातील धर्मसुधारणेचे आंदोलन’ शीर्षक लेख (खंड-८/ सांस्कृतिक लेख) यासंदर्भात महत्त्वाचा आहे. शतकापूर्वीचा भारतीय व महाराष्ट्रीय समाज रूढीबंधनात कसा करकचून बांधला गेला होता, याचे त्यातील वर्णन वाचताना आज आपण त्यांच्या प्रयत्न आणि लेखनामुळे धर्मबंधनांतून मुक्त होऊन किती मोकळा श्वास घेतो आहोत, याची कृतज्ञ जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. त्यात ते लिहितात, जन्मापासून मरणापर्यंतचे महत्त्वाचे व्यवहार धर्म-रूढींच्या मर्यादेतच बद्ध होते. सकाळपासून ते त्या सकाळपर्यंतचे कार्यक्रमही धर्मग्रंथांनी व परंपरागत रूढींनी ठरवून दिलेलेच असत. स्नान, पान, भोजन, उपजीविकेचे व्यवसाय, विवाहपद्धती, समाजातील भिन्नभिन्न उच्च-नीच स्तरांवरील व समान स्तरांवरील जाती-जमातींचे आचार-विचार, उपासना पद्धती, अंत्यक्रिया इत्यादी सर्व मानवीय क्रिया सनातन रूढीने डोळ्यावर ढापण लावलेल्या घाण्याच्या बैलाप्रमाणे एकाच चक्रात चालत असत. भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, स्पृश्यास्पृश्य इत्यादी निर्बंध विवेक व विचार न करता परंपरेप्रमाणे चालत असत. कोणाबरोबर जेवावे व काय जेवावे, झोपताना डोके कोणीकडे करावे व पाय कोणत्या दिशेला असावेत, प्रवास केव्हा करावा, कोणत्या दिशेला प्रवासास निघावे किंवा निघू नये, हजामत कोणत्या वारी व तिथीस वर्ज्य वा विहित इत्यादी गोष्टी धर्म सांगत असे. जांभई, शिंक इत्यादी स्वाभाविक क्रियांच्या बाबतीतही धर्माने सांगितलेले आचार पाळत असत.

यावरून सामान्य माणसांचे जीवन धर्मावलंबी कसे होते हे स्पष्ट होते. विवाहासंबंधी शतकापूर्वी तिसऱ्या वा पाचव्या वर्षीचे विवाह वैध, यात जितकी अस्वाभाविकता आहे, तितकीच अस्वाभाविकता शिक्षण, करिअर इ. ताणतणावांतून स्त्री-पुरुषांच्या विवाहाचे वय आज तिशीपार होऊ लागले आहे, यातही मानली पाहिजे. कधी धर्माच्या तर कधी परिस्थितीच्या नावाखाली आपण शरीरधर्माच्या स्वाभाविक मागणीकडे दुर्लक्ष करतो, ही सर्व या विचारांची प्रस्तुतता होय. तिकडे जोवर आपण लक्ष देणार नाही, तोवर आपले जीवन स्वाभाविक व आनंददायी होणार नाही, हे तर्कतीर्थांनी ‘आनंदमीमांसा’ (१९२८) शीर्षक आपल्या प्रबंधातून लक्षात आणून दिले आहे.

drsklawate@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls zws