अहमदनगर, संगमनेर, नाशिक, नंदुरबार, कळवण, बागलाण, सिन्नर इ. ठिकाणी कार्यकर्ता शिबिरे, वनचराईच्या सक्तीच्या वसुलीस विरोध, जनावरांचे कोंडवाडे फोडणे, जंगलात जाऊन कायदा मोडून गवत कापणे, गावकामगार पाटील यांचे राजीनामे घेऊन शासन दुर्बल करणे, अशा अनेक प्रकाराने या भागात कायदेभंगाची चळवळ विस्तारित केली. एप्रिल १९३० ते डिसेंबर १९४१ या कालावधीत असे अनेक छोटे-मोठे सत्याग्रह झाल्याची नोंद कायदेभंग चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या ‘सोर्स मटेरिअल फॉर ए हिस्टरी ऑफ दि फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया’ या डॉ. के. के. चौधरी संपादित व महाराष्ट्र शासन प्रकाशित खंडात आहे.
बागलाणचा जंगल सत्याग्रहसंबंधीच्या अनेक नोंदी ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी पोलीस अॅबस्ट्रॅक्ट ऑफ इंटेलिजन्स’च्या विविध खंडांत उपलब्ध आहे. त्यानुसार दुष्काळाची पार्श्वभूमी असताना सरकारने शेतसाऱ्यात ३३ टक्के वाढ केली. असंतुष्ट शेतकरी, आदिवासी, कोळी यांना संघटित करण्याचे कार्य नरहर गोपाळशेठ वाणी यांच्या पुढाकारातून नामपूर, बागलाण परिसरात सुरू झाले. त्यास दिशा देण्याचे कार्य द्वा. भ. कर्णिक, विष्णू लक्ष्मण मेहेंदळे, अनंत स्वामी ऊर्फ लक्ष्मण बाळाजी जोशी (तर्कतीर्थ), श्रीकृष्ण श्रीनिवास खोत या मुंबई, पुणे, सातारा, नागपूर परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी केल्याची नोंद ब्रिटिश पोलिसांप्रमाणे नंतरच्या संशोधनपर इतिहासग्रंथात आढळते. कायदेभंग चळवळीचा भाग म्हणून वनचराई न भरता जंगलात गुरे चारणे, जप्त करून कोंडवाड्यात ठेवलेल्या गुरांना न आणणे, गुरांच्या लिलावावर बहिष्कार टाकणे, यांमुळे सरकार हवालदिल झाले. या शेकडो आदिवासी, शेतकरी संघटनकार्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, सीताराम शास्त्री, अॅड. दादासाहेब गद्रे, जानोरकर, डॉ. खाडिलकर, गो. ह. देशपांडे, आप्पा गुळवे सक्रिय होते. भिलवाडमधील जंगल सत्याग्रहात चांदीच्या कुऱ्हाडीने फांदी तोडून, चांदीच्या विळ्याने गवत कापून प्रारंभ केल्याची नोंद आहे. जागृती सभांत हजारो शेतकरी, आदिवासी विळे, कोयते, तलवारी, धनुष्य-बाण घेऊन येत. कळवण आणि बागलाणमध्ये हिंसाचार घडला. शेकडो सत्याग्रहींपुढे ५० जणांची पोलीस तुकडी हतबल झाली. चांडकपूर येथे पोलिसांनी हिंसक निदर्शकांचे अटकसत्र सुरू केले. तत्पूर्वी, सत्याग्रहींनी वनाधिकारी, त्यांची मुले, कुटुंबे यांवर चाल केली होती. तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर आर. जी. गार्डन यांनी गोळीबाराचा आदेश दिला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी फरार होऊन भूमिगत झाले. फंदफितुरीने अटक झाल्यावर त्यांना कळवण पोलीस ठाण्यात जेरबंद केले. तीन महिन्यांच्या सश्रम कारावासासह ५० रुपये दंडाची शिक्षा फर्मावून त्यांना धुळे तुरुंगात धाडले. जानेवारी, १९३१ मध्ये त्यांची ब्रिटिशांनी सुटका केली.
हेही वाचा :उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
तर्कतीर्थांना अटक झाल्यावर साप्ताहिक ‘केसरी’ने छायाचित्रासहित हे वृत्त २९ ऑक्टोबर, १९३०च्या अंकात प्रकाशित केले होते. यावरून त्यांच्या या चळवळीतील तर्कतीर्थांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. तुरुंगातून सुटल्यानंतरचे वृत्त यास दुजोरा देते. वाईचे बातमीपत्र साप्ताहिक ‘केसरी’ने प्रसिद्ध केले आहे. २० जानेवारी, १९३१च्या अंकात नमूद आहे की, ‘येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नाशिक जिल्ह्यातील शिक्षा भोगून सुटका झाली असून, सातारा जिल्ह्यातील पूर्वीच्या गुन्ह्यांबद्दल कराड येथे त्याजवर पुन्हा खटला भरण्यात आला आहे. त्याची तारीख २३ जानेवारी, १९३१ ही नेमली असून, ते जामिनावर खुले झाल्यामुळे आजच (१३-१-१९३१) ते वाईस आले. मोटार स्टँडवर डिक्टेटर श्री. वेलणकर यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. गांधी चौकात झेंडावंदन होऊन नंतर ते आपल्या बिऱ्हाडी गेले.’
हेही वाचा :लालकिल्ला : केजरीवाल रेवड्यांचे बादशहा; मग बिरबल कोण?
या गोष्टी आणि त्यांना झालेला तुरुंगवास तर्कतीर्थांना स्वातंत्र्य सेनानी ठरविण्यास पुरेशा आहेत. या चळवळीतील सहकारी द्वा. भ. कर्णिक यांनी तर्कतीर्थांचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अधोरेखित करत एका लेखात लिहिले आहे की, ‘१९३० सालच्या सत्याग्रहाचे पुढारी म्हणून ते महाराष्ट्रात अग्रगण्य झाले. त्या सत्याग्रहात ते सामील झाले, त्याच वेळी त्यांच्या जीवनास कलाटणी मिळाली. त्या सत्याग्रहामुळे ते प्राज्ञपाठशाळेच्या वैराग्यशील वातावरणातून बाहेर पडले आणि बऱ्या- वाईट त्यागी आणि सुखलोलुप, श्रद्धावान आणि नि:श्रद्ध, भावनोत्कट आणि विचारशील अशा मंडळींच्या जीवनाशी समरस झाले.
drsklawate@gmail.com