तर्कतीर्थांनी लिहिलेली ही पहिली प्रस्तावना, म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी ‘दि हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’ या शीर्षकाचा इंग्रजी ग्रंथ १९३७ मध्ये प्रकाशित केला होता. श्रीनिवास व्यंकटेश नखाते यांनी काही महिन्यांतच त्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून १९३८ मध्ये तेही प्रकाशित केले होते. त्यास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना असून, त्यात या ग्रंथाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधताना ते म्हणतात : ‘‘हिंदुस्थानातील एका मोठ्या समाजाला अत्यंत वंद्या असलेल्या इस्लामचे हे रॉयलिखित ऐतिहासिक महत्त्व हिंदू सुशिक्षितांनी समजून घेऊन परस्परांचे दुराग्रह नाहीसे करून घेण्याची ही मोठी संधी आहे. यापुढे ज्या राजकीय व सामाजिक उलाढाली होणार आहेत, त्यातून हिंदू व मुसलमान यांच्या संगमाने नवीन हिंदी समाज व हिंदी राष्ट्र निर्माण होणार आहे. या भावी समाजक्रांतीचे विचारसूत्र सांगण्याचे कार्य या देशातील हिंदू व मुसलमान विचारवंत करीत आहेत.’’
या प्रस्तावनेत तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, इस्लाम धर्म हा अन्य धर्मांपेक्षा सुगम, सुबोध धर्म आहे. इस्लामने क्रौर्य व जुलूममुक्त समाज निर्माण केला. या धर्मात विरक्ती वा संन्यास नाही. अरबस्थानची भूमीही पूर्वी सर्व संस्कृतीची संगमस्थळी होती. इस्लाम धर्म सेमेटिक व मंगोल वंशांचा विचार करता दोन प्रकारचा दिसतो. मोगल काळात हिंदुस्थानातील अनेक शूद्र हिंदू अत्याचारांना कंटाळून इस्लाम झाल्याचे इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येते. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या या ग्रंथामुळे इस्लाम धर्मविषयक पूर्वग्रह दूर होण्यास मोठी मदत होते.
‘इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य’ या श्रीनिवास नखाते भाषांतरित ग्रंथ प्रस्तावनेत तर्कतीर्थ सांगतात, ‘‘या धर्माने जगाला सरळपणाचा व्यवहार शिकविला. कुराणाचे संदेश म्हणजे ईश्वराचे औदार्यपूर्ण नि:श्वास होत. यात गहनता नाही. यहुदी, ख्रिाश्चन व झरत्रुष्ट हे जगातील प्रसिद्ध धर्म इस्लामचे अगदी निकटचे शेजारी होते. हे तिन्ही धर्म अरबांना पश्चिम व मध्य आशियातील मोठ्या मानवसमुदायास आकर्षित करू शकले नाहीत. कारण, त्या धर्मांमध्ये त्यांच्या प्रभातकाळाचा उत्साह राहिलेला नव्हता. त्यांना सायंकाळचा थकवा आला होता.’’
‘‘अरबांचा पूर्वीचा धर्म मूर्तिपूजेचा होता. इस्लाममुळे तो एकेश्वरभक्तीचा झाला. या समाजातील पूर्वीचे संशय, विषमता, विश्वासघात इत्यादींसारखे दोष दूर होऊन हा समाज विश्वास, शौर्य, सहकार्याने समृद्ध बनला. इस्लाममधील ऐहिक जीवनाचा आस्वाद कुशलतेने घेण्यास लावणाऱ्या सकाम कर्मयोगामुळे मुसलमानांनी नवे साम्राज्य निर्माण केले. आधुनिक विज्ञानाच्या जन्माची शुभसूचक लक्षणे अरबांच्या साम्राज्यात प्रथमत: दिसली. या साम्राज्याने जुन्या रोम साम्राज्याचा अंत पाहिला. आर्यन इराणी साम्राज्याच्या तडाख्यातून सेमेटिक राष्ट्रांस मुक्त केले. अरबांचे साम्राज्य सिंधू नदीपासून ते इंग्लिश खाडीपर्यंत विस्तारले. रोम साम्राज्याचा कायदा व राज्यव्यवस्था, ग्रीकांचे तत्त्वज्ञान, भूमिती, भौतिक विद्या, तर्कशास्त्र व ललितकला; हिंदुस्थानचे वैद्याक, गणित, वाङ्मय; तर चीनच्या औद्याोगिक कला अरबांनी संपादन केल्या. अरबांनी युरोपच्या दीर्घ अज्ञानतमाचा नाश केला. युरोपला जागे केले.’’
‘‘हिंदुस्थान ज्या मुसलमानांनी जिंकला, ते मुसलमान सुसंस्कृत अरबांपैकी नव्हते. मोगल मागासलेले होते. क्रूर होते. येथील हिंदू समाज जीर्ण व दुर्बल होता. त्यामुळे इथे मुसलमानांचे फावले. हिंदू समाजरचनेच्या अंतर्गत दोषांमुळे इथे मुसलमानांचा प्रभाव पडला. इथे प्राचीन काळापासून शूद्र-अतिशूद्र जो समाज होता, तो दौर्जन्यामुळे तप्त होता. तो इस्लाममुळे शांत झाला. इथल्या इस्लाम प्रसाराचे कारण तलवार नव्हते. इथला मुस्लीम समाजही गरीब होता. तो मागासलेला होता. कच्छी, बोहरी यास अपवाद होते. इथला मुसलमान समाज इस्लाममुळे संघटित व प्रतिकारक्षम बनला.’’
तर्कतीर्थांना वैश्विक इतिहास व संस्कृतीची असलेली जाण आणि अभ्यास या प्रस्तावनेतून लक्षात येते. पूर्वग्रहमुक्त मांडणी, हे या प्रस्तावनेचे बलस्थान होय.
drsklawate@gmail.com