‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हा सुभाषित-अंश सार्थक करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्राचे विसाव्या शतकाचे प्राज्ञ प्रबोधक होते. त्यांनी आपल्या जीवनात भाषण नि प्रस्तावना यांना कधी नकार दिला नाही. भाषणे ही त्यांच्या उपजीविकेचे साधन होते, असे म्हटले तर अतिशयोक्त होणार नाही. मराठी विश्वकोश संपादकपदाचे मानधन हेच ज्यांचे मासिक उत्पन्न होते, अशा पंडिताला महाराष्ट्राने किमान मानधनावर वापरले. आपल्याकडे बुद्धिवाद नि बुद्धिप्रामाण्यवादी यांना आपण सतत समासातच ठेवत आलो आहोत. वि. का. राजवाडे, श्री. व्यं. केतकर, प्रा. न. र. फाटक ही आणखी काही उदाहरणे आपल्या उपेक्षित समाज-व्यवहाराचे पुरावे होत. १९२३ ते १९९४ म्हणजे कळायला लागल्यापासून ते मृत्यू येईपर्यंत तर्कतीर्थ भाषणे देत राहिले. या सात दशकांच्या काळात त्यांनी किती भाषणे दिली, याची आपल्याकडे जंत्री नाही. मराठी भाषा व संस्कृतीस जतन साक्षरतेचा संस्कार नाही, हे मीही गेली २५ वर्षे वस्तुसंग्रहालय निर्मितीत अनुभवत आलो आहे. आपल्या संशोधनात काटेकोरपणा नसतो, जो ब्रिटिश/युरोपियनांत सहज दिसून येतो. आपले विद्यापीठीय भाषिक संशोधन लालित्यात गुंतलेले राहिल्याने त्याने वैचारिकांची परवड केली, हे नाकारता येणार नाही.

तर्कतीर्थ महिन्यातून तीन आठवडे तरी भाषणांसाठी दौऱ्यावर असत, असे त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले प्रा. रा. ग. जाधव यांनी नोंदवून ठेवले आहे. त्यांनी हेही लिहून ठेवले आहे की, तर्कतीर्थांना लिहिण्यापेक्षा बोलण्याची असोशी अधिक होती, त्यामुळे अनेक भाषणांपैकी अल्प भाषणाच्या पूर्ण लिखित संहिता हाती येतात. ते व्याख्यानव्रती होते, हे यावरूनही सिद्ध होते की, त्यांचे अधिकांश प्रकाशित ग्रंथ हे भाषणसंग्रहच आहेत. अगदी मराठीस पहिले ‘साहित्य अकादमी’ पारितोषिक मिळणारा ग्रंथ ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ हा भाषणसंग्रहच; पण तो मराठीचा अभिजात ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाचे इंग्रजी, हिंदी, संस्कृत अनुवाद उपलब्ध आहेत. ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘ज्योती-निबंध’, ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत’, ‘सर्वधर्मसमीक्षा’, ‘शिखांचा पंथ व इतिहास’, ‘आद्या शंकराचार्य – जीवन आणि विचार’, ‘साहित्याचे तर्कशास्त्र’ सर्व भाषासंग्रहच आहेत.

तर्कतीर्थांनी विविध ज्ञान-विज्ञानविषयक विषयांवर भाषणे दिली. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, साहित्यशास्त्र, विज्ञान, गणित, ज्योतिष, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, सौंदर्यशास्त्र इत्यादींना स्पर्श करणारे भाषण विषय पाहिले की, तर्कतीर्थांच्या परिणत प्रज्ञेची प्रचीती आल्याशिवाय राहात नाही. शिवाय धर्म, संस्कृती, वेद हे तर त्यांचे हुकमी भाषण विषय असत. भाषण कोणत्याही विषयाचे असो भारतीय इतिहास, दर्शन, मिथक, चरित्रे यांच्या दाखल्यांशिवाय त्यांचे भाषण नसे. एकाच वेळी त्रिकालस्पर्शी विवेचन आणि विश्लेषण हा त्यांच्या भाषणाचा स्थायीभाव असे. अनेक व्यक्तिचरित्रे त्यांच्या भाषणांचे विषय ठरली. त्यात विचारधारेचे सोवळेओवळे त्यांनी पाळले नाही. लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, महर्षी, कर्मवीर, महात्मा साऱ्यांना त्यांनी आपल्या भाषणकलेत आणले आहे. तीच गोष्ट विचारधारांचीही. गांधीवाद, रॉयवाद, मार्क्सवाद, द्वैतवाद, सांख्यदर्शन, लोकायत सर्वांवर त्यांनी भाषणे दिली. त्यांनी आपल्या भाषणांमधून विसाव्या शतकाचा महाराष्ट्र प्रबुद्ध केला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणची सार्वजनिक ग्रंथालये, साहित्यसंस्था, व्याख्यानमाला, विद्यापीठे, गणेशोत्सव, शारदोत्सव, साहित्य संमेलने… यांचे वार्षिक अहवाल हे तर्कतीर्थ भाषण नोंदीचे खरे दस्तावेज! शिवाय वृत्तपत्रे, नियतकालिकांचे वृत्तांत त्यांची साक्ष नोंदविताना दिसतात. पुरातनास पुरोगामी बनविण्याचे कौशल्य हे त्यांच्या भाषणांचे खरे ईप्सित बलस्थान. हजारो श्रोते मंत्रमुग्ध होऊन भाषण ऐकत. हे वर्तमानात अख्यायिका वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर्कतीर्थांनी महाराष्ट्राचे ऐकण्याचे कान तयार केले होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात तर श्रोते बैलगाड्यांनी भाषण ऐकण्यास येत असल्याच्या नोंदी आहेत. त्यांची अनेक भाषणे मुद्रित करून वाटली जात. अशा कितीतरी पुस्तिका माझ्या संग्रही आहेत. अशा काही भाषणांचा जरी आपण आस्वाद घेऊ शकतो, ती आज ‘समग्र वाङ्मय’च्या चार खंडांत जिज्ञासू वाचकांना वाचण्यास, संशोधनास उपलब्ध आहेत.