मराठी साहित्याच्या विसाव्या शतकातील साठोत्तर काल हा दलित साहित्य प्रवाहाचा प्रभावकाळ म्हणून ओळखला जातो. कारण, या काळात मोठ्या संख्येने दलित आत्मकथा प्रकाशित होऊन या आत्मकथांनी मराठी साहित्यात दलित साहित्य केंद्रीभूत केले. ‘अस्मितादर्श’ मासिकाने या पार्श्वभूमीवर १९७२च्या दिवाळी अंकात ‘धर्मदास्य, लोकशाहीविवेक आणि दलितमुक्ती’ विषयावर चर्चा घडवून आणली होती. त्यात तर्कतीर्थ, प्रा. दि. के. बेडेकर, प्राचार्य म. भि. चिटणीस, प्रा. श्री. के. क्षीरसागर, ग. वि. केतकर, प्राचार्य दिनकर संदानशिव, प्रा. वा. वा. वडस्कर यांनी भाग घेऊन आपला या विषयाच्या संदर्भातील दृष्टिकोन स्पष्ट केला होता.
प्रस्तुत विषयासंदर्भात आपले मत मांडत तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, हिंदू, बौद्ध, ख्रिाश्चन, मुसलमान, यहुदी इत्यादी धर्मांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामाजिक विषमता आणि दास्य यांची तळी उचलली आहेत. या धर्मांनी मानवी समतेचा पुरस्कार केला, तरी हिंदू धर्माने सामाजिक विषम रचना, उच्च-नीच भाव आणि दलित वर्गाचे दास्य स्थिर करायचा प्रयत्न केला आहे. ख्रिाश्चन व इस्लाम धर्मांनी धर्मप्रसारार्थ इतर राष्ट्रांवर आक्रमण केले आहे. तलवारीच्या बळावर धर्मप्रसार व धर्मांतरे घडवून आणली आहेत. वरील सर्व धर्मांनी समान मानवी हक्काचा पुरस्कार केलेला नाही. स्वधर्माचे समर्थन व अन्य धर्मीयांवर अन्याय, हे सूत्र अनेक धर्मांत दिसले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

धर्मातील पाप -पुण्याची कल्पना व विषमता यात सख्य आढळते, शिवाय धर्मप्रमाणतेमुळे सर्व धर्म पारंपरिक राहात आले आहेत. धर्मात उच्च नीतितत्त्वे असतात; पण आचरण विपरीत होते. या विसंगतीतून विषमता, दास्यता जन्मते. धर्मातील पारलौकिकत्व हे लोकशाहीविरोधी आहे. धर्मग्रंथ प्रामाण्यता, परलोक भय, पाप-पुण्य भीती हे दास्यतेचे आधार होत. धर्मसंस्था, धर्मग्रंथ विचारस्वातंत्र्याचे शत्रू असतात. हिंदू धर्मात विषमता व व्यवसाय यात सख्य आढळते. चातुर्वर्ण्य, जातिभेद त्याचे पुरावे होत. ते अस्तित्वात असतील, तोवर लोकशाही विवेकावर आधारलेले समाजजीवन अशक्य आहे. भारतीय लोकशाहीचे भवितव्य या सामाजिक स्थितीवर अवलंबून आहे. धर्मश्रद्धा मुक्तीतून विवेक, दलितदास्यमुक्ती शक्य आहे. तर्कतीर्थांनी धर्मातून निष्पन्न सामाजिक दास्यासाठी लोकशाही विवेकाधारित समाजनिर्मिती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

सगळेच धर्म पाप-पुण्याच्या पारलौकिक कल्पनांवर आधारलेले असल्यामुळे लोकशाही जीवनमूल्यांशी हे विसंगत ठरतात. असे जीवन निर्माण झाल्याशिवाय लोकशाही राज्यसंस्था ही अधांतरीच राहते. तिला विनाशाचे भय अधिक असते. धर्मग्रंथाचे प्रामाण्य, परलोकाचे भय, पापाची भीती या गोष्टी लोकशाही जीवनपद्धतीचा विरोध करणाऱ्या गोष्टी आहेत. लोकशाहीचे पहिले मूल्य विचारस्वातंत्र्य होय.

लोकशाही जीवनपद्धतीला हे धर्मदास्य कायमचेच बाधक ठरणारे आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारस्वातंत्र्य हा भाग आहे. धर्मसंस्थेमध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा लोप झालेला असतो. धर्मग्रंथ सांगतील तोच आचार व व्यवसाय व्यक्तीला अंगीकारावा लागतो. हिंदू धर्मामध्ये व्यवसायस्वातंत्र्य नाही. व्यवसायामध्ये उच्चनीच, मध्यम असे धार्मिकदृष्ट्या भेद पाडले आहेत, त्यामुळे दलित जमातींना आर्थिक स्वातंत्र्य लाभू शकत नाही. परंपरागत धर्मसंस्थेचा समाजव्यवस्थेवर पगडा आहे; ही धर्मसंस्था हिंदू समाजसंस्थेमध्ये दलितांना आर्थिक स्वातंत्र्य लाभूच देणार नाही. लोकशाही कायद्याने सर्व जमातींना आणि व्यक्तींना व्यवसायस्वातंत्र्य दिले आहे. परंतु, परंपरागत धर्माचा पगडा पक्का असल्यामुळे दलित जातीची आर्थिक मुक्ती धर्माचा पगडा नाहीसा होईपर्यंत अशक्यप्राय ठरणार आहे. आर्थिक मुक्ती काही प्रमाणात झाली तरी सामाजिक मुक्ती अशक्य ठरते. केवळ आर्थिक मुक्तीमुळे दलितांची सामाजिक मुक्ती होईल असे वाटते. परंतु, हे एक खोटे स्वप्न आहे. हिंदू समाजातील जातिभेद हा सामाजिक बंधनाचा तुरुंग आहे. या तुरुंगात शूद्र व अतिशूद्र मानलेल्या जमाती खितपत पडलेल्या आहेत. उच्चनीच जातिभेद व अस्पृश्यतेची भयानक संस्था जोपर्यंत भारतात कायम आहे, तोपर्यंत येथे लोकशाही विवेकावर आधारलेले सामाजिक जीवन निर्माण होणार नाही आणि लोकशाही विवेकावर आधारलेले सामाजिक जीवन निर्माण होणार नाही, तोपर्यंत लोकशाही व भारत हे राष्ट्र राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बलच राहणार आहे.
drsklawate@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarkteerth lakshmanshastri joshi religion democracy and scheduled castes freedom css