ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ आणि सरदार वल्लभभाई पटेल गुजरातमधील सौराष्ट्र प्रांतात असलेल्या वेरावळजवळील प्रभास पाटणच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरत चर्चा करीत होते. भटकंतीत त्यांना सोरठी सोमनाथ मंदिराचे जीर्ण अवशेष पाहण्यास मिळाले. काकासाहेबांनी जिज्ञासा व्यक्त केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरठी सोमनाथ मंदिराच्या वर्तमान स्थितीचा इतिहास सांगितला. त्यानुसार हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. अकराव्या शतकात गझनीच्या महमुदाने त्यावर अनेक हल्ले करून नामशेष केले. त्यांचे हे अवशेष. के. एम्. मुन्शी यांनी नुकतेच त्यावर पुस्तक (१९४७) लिहिले होते. त्याची प्रेरणा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १३ नोव्हेंबर १९४७ ला या मंदिर जीर्णोद्धाराची घोषणा केली होती. ती घोषणा करून सरदार वल्लभभाई पटेल ते सांगण्यास महात्मा गांधींकडे गेले. महात्मा गांधींनी तीन अटींवर जीर्णोद्धारास अनुमती दिल्याचे सांगितले जाते. – (१) मंदिर जीर्णोद्धार स्वराज्य फंडातून करायचा नाही. (२) जीर्णोद्धार लोकवर्गणी जमा करून करावा. (३) पुनर्निर्मित मंदिर प्रवेश सर्वांना खुला असावा.

त्यानुसार मे १९५१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. परंतु दरम्यान सरदार पटेल निवर्तले होते. मंदिर प्राणप्रतिष्ठेची जबाबदारी विश्वस्त काकासाहेब गाडगीळ, के. एम. मुन्शी व जामसाहेब या विश्वस्त त्रयीवर येऊन पडली. त्यांनी तत्कालीन धर्मपंडित, पुरोहितांना प्राणप्रतिष्ठेसाठी गळ घातली; पण हे मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर सर्व जाती-धर्माला खुले होणार म्हणून सनातनी धर्मपंडितांनी प्राणप्रतिष्ठा करण्याचे नाकारले. तेव्हा स्वामी केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वस्त मंडळास सहकार्याचा हात पुढे केला.

तर्कतीर्थ प्राणप्रतिष्ठेचे प्रमुख ऋृत्विजाचार्य बनले. त्यांनी काशी, नाशिक, वाई, भावनगर, जामनगर, द्वारका, मुंबई येथून १६० ऋृत्विज (प्राणप्रतिष्ठा करणारे पुरोहित) व अग्निहोत्री निवडून कार्य पूर्ण केले आणि ८ ते ११ मे १९५१ या काळात प्राणप्रतिष्ठा महोत्सव पूर्ण धार्मिक अनुष्ठानाने संपन्न झाला. या समारंभाचे यजमान भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते. या समारंभास ते सपत्निक उपस्थित होते. या मंदिरात प्राणप्रतिष्ठेपासूनच जातधर्मनिरपेक्ष मंदिर-प्रवेशाची परंपरा सुरू झाली. या प्राणप्रतिष्ठापना महोत्सवात सन्मानजनक दक्षिणा म्हणून दहा हजार रुपये देण्यात आले होते. ते स्वीकारून तर्कतीर्थांनी ती रक्कम विश्वस्थ मंडळास परत केली- नियोजित सोमनाथ संस्कृत विद्यापीठास देणगी दिली आणि संस्कृत नि संस्कृती संवर्धनाचा अनुकरणीय असा वस्तुपाठ कायम केला.

तिकडे मानवेंद्रनाथ रॉय यांना ही प्राणप्रतिष्ठा करणे तत्त्व म्हणून रुजले नाही. सनातनी धर्मपंडितांनी धर्मात अनाधिकार हस्तक्षेप केला म्हणून आक्षेप घेतला. तर्कतीर्थ मात्र आपण विवेकाच्या कसोटीवर दीर्घ परिणामी परिवर्तन कार्य केले म्हणून निश्चल राहिले. या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा साध्यंत वृत्तांत शब्दबद्ध करीत त्र्यंबक रघुनाथ तथा गौतमबुवा पाठक यांनी १९५१ मध्ये ‘श्री सोमनाथ तीर्थ’ शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा पुरस्कार (प्रस्तावना) आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘नव्या सोमनाथ मंदिराचे आचार्यत्व माझ्याकडे आले, तेव्हा मी ‘हे माझ्याकडे कसे आले?’ यासंबंधी खोलात जाऊन तपास केला. माझ्या लक्षात आले की, काही तीर्थस्थ सुप्रसिद्ध संस्कृत पंडितांना व शंकराचार्य पीठस्थ आचार्यांना हे आचार्यत्व स्वीकारण्यास माझ्याअगोदर विनंती केली होती. परंतु त्यांनी ती नाकारली. त्याचे कारण, श्री सोमनाथ विश्वस्त निधी संस्थेच्या सनदेत हे मंदिर अस्पृश्यांना पूजेस व हिंदूंना देवदर्शनास मोकळे राहील, असा नियम नमूद केला आहे. ‘ती अट काढून टाकण्यास आम्ही आचार्यत्व करू,’ अशी अट श्री सोमनाथ विश्वस्तांना नाशिक, काशी, द्वारका येथे पंडितांनी व आचार्यांनी घातली. परंतु मी स्वत: अशी अट घालणार नाही, अशा विश्वासाने श्री सोमनाथ विश्वस्तांनी इतरांचा नाद सोडून मला आचार्यत्व स्वीकारण्याची प्रार्थना केली. मी सनदेतील नियमास हरकत न घेता, ती प्रार्थना मान्य केली.’’
drsklawate@gmail.com

Story img Loader