महात्मा गांधींचे पुत्र देवदास आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या लक्ष्मी हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा निर्णय उभयपक्षी अमान्य करण्यात आला. कारण, तो आंतरजातीय विवाह ठरत होता, शिवाय लक्ष्मी अल्पवयीन होती, हे आणखी एक विरोधाचे वैध कारण होते. दोघांनी दोन वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहायचे नाही, या अटीवर विवाहाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. १९३३ला असंपर्काचा कालावधी पूर्ण होताच देवदास व लक्ष्मी आपल्या निर्णयावर ठाम राहात परत पालकांपुढे दत्त! उभय पित्यांच्या सत्त्वपरीक्षेचा तो क्षण. महात्मा गांधींना याप्रसंगी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची आठवण होणे स्वाभाविक होते. त्यांनी तर्कतीर्थांना पुण्यात बोलावून घेतले. त्या वेळी महात्मा गांधींचा मुक्काम प्रमिलाबेन ठाकरसी यांच्या ‘पर्णकुटी’मध्ये असे.
राजाजी आणि गांधीजींनी स्वतंत्रपणे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले की, हा विवाह परंपरेविरुद्ध ठरतो हे खरे. याला प्रतिलोम विवाह म्हणतात. वधू ब्राह्मणकन्या आणि वर वैश्यपुत्र. रूढार्थाने हा आंतरजातीय विवाह ठरत असला, तरी तुम्हा दोघांची कुटुंबे समान आचाराची, समान संस्कृतीची असल्याने माझ्या मते हा समानवर्णी विवाह मानला गेला पाहिजे; पण उभय कुटुंबांना हा विवाह धर्मसंमत मार्गानेच करायचा होता. तर्कतीर्थांनी अशाप्रसंगी प्रायश्चित्त घेऊन विवाह होऊ शकतो, हे लक्षात आणून दिले. त्या वेळी हेही स्पष्ट केले की, जातिव्यवस्था काल्पनिक आहे आणि वर्णव्यवस्था कर्ममूलक. उभयपक्षी समाधान झाल्यावर विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा :तर्कतीर्थ विचार : जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व
आचार्य काका कालेलकरांनी या विवाहाचे पौरोहित्य करावे, असे महात्मा गांधींनी सुचविले; पण तर्कतीर्थ पठडीतले पंडित पुरोहित असल्याने त्यांनी विवाहाचे पौरोहित्य करावे, असा आग्रह आचार्य काका कालेलकरांनी धरला. महात्मा गांधींना हा वेगळा विवाह असल्याने यासाठीचा विवाहविधीपण प्रचलित विधीपेक्षा वेगळा असायला हवा, असे वाटत होते. त्यांनी नवा विवाह विधी ठरविण्याची जबाबदारी आचार्य काका कालेलकरांवर सोपविली. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या या विवाहविधीची पुस्तिका अलीकडे पुनर्मुद्रित करण्यात आली आहे. पुढे हा विवाहविधी महात्मा गांधींच्या आश्रमातील सर्व विवाहांना लागू करण्यात आला होता. यात महात्मा गांधींनी स्पष्ट केले होते की, ’’अब समय आ गया है कि हम धर्मशास्त्र को देखकर शास्त्र के अनुसार जितनी बातें अत्यंत जरुरी हो उतनी सब लेकर अपनी एक विधि तैयार करें, जो सबके लिए एक-सी हों। उसमें विवाह विशेष खर्चे के बिना, असंख्य रिश्तेदारों को बुलाये बिना, पूरी सादगी से, एक ही दिन में हो जाए।’’
हेही वाचा :तर्कतीर्थ विचार : अस्पृश्यता निर्मूलन कार्य
देवदास आणि लक्ष्मीचा विवाह १६ जून, १९३३ रोजी ठाकरसी कुटुंबाच्या ‘पर्णकुटी’ निवासस्थानी संपन्न झाला. विवाहाचे पौरोहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले. प्रारंभी त्यांनी उभय पित्यांना प्रायश्चित्त दिले. नवविधीने संपन्न हा विवाह सत्यशोधक पद्धतीशी आणि तत्त्वांशी जुळणारा, एका अर्थाने निर्मिकाकडे जाणारा प्रवास होता. याप्रसंगी महात्मा गांधींनी सुनेसाठी हिंदीत, तर मुलासाठी गुजरातीत दिलेले आशीर्वचनपर भाषण हे प्रत्येक विवाहेच्छुक अपत्यांच्या माता-पित्यांनी वाचण्यासारखे आहे. तर्कतीर्थांनी केलेल्या मार्गदर्शन व धर्मशास्त्राच्या नव्या अर्थाने महात्मा गांधींचा विवाहसंबंधी दृष्टिकोन बदलला. जात, वर्ण कल्पना नवी झाली. त्यांनी निश्चयच करून टाकला की, ‘येथून पुढे मी केवळ आंतरजातीय विवाहास उपस्थित राहीन.’ नंतरच्या काळात त्यांचे सचिव असलेल्या महादेवभाई देसाई यांचा मुलगा नारायणचा विवाह संपन्न झाला. तो सजातीय होता. २४ तास महात्मा गांधींची सावली बनून जगलेले महादेवभाई! पण गांधींना व्यक्तीसंबंधांपेक्षा समाजसंबंध महत्त्वाचे वाटले. पुढे तर गांधींच्या आश्रमात अशा विवाहांचा प्रघात पडल्याचे दिसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची याप्रश्नीची भूमिका ‘एज्युकेट दाय मास्टर’ अशीच होती.
drsklawate@gmail.com