प्रस्तावनाकार म्हणून आपण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लेखनाचा विचार करतो, तेव्हा लक्षात असे येते की, त्यांनी काही ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना व्यक्तिलेखांचा सुंदर नमुना होय. अशा ग्रंथांमध्ये मधु लिमयेलिखित ‘डॉ. आंबेडकर : एक चिंतन’चा अंतर्भाव करावा लागेल. समाजवादी विचारांचे राजनीतिज्ञ म्हणून मधु लिमयेंना ओळखले जाई. त्यांचा एक इंग्रजी ग्रंथ आहे ‘प्राइम मूव्हर्स : रोल ऑफ दि इंडिव्हिज्युअल इन हिस्टरी’. या इंग्रजी ग्रंथात त्यांचा एक दीर्घ लेख आहे. त्याचे शीर्षक आहे ‘डॉ. आंबेडकर : ए सोशल रिव्होल्यूशनरी’. या दीर्घ लेखाचे मराठी भाषांतर अमरेंद्र (नंदू) धनेश्वर यांनी केले असून, ते ग्रंथरूपात प्रकाशित आहे. तो ग्रंथ म्हणजे ‘डॉ. आंबेडकर : एक चिंतन’. त्यास तर्कतीर्थांची जी प्रस्तावना आहे, त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘हे पुस्तक प्रत्येक समाजचिंतकाने आणि समाजसुधारणा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याने संग्रही ठेवावे व मनन करावे, इतक्या उच्च दर्जाचे आहे.’’ सन १९८६ ला लिहिलेल्या आपल्या या प्रस्तावनेत तर्कतीर्थ म्हणतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचा इतिहास घडविणाऱ्या श्रेष्ठ विभूतींपैकी एक होत. मधु लिमये यांनी या ग्रंथात त्यांच्या कर्तृत्व व विचारांचा विस्तृत परामर्श घेतला आहे. डॉ. आंबेडकर हे समाजक्रांतिकारक होते. त्यांना हिंदू व भारतीय समाजाच्या क्रांतीचे नेतृत्व करता आले. याचे कारण, ते भारतीय व हिंदू समाजाच्या सर्वांगीण स्वरूपाचे बौद्धिक विश्लेषण यथार्थ स्वरूपात करू शकले. मौलिक पुरोगामी परिवर्तन म्हणजे क्रांती होय. डॉ. आंबेडकर यांनी समाजरचनेची मूलगामी मीमांसा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे. त्यांचे जातिभेदावरील लेखन हे उत्कृष्ट समाजशास्त्रज्ञाने केलेले परिशीलन आहे, याची साक्ष मधु लिमये यांच्या या ग्रंथातील ‘जातसंस्थाविषयक सिद्धान्त’ शीर्षकाचे प्रकरण होय. याबद्दल मधु लिमये यांनी म्हटले आहे की, ‘‘जातप्रथेवरचे आंबेडकरांचे विवेचन विवेकावर आणि बिनतोड व्यक्तिवादावर आधारलेले आहे. आंबेडकरांनी यात भावनेचे धगधगते अंगार अशा पद्धतीने ओतले आहेत की, त्यांची तुलना कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी लिहिलेल्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’शी होऊ शकते आणि भारतीयांच्या दृष्टीने ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’पेक्षा हे पुस्तक अधिक महत्त्वाचे आहे.’’

या प्रस्तावनेत महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्व व वैचारिक घडणीची केलेली विस्तृत चर्चा आहे. या उभयतांचा दीर्घ सहवास, संपर्क, संवाद करण्याची संधी तर्कतीर्थांना वर्षानुवर्षे लाभली होती. त्यामुळे त्यांच्या विवेचनामागे निरीक्षण व चिंतन कार्यरत असल्याचे जाणवते. तर्कतीर्थ म्हणतात की, ‘‘एकंदरीत गांधी आणि आंबेडकर यांच्या दृष्टिकोनात दोन ध्रुवांचे अंतर होते. गांधी हिंदू भक्तमार्गी, तर आंबेडकर इहवादी पाश्चात्त्य संस्कृतींनी भारावलेले होते. पुनर्जन्माच्या सिद्धांतावर गांधींची श्रद्धा होती. या जन्मी जशी कृत्ये कराल, त्याचे परिणाम पुढील जन्मात दिसतील, या कर्मसिद्धांतावर गांधींची श्रद्धा होती. हा कर्मसिद्धांतच जातिव्यवस्थेचाही एक आधार आहे. गांधींना या सिद्धांतावर आधारलेली अस्पृश्यता मात्र मान्य नव्हती. अस्पृश्यता पाळणे हे एक प्रकारचे पाप आहे, असे गांधींना त्यांच्या उच्चतम नैतिक निष्ठेमुळे प्रत्ययास आले, परंतु दीर्घकाळपर्यंत गांधी, अस्पृश्यता निवारणाचा अपवाद सोडल्यास, जातिव्यवस्था तर्कदुष्ट आहे, असे मानत नव्हते.’’

डॉ. आंबेडकर हे कायदेशास्त्रात आणि अर्थशास्त्रात निष्णात होते. कायदेभंगाचे राजकारण आंबेडकरांना तत्त्वत: मान्य नव्हते. ते विभक्त मतदारसंघ समर्थक होते. कायदेमंत्री या नात्याने त्यांनी व्यापक, उदारमतवादी संविधान व्हावे याकरिता आपल्या विद्वत्तेचा आणि सामाजिक क्रांतीविषयक ध्येयवादाचा उपयोग केला. कम्युनिस्ट तत्त्वज्ञानातील कामगारवर्गाच्या हुकूमशाहीच्या तत्त्वावर त्यांचा विश्वास नव्हता. बौद्ध धर्म स्वीकार ही त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाची घटना होय. आत्यंतिक अहिंसावादाचा ध्वज उभारून जगाला परमशांतीचा संदेश देणारा हा धर्म होय. ही त्यांची धारणा इहवादी धर्मपुरस्कृत होती, असे तर्कतीर्थांनी नमूद केले आहे. ही प्रस्तावना म्हणजे त्यांनी डॉ. आंबेडकरांना केलेले चिंतनशील अभिवादनच होय.
drsklawate@gmail.com