महात्मा जोतिराव फुले यांच्या चरित्र, कार्य आणि विचारांबद्दल प्रारंभिक काळात लेखन करणाऱ्यांपैकी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी एक होते. १९४६ मध्ये सत्यशोधक समाज, वाई (जि. सातारा)चा रौप्यमहोत्सव समारंभ ब्राह्म समाज, वाईतर्फे साजरा करण्यात आला, तेव्हा १८, १९ आणि २० जून, १९४६ या काळात तर्कतीर्थांची तीन व्याख्याने झाली. त्यांचे विषय होते- (१) सत्यशोधक समाज व महात्मा फुले. (२) शेतकरी व कामकरी जनतेचे स्वराज्य. (३) सत्यशोधक समाज व ब्राह्म समाज. पैकी पहिले व्याख्यान कार्यकर्ते रा. ना. चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘ज्योति-निबंध’ शीर्षकाने प्राज्ञपाठशाळेने १९४७ मध्ये प्रकाशित केले होते. त्यात तर्कतीर्थांनी महात्मा फुले यांचे वर्णन ‘हिंदुस्थानातील सामाजिक गुलामगिरीच्या विरुद्ध बंड करणारा पहिला पुरुष,’ असे केले होते. ते वाचून तर्कतीर्थांनी महात्मा फुले यांचे संपूर्ण चरित्र वस्तुनिष्ठपणे लिहावे, अशी मागणी सतत होत राहिली. ती लक्षात घेऊन तर्कतीर्थांनी नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियासाठी महात्मा जोतिराव फुले स्मृतिशताब्दी वर्ष (१९९०) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष (१९९१) यांचे औचित्य साधून १९९२ मध्ये ‘ज्योतिचरित्र’ लिहिले व त्याचे प्रकाशन झाले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना १९६९ मध्ये त्यांनी धनंजय कीर आणि डॉ. स. गं. मालशे संपादित ‘महात्मा फुले : समग्र वाङ्मय’ प्रथम प्रकाशात आणले. त्यास तर्कतीर्थांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘महात्मा फुले : समग्र वाङ्मय’ हा त्यांच्या (महात्मा फुले यांच्या) मूलभूत ध्येयवादाकडे वाचकांचे लक्ष वेधेल. महात्मा फुले यांनी नव्या भारतीय समाजरचनेच्या स्थापनेस आवश्यक असलेली, मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी आवेशाने सांगितली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय स्वातंत्र्याच्या स्थापनेनंतर जुनी समाजरचना खिळखिळी होऊन कोलमडत आहे. तिचा पहिला उच्चार ज्या नरव्याघ्राने केला, ते म्हणजे महात्मा जोतिराव फुले. आपले ‘गुलामगिरी’ पुस्तक जोतिरावांनी ‘निग्रो गुलामांना मुक्त करण्याकरिता आत्मार्पणपूर्वक आंदोलन चालविणाऱ्या लोकांना’ अर्पण केले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा भारतीय लोकशाही क्रांतीची मूलतत्त्वे विशद करणारा जाहीरनामा आहे. त्यातील ३३ कलमे ‘आचारसंहिता’ आहे. त्यांचे विचार भारतातील लोकशाही क्रांतीच्या अग्रदूताचे आहेत. ‘स्वातंत्र्य आणि समता यावर आधारलेला प्रादेशिक समाज’ अशी ते राष्ट्र संज्ञेची व्याख्या करीत असत. कोणताही प्रादेशिक समाज हा विश्व समाजाचा घटक म्हणून राहिला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. ख्रिाश्चन, मुस्लीम असे भेद महात्मा फुले मानत नसत. ईश्वरास ते ‘निर्मिक’ मानत.

जोतिराव फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे रूपांतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीत झाले. त्यांना जोतिबांच्या बुद्धिवादाचा व विश्वमानवतावादाचा स्पर्श झालेला नव्हता, असे तर्कतीर्थ या प्रस्तावनेत नोंदवतात. अनुयायांना व चाहत्यांना न मानवणारे विचार जोतिरावांनी मांडले आहेत, हे या प्रस्तावनेत तर्कतीर्थांनी विस्ताराने लक्षात आणून दिले आहे. हिंदू धर्मावरील विशेषत: ब्राह्मणप्रधान हिंदू समाजरचनेवरील व ब्राह्मणप्रधान संस्कृतीवरील जोतिरावांचा हल्ला एक तत्कालीन ऐतिहासिक विशिष्ट सामाजिक व राजकीय परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया होती व ती तीव्र प्रतिक्रिया तटस्थरीतीने पाहणाऱ्या आधुनिक विचारवंतास मर्यादित अर्थाने समर्थनीयच वाटेल यात शंका नसल्याचे मत तर्कतीर्थांनी या प्रस्तावनेत व्यक्त केले आहे. जोेतिराव फुले हे ब्राह्मण जमातीवर जितके कडाडून हल्ला करीत, तितकेच ते अंतरंगातून मऊ आहेत, हेही त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनावरून दिसते. ज्या ज्या ब्राह्मणांनी सहकार्य वा अल्पस्वरूप वा मोठी मदत सत्यशोधक समाजास केली, तिची पावती अत्यंत नम्रपणे व बंधुत्वाने त्यांनी दिलेली आहे. त्याची प्रचीती या प्रस्तावनेतून येते. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रभृती मान्यवर समाजसुधारकांप्रति तर्कतीर्थांच्या मनातील आदर अशा प्रस्तावनेप्रमाणेच त्यांनी लिहिलेल्या विविध साहित्यांतून स्पष्ट होतो.

drsklawate@gmail.com