मानवेंद्रनाथ रॉय हे क्रांतिकारक कम्युनिस्ट म्हणून जगात ओळखले जातात. रशियातील स्टॅलिनशी मतभेद झाल्यानंतर ते १९३० मध्ये भारतात परतले ते वेषांतर आणि नामांतर करून. भारतात डॉ. महमूद या नावाने त्यांनी प्रवेश केला. ते इथे येऊन क्रांती करू इच्छित होते. त्यावेळी भारतात स्वातंत्र्य चळवळ प्रभावी होती आणि तिचे नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेसकडे होते. काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन ते सक्रिय होत होते; पण तेवढ्यात ब्रिटिश पोलिसांना संशय आल्याने ते पकडले गेले. २१ जून, १९३१ रोजी पकडले गेलेले डॉ. महमूद हे मानवेंद्रनाथ रॉयच होते, याची खात्री होताच कानपूर खून खटल्याचे आरोपी क्रमांक एक म्हणून त्यांच्यावर खटला दाखल केला. त्यात त्यांना १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे पुनर्विचार याचिकेनंतर ती सहा वर्षे झाली. त्यानुसार ते १९३६ मध्ये तुरुंगातून बाहेर आले व राजकारणात सक्रिय झाले. २७ व २८ डिसेंबर १९३७ च्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनातील मानवेंद्रनाथ रॉय यांचे भाषण प्रभावी ठरले. महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी, बुद्धिजीवी त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबरोबरीने वसंतराव कर्णिक, द्वा. भ. कर्णिक, न्यायमूर्ती व्ही. एम. तारकुंडे, प्रा अ. भि. शहा, प्रा. गोवर्धन पारीख, यशवंतराव चव्हाण, भाई बेके, वामनराव कुलकर्णी, बा. रं. सुंठणकर, वा. रा. जवाहरे प्रभृती मान्यवरांचा अंतर्भाव होता.
रॉय यांचे राजकीय आकलन पक्के होते. काँग्रेसमधील समाजवादी विचारधारेच्या समर्थकांशी त्यांचे सख्य असले, तरी ते त्यांच्याशी सहमत नव्हते. एका पक्षात दुसरा पक्ष ही ते विसंगती मानत. कम्युनिस्टांशी त्यांचे तात्त्विक मतभेद असल्याने त्यांच्याशी जुळण्याची सुतराम शक्यता नव्हती. काँग्रेसमध्ये ते सामील झाले, तरी त्यांना आतील गोटात प्रवेश नव्हता. १८ ते २० मार्च, १९४० च्या रामगढ (झारखंड) राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनादरम्यान डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी रॉय यांना त्यांच्या नि काँग्रेसच्या दृष्टिकोनात तफावत असल्याचे स्पष्ट केले. परिणामी, रॉय यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.
रॉय यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून १९४० मध्ये ‘लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमन’ची रीतसर स्थापना केली. आपल्या विचाराच्या प्रसारार्थ ‘इंडिपेंडंट इंडिया’ हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. नव्या पक्ष संघटनेत तर्कतीर्थ महाराष्ट्र प्रदेशचे पक्ष सरचिटणीस झाले. १९४६ च्या निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या प्रचारसभेत आनेवाडी (सातारा) येथे शेणमारा नि दगडफेकही तर्कतीर्थांनी सहन केली. इतकेच काय महाराष्ट्रात सात्त्विक वृत्तीचे, हळुवार मनाचे म्हणून प्रसिद्ध पावलेले काँग्रेस पुढारी (अर्थातच साने गुरुजी) वाईस गेले असता तेथील निवडणूक प्रचारसभेत त्यांनी तर्कतीर्थांची ‘हे कसले तर्कतीर्थ? तर्कटतीर्थ नव्हे मर्कटतीर्थ आहेत,’ अशी संभावना केल्याची नोंद प्रा. गोवर्धन पारीख यांनी आपल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : एक थोर ‘क्रियावान पंडित’ या शीर्षक लेखात (‘नवभारत’, ऑक्टोबर १९५४) करून ठेवली आहे. तर्कतीर्थांचे चरित्र मतभेदांमुळे तोंड द्यावे लागणाऱ्या अशा अनेक प्रसंगांनी भरलेले आहे, हे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे रॉय यांच्या विचारांकडे कसे आकर्षित झाले, ते त्यांनी ‘मी रॉयवादी का झालो?’ शीर्षक लेखात (‘धनुर्धारी’, दिवाळी, १९४६) नमूद करून ठेवले आहे. त्यानुसार, ‘‘हिंदी जनतेच्या स्वातंत्र्याचा झगडा लोकसत्तात्मक स्वातंत्र्याचा झगडा व्हावयास पाहिजे. हिंदी समाजाची हल्लीची रचना बदलून नवीन रचना करण्यास समर्थ असे लोकसत्तात्मक राज्य स्थापन व्हावयास पाहिजे. सद्या:काली मानवजातीची श्रेष्ठ संस्कृती, नैतिकता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रलय होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून नैतिक मूल्यांचा आश्रय घेण्याची गरज निर्माण झाली आहे आणि मानवी मूलभूत हक्कांकरिता झगडा निर्माण होऊन या हक्कांची स्थापना व्हावयास हिंदुस्थानात व रशिया खंडात वैचारिक क्रांतीची चळवळ निर्माण व्हावयास पाहिजे.’’ या चार कारणांसाठी तर्कतीर्थांनी रॉयवाद अंगीकारला असल्याचे स्पष्ट केले आहे. सन १९४० ते १९४८ या कालखंडात त्यांनी याअनुषंगाने मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पक्षकार्य केले; पण भारतीय जनमानस क्रांतिसमर्थक नसल्याने रॅडिकल पार्टी मूठभर बुद्धिजीवींपर्यंतच मर्यादित राहिली.