‘बखर’ मासिकाच्या १९९२च्या दिवाळी अंकात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. तिला तत्कालीन बाबरी मशीद वादाची किनार होती. ती मुलाखत त्या मासिकाच्या संपादकांनी घेतली होती.
त्यात तर्कतीर्थ स्पष्ट करतात की, आपल्या जाती-धर्मांच्या कर्मठ परंपरेत वाढलेल्या व्यक्ती बहुधा आधुनिक पाश्चात्त्य विचारांची दखल घेत नाहीत. स्वत:च्या धार्मिक घडणीबाबत स्पष्टीकरण देत ते सांगतात की, मी तसा मूळचा सनातनी संस्कारांत वाढलेला; पण पुढे वाचनाने मी प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज समजून घेतला, तसा जातिभेद नि धर्मभेदमुक्त होत गेलो. विवेकवादी, बुद्धिवादी झालो. नंतर लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ वाचले आणि मी कर्मयोग स्वीकारला. महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय यांचा प्रभाव आहे. मात्र, मी स्वतंत्र विचारी आहे. धर्मग्रंथ असो वा मार्क्सवाद, सर्वांची चिकित्सा झाली पाहिजे, असे माझे मत आहे.
भारतीय विचार-दर्शनात विसंगती आहे. ती दूर करीत मी त्यांचा अंगीकार करतो. भौतिकवाद आणि चैतन्यवाद यांच्या समन्वयाने मी विचार करीत राहतो. समाजसेवा मला मान्य आहे. आपल्या मूल्यव्यवस्थेत उणिवा आहेत. त्या जायला अजून वेळ लागेल. आज जगात भेद कमी होत असून, विश्व एकात्म होत निघाले आहे. कुटुंब व समाजव्यवहारातील अंतर दूर करीत आपण भारतीय समाज एकात्म बनविला पाहिजे. आज मंदिर-मशीद वादावरून धार्मिक पुनरुज्जीवनाचे प्रयत्न चालले आहेत. त्यास प्रासंगिक यश आले तरी ते दीर्घकाळ टिकणारे नाही. कारण, हा वाद विभाजनवादी आहे. हिंदू, शीख, मुसलमान भेद विसरून मानवी एकता व शाश्वतमूल्यांचा विचार महत्त्वाचा आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवादच खरा. भारतात केंद्र सरकार मजबूत हवे. फुटीरपणा राष्ट्रहिताचा नाही. दहशतवाद मानवी अवनती आहे. विश्वसंस्कृती ध्येय हवे.
मूल्यव्यवस्थेत मुख्यत: दोन फरक होत आहेत. एक म्हणजे जन्मजात उच्च-नीच भाव कोलमडून पडतो आहे. तो कायद्याने कोलमडून पडला आहे आणि व्यवहारातूनही हळूहळू तो जाईल. अर्थात् त्याला वेळ लागेल. तसा सहजासहजी तो जाणं कठीण आहे; पण तो घालविला पाहिजे. कारण, हिंदू समाजातला तो एक मोठा दोष आहे. उच्च-नीच भाव मानणं हा हिंदू समाजातला मोठा दोष संपूर्णत: जायला अजून खूप वेळ लागेल.
दुसरी गोष्ट अशी की, सगळी मानवजात एक आहे, अशी एक संस्कृती जगामध्ये निर्माण होत आहे. सामाजिक, राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर या मानवजातींचे संमेलन होते आहे. हे जे सामाजिक, सांस्कृतिक मिलन होते आहे, त्यामुळे एक नवी आधुनिक विश्वसंस्कृती तयार होत आहे. त्यात सगळी माणसं आहेत, त्यामुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर, देशस्थ, कोकणस्थ, स्पृश्य-अस्पृश्य हे सगळे भेद नष्ट होताहेत. आता प्रशासनामध्ये जातिभेद नाहीत. कायद्यात झालेला बदल, प्रशासनात झालेला बदल, यामुळे सगळी मानवजात हळूहळू एका संस्कृतीमध्ये येते आहे. ख्रिाश्चन किंवा इस्लाम धर्म हे अतिशय चिवट धर्म आहेत; पण हिंदू धर्म हा इतर धर्मांशी लवकर जुळवून घेणारा धर्म आहे. कारण, त्याची मूळ बैठकच जुळवून घेण्याची आहे. हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. सर्वधर्मसमन्वय हा हिंदू धर्माचा दृष्टिकोन आहे.
मला वाटते, हे धार्मिक पुनरुज्जीवन टिकणारे नाही. हे तात्पुरते आहे. या आजच्या भावना आहेत, त्या उद्या टिकायच्या नाहीत. हिंदू आणि मुसलमान पाहिजे तितके एकजीव झालेले आज तुम्हाला दिसत नसले तरी मला पुढची ५० वर्षे नजरेसमोर दिसताहेत. अन् येत्या काळात ते एकजीव होतील. हा भेद का टिकून राहिला, त्याचे कारण जर बघितले, तर तुम्ही-आम्ही एकत्र जेवत नव्हतो, ही एक मोठी अडचण होती. आता तुम्ही-आम्ही एकत्र जेवायला लागल्यानंतर हळूहळू आपल्यातील भेद आपोआप कमी होतील. खरा परमार्थ जो आहे, तो मंदिर किंवा मशिदीत नाही, तर अंत:करणातल्या ईश्वराबाबतच्या भक्तीत आहे. या मंदिर आणि मशीद वादात परमार्थ नाही, तर ते एक राजकारण आहे.
drsklawate@gmail.com