छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहासात उमटलेला सुवर्णठसा! या सोनेरी इतिहासाचे विश्लेषण करताना असे लक्षात येईल की तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन हा महाराजांच्या राजकारणाचा कायमच पाया राहिला. भौतिक स्वरूपात प्रकट होणारे किल्ले उभारणी, आरमार निर्मितीसारखे तंत्रज्ञानात्मक आविष्कार हे केवळ हिमनगाच्या दृश्य स्वरूपासारखे आहेत, तर त्यामागील तांत्रिक विचार आणि तात्त्विक चौकट डोळ्याला न दिसणाऱ्या हिमनगासारखी गूढ आणि अदृश्य आहे जिने हा दृश्य डोलारा सांभाळला आहे. अस्तित्वात असणारी धार्मिक-सामाजिक परिस्थिती, भूगोलाचे प्रारूप, प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज आणि उपलब्ध मनुष्यबळाचा कुशलतेने वापर या सगळ्यांचा मेळ घालून उपलब्ध स्राोतांचा कल्पक वापर करण्यासाठी भावनांशी सलगी सोडून तांत्रिक दृष्टिकोनाचा अंगीकार महाराजांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी केला. छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या युद्धतंत्र, किल्लेबांधणी आणि राज्यविस्तार या सर्वांचे मूळ आपणास भूगोलाच्या वैज्ञानिक विश्लेषणामध्ये दिसून येईल. जेव्हा समाज धार्मिक अंधश्रद्धांमुळे समुद्रगमन निषिद्ध मानत होता तेव्हा मुघल आणि इतर साम्राज्यांनी समकालीन समुद्रमार्गांना दुय्यम मानले होते. मात्र महाराजांनी बारकाईने विचार करून नाविक ताकदीचे महत्त्व ओळखले. भारतीय सत्ताधारी १०० वर्षांनंतरही आपापसांत भांडत असताना युरोपियन लोकांचे भारतात येण्याचे उद्दिष्ट केवळ व्यापार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी स्वत:चे आरमार केवळ उभेच केले नाही तर समुद्री मार्गांवर वचक बसविला. हे करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. देशी कारागिरांकडे जहाजबांधणीचे कौशल्य उपलब्ध नव्हते तेव्हा त्यांनी स्वत:च्या कमतरता ओळखून युरोपिअन लोकांना चाकरीस ठेवले. पोर्तुगीज आणि ब्रिटिश एक होऊन आव्हान देऊ लागले तेव्हा महाराजांनी फ्रेंचांकडून जहाजावरील प्रगत उपकरणे आणि शस्त्रास्त्रे विकत घेऊन आपली तांत्रिक बाजू वरचढ ठेवली.
हेही वाचा :उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
सभासद बखरीमधील नोंदीनुसार, गलबत, गुराब, सिबर, तरांडे, तारू आणि पगार अशा सहा प्रकारच्या नौका शिवरायांच्या आरमारामध्ये समाविष्ट होत्या.
‘मराठा आरमार – एक अनोखे पर्व’ या पुस्तकाचे लेखक डॉ. सचिन पेंडसे यांच्या मते, जहाज बांधणीच्या कल्पना, तोफखान्याचे ज्ञान, संरक्षण संरचना आणि नौदलातील स्थानिक व्यक्तींची भरती, संघटनात्मक सखोलता आणि महत्त्वाचे म्हणजे लढाईचे नियम हे सर्व विचार कोणत्याही भारतीय शासकाने शिवाजी महाराजांच्या पूर्वी कल्पिले नव्हते. प्रसिद्ध भू-राजनीतिशास्त्रज्ञ आणि इतिहासकार अल्फ्रेड थेयर महान यांनी नौदल युद्धाचे सहा घटक मांडले होते : भौगोलिक स्थान, भौतिक रचना, किनारपट्टीची मांडणी, लोकसंख्या, राष्ट्रीय स्वभाव आणि शासनाचे स्वरूप! महाराजांनी या सहा घटकांचा वापर महान यांच्या लेखनापूर्वी २५० वर्षांपूर्वी केला होता. भूगोलाचा प्रभावी वापर करताना महाराजांनी कठीण भूभागाचा उपयोग करून डोंगराळ भागांवर, किनारपट्टीवर आणि बेटांवर नवीन किल्ले बांधले. दुसरा घटक म्हणजे भौतिक रचना. खाडीच्या तळाशी असलेली कोकणातील बंदरे स्थानिक नौकांसाठी सुलभ होती. ती कमी पाण्यातही चालू शकत. यामुळे खोल पाण्याची गरज असणाऱ्या युरोपीय जहाजांना खाडीत प्रवेश करण्यापासून रोखले गेले आणि बंदरांना धोका धोका टाळला गेला.
कोकण किनारपट्टी असंख्य खाड्या, डोंगर आणि किनारी बेटांनी भरलेली आहे. खासकरून खाडीच्या मुखाजवळ असलेली हे डोंगर आणि बेटं, जिथे बंदरे होती, ती किल्ल्यांनी संरक्षित केली गेली आणि गस्तीचे ठिकाण बनली, ज्यामुळे जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकले. चौथा घटक म्हणजे लोकसंख्या. शिवाजी महाराजांनी निवडलेले नौदल कर्मचारी स्थानिक होते, त्यांना किनारपट्टीच्या पाण्याचे पूर्ण ज्ञान होते आणि ते कुशल नावाडी होते. तत्कालीन गुजरातमधील खारवा समाजाचे लोक नौकानयन शास्त्रात पारंगत होते. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवरील कोळी, भंडारी, मुस्लीम लोकांना संधी देऊन तंत्रकुशलता हे एकमेव परिमाण ठेवले. पाचवा घटक म्हणजे राष्ट्रीय स्वभाव. पारंपरिक भारतीय संस्कृतीत परदेश प्रवास करणाऱ्या लोकांना बहिष्कृत केले जाई. परंतु व्यापाऱ्यांच्या आणि बंदरांच्या सुरक्षेमुळे अधिक सुरक्षित वातावरण तयार झाले, ज्यामुळे परदेशी व्यापार वाढला, महसूल मिळाला आणि इतर व्यापाऱ्यांना राज्याच्या बंदरांशी व्यापार करण्यासाठी आकर्षित केले. शेवटचा सहावा घटक म्हणजे शासनाचे स्वरूप. शिवाजी महाराजांच्या इतिहासकारांनी त्यांच्या नौदल धोरणाचे तपशीलवार वर्णन केले आहे, ज्यात परदेशी व्यापाऱ्यांना राज्याच्या बंदरांशी व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट उल्लेख आहे, ज्यामुळे महसूल सुनिश्चित झाला. ज्याच्या राज्याला नौदल सामर्थ्याचा इतिहास नव्हता, अशा शासकाने अशा नौदल धोरणांची कल्पना करणे खरोखरच आश्चर्यकारक आहे.
हेही वाचा :पहिली बाजू : समर्पित कार्यकर्त्यांना दंडवत!
दुर्गबांधणी आणि युद्धतंत्र
शिवाजी महाराजांची तांत्रिक दूरदृष्टी त्यांच्या काळातील भू-राजनीतिक परिस्थितीवर मोठा प्रभाव टाकणारी होती, ज्यात तंत्रज्ञानाचा धोरणात्मक उपयोग दिसून येतो. दुर्गांची उभारणी करताना त्यांनी प्रत्येक किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण केली. त्यामध्ये सिंधुदुर्गचा अनियमित आकार, रायगडाची भव्यता, राजगडाची अभेद्याता, प्रतापगडाची दुर्गमता या सर्वांचा समावेश होईल. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची मुबलक सोय करून कमी स्राोतांमध्ये किल्ल्यांची संघर्षशक्ती वाढवली. आलिशान सजावट, कलादालने वगैरे टाळून प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत असलेल्या कमतरतेची कायम जाणीव ठेवली. बिनीचे मार्ग, सागरी टापू , टेहळणीच्या जागा या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी किल्ल्यांची उभारणी अथवा डागडुजी केली. सिंधुदुर्गच्या उभारणीमध्ये समुद्रामध्ये पाण्याखाली अंदाजे १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद भिंत बांधल्याचे दाखले आहेत. त्यामुळे किल्ल्याकडे येणारी शत्रूची गलबते फुटून निकामी होत असत.
गनिमी कावा ही शिवाजी महाराजांनी विकसित केलेली एक युद्धनीती होती, ज्यात स्थानिक भूभागाचे ज्ञान आणि मोजक्या घोडदळाच्या जलद हालचालींचा वापर यातून शत्रूच्या रसद पुरवठ्याचे मार्ग कापून टाकले जायचे. महाराजांनी नेहमीच मोकळ्या मैदानावरील निर्णायक लढाई टाळली, त्याऐवजी ते रणांगण सोडून शत्रूच्या प्रदेशातील इतर ठिकाणी, कदाचित शेकडो मैल दूर हल्ला करत, ज्यामुळे शत्रूला त्यांचा पाठलाग करावा लागे. यामुळे शत्रू बऱ्याचदा मानसिक स्तरावर वैतागून चुकीचे निर्णय घेत असे. गरजेनुसार कल्पकता अवलंबणे हेदेखील महाराजांचे एक वैशिष्ट्य! वाघनखांचा वापर ही त्याच कुशाग्र बुद्धिमतेची चुणूक. पुढे जाऊन त्यांनी ठिकठिकाणी दारूगोळ्याचे कारखाने काढण्यासाठी पुढाकार घेऊन तोफशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
२० व्या शतकात युद्धशास्त्र अधिक प्रगत झाल्यांनतर विविध रणनीतिकार आपापले वैज्ञानिक सिद्धांत घेऊन आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याला यातील बऱ्याच सिद्धांताचे दृष्टांत महाराजांच्या रणनीतीत प्रतिबिंबित झालेले दिसतात. गनिमी काव्याचे युद्ध हे मोठ्या साम्राज्यांशी लढताना लहान राज्यांनी आत्मसात केलेल्या असमतोलाचे युद्धशास्त्र (asymmetric warfare ) या एडवर्ड लुटाक यांच्या संकल्पनेशी साधर्म्य दाखवते. शिवरायांनी वेगवेगळ्या शक्तींशी संबंध संतुलित ठेवले. गरजेनुसार त्यांनी तह केले, जसे मुघलांसोबतचा पुरंदरचा तह, आणि मोठ्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी अन्य प्रादेशिक शक्तींशी युती केल्या. संघर्ष आणि मुत्सद्देगिरी यामधील त्यांच्या कुशल अनुकूलनाची क्षमता महान अभ्यासक स्टीफन वॉल्ट यांच्या संतुलन आणि साजरीकरण (balancing and bandwagoning) या संकल्पनांचे उत्तम उदाहरण आहे. क्लॉझविट्झ या १९ व्या शतकातील जर्मन सैन्यप्रमुखाने आधुनिक युद्धशास्त्राचा पाया घातला. त्याच्या म्हणण्यानुसार युद्धामध्ये नैतिक मनोबल फार मोठी भूमिका बजावते. शिवरायांनी त्यांच्या नेतृत्वाने सैन्य आणि प्रजेमध्ये निष्ठा आणि मनोबल जागवले. न्यायप्रियता आणि सक्षम शासक या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांच्या मोहिमांना सतत समर्थन मिळाले.
अभ्यासकांची ही जंत्री देण्यामागचे कारण म्हणजे सभोवतालच्या घटनांचा तात्त्विक, तांत्रिक आणि चिकित्सक अभ्यास करण्याची पाश्चात्त्य अभ्यासकांची वृत्ती त्यांना जगज्जेते बनवून गेली. शिवराय राज्यकर्ते म्हणून एकमेवाद्वितीय असले तरी त्यांचे वारसदार म्हणून आपण कुठे आहोत? भावना आणि अस्मितांच्या कोंडाळ्यात अडकून महाराजांचे दैवीकरण करून आपण चिकित्सेची दारे बंद करायला सुरुवात केली. वसंत कानेटकरांच्या शब्दात, महाराजांनी इथल्या सामान्य गवताच्या पात्याचे भाल्यात रूपांतर केले. आपण आपल्याच हातांनी त्या पात्याचे निर्माल्य करून घेण्याचे पातक करीत आहोत. ते भाले होण्याची प्रेरणा महाराजांनी युद्धशास्त्रपारंगता, वैज्ञानिक-तांत्रिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि करारी व्यवहारवाद यांच्या मिलाफातून प्रसवलेली संजीवनी होती. ती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी पुन्हा त्याच विज्ञान-तंत्रज्ञान केंद्रित वाटा धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.
तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक
phanasepankaj@gmail.com