सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात परवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. पण चर्चा झाली रविचंद्रन अश्विनला वगळल्याची. अश्विनचे वय ३६ वर्षे. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात दोन फलंदाजांचे पुनरागमन झाले – अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. दोघे पस्तिशीतले. विराट कोहलीचे वय ३४. रवींद्र जडेजाही तेवढाच. कर्णधार रोहित शर्मा ३६ वर्षांचा. मोहम्मद शमी ३४ वर्षांचा. कसोटी अजिंक्यपदासाठीच्या पुढील चक्रातील अंतिम सामना २०२५ मध्ये खेळवला जाईल. तेव्हा या प्रभृतींच्या वयात आणखी दोन वर्षे मिळवली, तर ते किती वयाचे असतील हे लक्षात येईल. या यादीतील काही जण भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांमध्येही खेळतात. दरवर्षी होणारी आयपीएल आणि आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे सामने. याबरोबरीने द्विराष्ट्रीय दौऱ्यांमधील एकदिवसीय आणि टी-२० सामने, शिवाय आशिया चषकासारख्या स्पर्धा आहेतच. भारतीय संघाचा हा जो ‘कोअर ग्रुप’ मानला जातो, हे सगळे पस्तिशीच्या अलीकडे-पलीकडचे क्रिकेटपटू इतक्या भरगच्च कार्यक्रमात ताजेतवाने कसे राहणार आणि त्यांच्यात सातत्याने विजयाची भूक कशी ज्वलंत राहणार, याविषयी आपल्याकडील क्रिकेट व्यवस्थेने म्हणजे अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विचारच केलेला नाही. फिटनेस व्यवस्थापनाच्या आघाडीवर, विशेषत: जायबंदी खेळाडूंच्या पुनरागमनाबाबत आपली वाटचाल अत्यंत सदोष आहे. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापती, तंदुरुस्ती आणि पुनरागमनाबाबत आपल्याकडील व्यवस्थेलाच नेमकी माहिती देता येत नव्हती. या जवळपास प्रत्येक खेळाडूचे पुनरागमन एक तर अपेक्षेपेक्षा अधिक लांबले आणि पुनरागमनानंतरही १०० टक्के तंदुरुस्तीची हमी किंवा कामगिरी यांच्याकडून होताना दिसली नाही. आपल्याकडील बहुतेक आघाडीच्या क्रिकेटपटूंना बोर्डापेक्षा फ्रँचायझींचे तंदुरुस्ती व्यवस्थापन अधिक भरवशाचे वाटते, यातच सारे आले. तशात आता ऋषभ पंतच्या पुनरागमनाविषयी बातम्या प्रसृत होऊ लागल्या आहेत. तो म्हणे अपेक्षेपेक्षा फारच वेगाने प्रगती करत आहे. हे धोकादायक आहे. त्याला झालेल्या अपघाताचे भयंकर स्वरूप पाहता, ऋषभला बरे होण्यासाठी अधिकाधिक वेळ देण्याची गरज आहे. आम्हाला क्रिकेटच्या मैदानावर किंवा अतिताणामुळे झालेल्या दुखापतीच जेथे निस्तरता येत नाहीत, तेथे ऋषभच्या पूर्णतया क्रिकेटेतर स्वरूपाच्या दुखापतीविषयी असा उतावीळपणा कशासाठी दाखवायचा?

यंदा ऑक्टोबर महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाईल. त्याच्या आधी आशिया चषक आहे, जो यंदा ५० षटकांचा असेल. विश्वचषकानंतर लगेच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल. त्यानंतर मायदेशी इंग्लंडविरुद्धची प्रदीर्घ मालिका, मग आयपीएल आणि नंतर लगेचच वेस्ट इंडिज-अमेरिकेत टी-२० विश्वचषक. येत्या काही दिवसांत सुरू होणारा वेस्ट इंडिज दौरा सोडल्यास, येत्या वर्षभरातील कोणतीही स्पर्धा वा मालिका भारतीय क्रिकेटपटूंसाठी कमी महत्त्वाची नाही. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आणि कार्यबाहुल्य समतोलासाठी आपल्याकडे उच्च दर्जाच्या पुरेशा क्रिकेटपटूंचा संच तयार आहे का हा एक प्रश्न आणि दोन आयसीसी स्पर्धाची अजिंक्यपदे पटकावण्याची आपली सिद्धता आहे का, हा दुसरा प्रश्न. पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारात्मक देता येईलही. पण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बराच विचार करावा लागतो. कदाचित ५० षटकांचा विश्वचषक जिंकल्यास, अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या फंदात कोणी पडणार नाही. परंतु तसे न झाल्यास, अशी उत्तरे शोधण्याची वेळ निघून गेलेली असेल! येत्या तीन-चार वर्षांमध्ये किमान एखादी तरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची बीसीसीआयची इच्छा असेल, तर वर्तमानातून बाहेर यावे लागेल. रोहित, विराट, अश्विन यांच्यावर(च) विसंबून राहण्याची चैन बाजूला सारावी लागेल.

कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारांमध्ये रोहितकडे नेतृत्व आहे. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये त्याने उत्तम नेतृत्व केले आणि पाच अजिंक्यपदे मिळवून दिली. परंतु भारतीय संघासाठी तीन स्पर्धामध्ये – टी-२० विश्वचषक, टी-२० आशिया चषक आणि कसोटी अजिंक्यपद – त्याला अजिंक्यपद मिळू शकले नाही हे वास्तव आहे. कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापर्यंतचे सारेच काही रोहितच्या नेतृत्वाखाली खेळवले गेले नाहीत. पण अंतिम सामन्यात तोच कर्णधार होता. आयपीएलमधील रोहितची पार्श्वभूमी आणि सीनियर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची ज्युनियर संघाला मार्गदर्शन केल्याची यशस्वी पार्श्वभूमी या दोहोंच्या मिलाफातून भारताने अधिक चमकदार कामगिरी करायला हवी होती. प्रत्यक्षात तसे काहीच घडलेले नाही. प्रत्येक स्पर्धेत, प्रत्येक मालिकेत डावपेच आणि व्यूहरचनेच्या बाबतीत क्रांतिकारी असे काहीही दिसून येत नाही. टी-२० प्रकारात आपल्या संघाचे डावपेच किमान पाच वर्षे जुने आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बुमरा आणि पंत यांच्या अनुपस्थितीमुळे एखादा संघ अस्थिर आणि जिंकण्यास अक्षम वाटत असेल, तर संघातील विद्यमानांचे मूल्य घसरले आहे असे का समजू नये? कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ओव्हलच्या मैदानावर सुरुवातीच्या तासाभरातील अनुकूल स्थितीचा फायदा सिराज-शमी यांच्यानंतर शार्दूल-उमेशला उठवता आला नाही. अशा वेळीच कर्णधाराला हस्तक्षेप करावा लागतो. कसोटी अजिंक्यपदांच्या दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये – वि. न्यूझीलंड आणि वि. ऑस्ट्रेलिया – भारताच्या पहिल्या चार फलंदाजांपैकी एकालाही ५० धावांची मजल मारता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध परवा पहिल्या पाच फलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये दोन आकडी धावसंख्या पार केल्यानंतर विकेट गमावली. हा निव्वळ फलंदाज किंवा गोलंदाजाचा दोष नसतो. ही नेतृत्वगणाची – कर्णधार, उपकर्णधार, प्रशिक्षक – त्रुटी ठरते. विराट, रोहितसारखे कर्णधार असूनही आपण महत्त्वाची स्पर्धा जिंकणार नसू, तर त्यांच्या कर्तृत्वाचे मोजमाप कसे करायचे? कसोटी क्रिकेटमध्ये भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सरस ठरत आहेत. न्यूझीलंड किमान तुल्यबळ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आपण इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या संघांविरुद्ध गेल्या दोन-तीन वर्षांत सातत्याने हरू लागलो आहोत. तीच बाब एकदिवसीय क्रिकेटची. येत्या विश्वचषकात सध्याच्या भारतीय संघाला भारतीय पाटा खेळपट्टय़ांवर हरवण्याची क्षमता असलेले किमान पाच संघ तरी निघतील. शिवाय मोक्याच्या आयसीसी सामन्यांमध्ये आपण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याशी सातत्याने हरत आहोत. हे बदलायचे असेल, तर थोडी इतिहासावर नजर टाकावी लागेल. काही ठोस निर्णय घ्यावे लागतील.

भारताची आजवरची पाचही आयसीसी अजिंक्यपदे युवा कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मिळालेली आहेत. कपिलदेव १९८३, सौरव गांगुली २००२ आणि महेंद्रसिंग धोनी २००७, २०११, २०१३ हे सगळे विजयी कर्णधार युवा किंवा तिशीच्या आसपास होते. त्यांच्या संघात युवा आणि अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा होता. फिटनेसच्या आघाडीवर कपिलदेव आणि धोनी ही खणखणीत नाणी होती. आज भारतीय संघात विराट कोहलीचा सणसणीत अपवाद वगळल्यास कोणी कपिल-धोनीच्या आसपासही जाऊ शकत नाही. त्यामुळे विद्यमान नेतृत्वबदलाचा प्रयोग विलंबाने करण्यापेक्षा नजीकच्या भविष्यातच करण्याची गरज आहे. जसप्रित बुमरा, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्यापैकी कोणा तरी एकावर किंवा दोघांवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. रोहित-विराट अजून काही काळ निव्वळ कर्णधार म्हणून खेळू शकतात. परंतु कर्णधार आणि प्रमुख फलंदाज या दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना दोघांची दमछाक झालेली दिसून येते. बुमरा, पंडय़ा, पंत हे तिघे किंवा यांच्यापैकी कोणी एक जण आदर्श कर्णधार म्हणून नावारूपाला येईल वा न येईल. परंतु वेगळा आणि धाडसी प्रयोग केल्याने कुणाचे फार बिघडत नाही, हे ‘बाझबॉल’च्या उदाहरणावरून दिसते आहेच. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी तर कित्येक दशकांनंतर पॅट कमिन्ससारख्या गोलंदाजाची निवड झाली. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ फार वाईट कामगिरी करत नाहीये. आपणही आयसीसी अजिंक्यपदाच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती बदलण्यासाठी वेगळे प्रयोग करण्याची वेळ आलेली आहे. ‘आज नको, उद्या बघू’ अशीच वृत्ती राहिल्यास पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान हे संघ आपल्यापेक्षाही सातत्याने जिंकू लागतील.