जगामधील सर्वोत्कृष्ट पुस्तकदालन म्हणून ज्याची निवड अनेक संस्थांकडून करण्यात आली, ते आहे नेदरलँड्स येथील मास्ट्रिश्ट शहरात. तेराव्या शतकात घडविलेल्या अनेक वास्तू सध्या या शहराच्या पर्यटनस्थळांत परावर्तित झाल्यात. सातशे वर्षांपूर्वीच्या कॅथेड्रलच्या भव्य वास्तूच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता इथे २००६ साली भव्य पुस्तकालय उघडण्यात आले. सतराव्या शतकात नेपोलियनने या शहराचा ताबा घेतला, तेव्हा या वास्तूला त्याच्या गोदामाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतरची पुढली दोनशे वर्षे दुर्लक्षित असलेल्या वास्तूला दोन हजारोत्तर काळात पुस्तक पर्यटकांनी नवसंजीवनी दिली. जगातील बहुतांश नियतकालिके, खूपविकी आणि दुर्मीळ संग्राहकी पुस्तके येथे उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती विकत घेऊन वाचणारे लोक अमर्याद आहेत. या पुस्तकालयाविषयी माहिती देणारे व्लॉग पुष्कळ आहेत. मूलभूत तपशील येथे पाहता येतील.
https:// tinyurl. com/46 d4 d84 n
अनुवादकाची कामगिरी…
बानू मुश्ताक या कन्नड लेखिकेचा इंग्रजी अनुवादित कथासंग्रह ‘हार्ट लॅम्प’ यंदा आंतरराष्ट्रीय बुकरच्या लघुयादीत दाखल झालाय. गेल्या वर्षीपासून ‘पॅरिस रिव्ह्यू’ आणि इतर आंग्ल नियतकालिकांत यातल्या कथा झळकतायत. तीन वर्षांहून अधिक काळ यातील कथांच्या इंग्रजी अनुवादाची प्रक्रिया आणि इतर अनेक बाबींवर दीपा भाष्टी या भाषांतरकाराची मुलाखत येथे वाचता येईल.
https:// tinyurl. com/4 a8758 wf
‘ग्रेट गॅॅट्सबी’च्या लेखकाची तिसरी पिढी!
एलेनॉर लेनहान या बालपुस्तकांच्या लेखिका आणि चित्रकार. दुसरी ओळख एफ. स्कॉट फिट्झगेराल्ड यांची नात. ग्रेट गॅॅट्सबी या अभिजात म्हणून गणल्या जाणाऱ्या फिट्झगेराल्ड यांच्या कादंबरीला या महिन्यात शंभर वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कादंबरीच्या आणि लेखकाच्या महत्तेवर चर्चा करणारे खूप आस्वादक समीक्षकी लेखन या महिन्यात घडले. त्याहून थोडे वेगळे म्हणजे, एलेनॉर लेनहान या नातीच्या नजरेतून आजोबांची कादंबरी असा ऐवज असलेला लेख येथे वाचता येईल.
https:// tinyurl. com/2 d98 n3 ye